Friday, July 14, 2006

साम-दाम-दंड-भेद

पात्रपरीचय -
निकीता - माझी पुतणी, वय वर्षे २.५
मी - म्हणजे मीच, वय वर्षे २५

मिशन - निकीताला जेवायला घालणे. (ताटातलं सगळं जेवण संपलच पाहिजे अशी एक उपसुचना)
जेवण - वरण-भात
अडचण - निकीताला वरण-भात खायचा नसुन तिला जॅम किंवा तुप साखर किंवा चॉकलेट यापैकीच काहीतरी खायचं आहे.
वेळ - दुपारचे १२:३० वाजले आहेत. (मिशन १ वाजेपर्यंत संपवायचे आहे)

(मी बाहेरच्या खोलीत येतो. आतुन आवाज येत असतो)
आई - अरे ती फार त्रास देते जेवतांना, अजिबात ऐकत नाही.
मी - काही काळजी करु नका, मी बघतो बरोबर माझ्या पद्धतीने. तुम्हाला लहान मुलांची मानसिकता नीट कळत नाही.
आई - डोंबल्याची मानसिकता. एका रविवारी फक्त तिला सांभाळायची वेळ येते आहे म्हणुन हे सुचतय तुला. बघु आता काय दिवे लावताय.
मी - (घोर अपमान) १० मिनटात संपवेल ती सगळं.

(माझ्या ह्या कोणतीही पु्र्वकल्पना नसताना केलेल्या आगाऊ विधानाला मराठीत "फुशारक्या मारणे" किंवा "वल्गना करणे" हे अतिशय योग्य वाक्प्रचार आहेत. पण अशाच विधानांच्या बळावर मी एक दिवस मॅनेजर होऊ शकतो,काय ?!)

मी - निकीता, बाहेर ये बाळा, आपल्याला मंमं करायची ना?
निकीता - होSSS!!
मी - शहाणी मुलगी आहे ती, चला घास घ्या पटपट. (घास घेते)
मी - (मनात) अरे सोप्पं आहे एकदम, एवढी कशाला बोंबाबोंब होते हिच्या जेवणावरुन?
निकीता - (एक घास खाउन, तो तोंडात असताना) याया ऍ दसो, यायं लेवत आअं.
मी - काय? तोंडात घास असताना बोलू नये बाळा.

(निकीता आज्ञाधारकपणे तोंडातला घास परत ताटात काढुन ठेवते आणि परत तेच बोलते, यावेळी तोंडात घास नसल्याने तिचं बोलणं कळतं)

निकीता - मला हे नको, माझं जेवण झालं.
मी - (ओरडायची ईच्छा आवरत) बाळा, असं करु नये, तोंडातला घास असा काढायचा नसतो. चला परत घ्या घास.
निकीता - नाही
मी - शहाणी मुलगी ना तू?
निकीता - नाही.
मी - माझं ऐकणार ना?
निकीता - नाही.
मी - बघ, पटपट खा, नाहीतर खारुताई तुझं जेवण घेऊन जाईल.

(आता वास्तविक पाहत खारुताईचा इथे अर्थाअर्थी संबंध नाही. आणि त्या प्रामाणिक आणि कष्टाळू जीवावर उगाचच लहान मुलांचं जेवण चोरण्याचा भयंकर आरोप लावण्याचाही मला काहीही हक्क नाही. पण काय करणार, त्या वेळी मला याहुन चांगलं काही सुचलच नाही.)

निकीता - (जोरात) खारुताई ये, आणि वरण-भात घेउन जा.
मी - असं नाही करु, घे पटपट, एक घास चिऊचा आणि एक घास काऊचा. (काय उगाच चिऊ-काऊला ह्यात ओढायचं? पण सगळे म्हणतात म्हणुन मी पण म्हटलं)
निकीता - नको. (अरे वा! नाहीचं नको झालं, थोडी तरी प्रगती आहे.)
मी - असं काय करते, जेवायचं नाही का तुला?
निकीता - नाही (परत गाडी नाहीवर आली)
मी - मग काय करायचंय?
निकीता - आपण चित्र काढू हं?

(निकीता जेव्हा "आपण" चित्र काढू असं म्हणते तेव्हा खरंच आपण चित्र काढायचं असतं आणि ती बाजुला बसुन नुसती फर्माईश करते. माझी चित्रकला आधीच दिव्य ! पण मगाजची लहान मुलांच्या मानसिकतेबद्दलची विधानं आता अंगाशी आली)

मी - मी चित्र काढून दाखवल्यानंतर जेवशील?
निकीता - (नुसती होकारार्थी मान हलवुन चित्रांची वही आणायला आत पळते. ५ मिनीटं होऊन गेलेली असतात. निकीता वही घेऊन परत येते)
मी - काय काढायचं?
निकीता - वाघोबा
मी - (अरे बापरे!) वाघोबा नको, आपण फुगा काढू या.
निकीता - नको, हत्ती.
मी - (वाचवा!) पतंग चालेल का?
निकीता - पोपट
मी - (ठिक आहे, नाही जमलं तर नंतर आपलाच पोपट होणार आहे, पोपटावर तंटा मोडू) चालेल

(पुढची ५ मिनीटं महत्प्रयत्नांनी मी एक पक्षीसदृश चित्र काढलं. तोपर्यंत निकीता मनसोक्तपणे इकडे-तिकडे बागडत होती.)

मी - (तिला चित्र दाखवत कौतुकाच्या अपेक्षेने तिच्याकडे पाहतो) हे बघ !
निकीता - आSSहा , बदक!!
मी - (माझा खाली पडलेला चेहरा उचलण्याचा प्रयत्न करतो, आवाज थोडासा उंचावत) हिरव्या रंगाचं बदक पाहिलं आहेस का कधी, पोपट आहे तो, आणि चला आता जेवा पटपट.
(निकीता एक घास निमुटपणे खाते, दुसरा घास देतांना)

निकीता - बास, झालं, आता आपण हात धुवु हं?
मी - झालं कसलं इतक्यात? आ कर, चल.
निकीता - अंSSS नको ना, आपण गाणं म्हणुया ना
मी - नंतर गाणं म्हणायचं, आत्ता जेव
निकीता - नाही आत्ता
मी - (निकीताचं "आपण" गाणं म्हणू हे सुद्धा आपण चित्र काढू सारखंच असतं) ठिक आहे, मी गाणं म्हणतो, तू खा, कुठलं गाणं? नाच रे मोरा म्हणायचं का?
निकीता - नाही, कजरारे कजरारे म्हण
मी - (कार्टीचं टीव्ही पाहणं कमी केलं पाहीजे) ठिक आहे, म्हणतो, तू घास घे.

(इतक्या वाटाघाटींनंतर महत्कष्टाने मिळवलेला घास तिला भरवुन आणि देवाचं नाव घेउन मी एकदम तार सप्तकातला सुर लावला)

मी - हो कजरारे कजरारे तेरे काले काले नैना ...

(तेवढ्यात आतुन एकदम खुप भांडी पडल्याचा आवाज आला आणि थोड्याच वेळात वैतागलेल्या चेहर्याने आई बाहेर आली)

आई - काय झालं? कशाला ईतक्या मोठ्याने ओरडतो आहेस? किती दचकले मी, हातातलं सगळं विरझण सांडलं.
मी - (माझ्या जबड्यात सर्व ३२ दात शिल्लक आहेत याचा पुरावा देणारं हास्य करत) निकीताने सांगितलं म्हणुन गाणं म्हणत होतो.
आई - ती काय वाट्टेल ते सांगेल, तुला नाही का अक्कल? पटपट भरव तिला (आत जाता जाता) म्हणे मुलांची मानसिकता कळत नाही.

मी - (आईला आत जातांना बघत, निकीताला उद्देशुन) निकीता, संपला का घास, good girl, चला पुढचा घास घ्या

(निकीताकडुन काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मी वळुन पाहीलं तर ती तिथे नव्हतीच. आजुबाजुला पाहिल्यवर निकीता खिडकीत चढुन गजाला लटकते आहे असं दृश्य मला दिसलं)

मी -(ओरडुन) निकीता!!! काय करते आहेस?
निकीता - (ओरडण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन) मी सुपरमॅन आहे.

(मी उठुन मांजराच्या पिल्लाला उचलुन आणतात तसं तिला पकडुन आणलं)

मी - (कडक आवाजात) चला बसा आता इथे गुपचुप, नाहीतर बागुलबुवा येतो (बागुलबुवा, थॅंक्यु रे बाबा!)
निकीता - अंSSS नको ना मला
मी - (आत ऐकु जाणार नाही याची काळजी घेत) हे बघ, तू नीट जेवण केलंस तर नंतर तुला चॉकलेट देईन.
(निकीताचा चेहरा एकदम खुलतो, आणि त्या आनंदात ती एक घास घेते. मला वाटतं सुटलो, पण लगेचंच निकीताच्या कोर्टात जेवणाच्या खटल्याला स्थगिती मिळते आणि प्रकरण पुन्हा जैसे थे)

निकीता - बास, आता पाणी प्यायचं आणि मग चॉकलेट खायचं.

(माझा संयम आता संपत आलेला असतो. २० मिनीटे जाउन ताटातला ऐवज फक्त ३-४ घासांनी कमी झालेला असतो)

मी - (अजुन जोरात ओरडुन) आता वेडेपणा पुरे, नाहीतर फटका मिळेल, चल खा
निकीता - नाही.
मी - मार खायचाय, घे पटकन
निकीता - नाही
(आपण एखाद्याच्या कपड्याना लागलेला भिंतीचा चुना जसा लांबुव झटकतो, तसा मी तिच्या पाठीत उगाच फटका मारल्याचं नाटक केलं. आता ती भोकाड कधी पसरणार याची वाट बघत होतो)

निकीता - आSSS आपण मारामारी करु या (??!!) आता मी तुला मारु?

(असं म्हणुन माझ्या उत्तराची वाट न बघता तिने तिच्या हातातली बॅट जोरात माझ्या डोक्यात मारली. मी पुर्णपणे हतबल होउन तिला पकडायला उठलो.)

निकीता - मला पकड, मला पकड, मी पळते
(सुसाट वेगाने ती आत पळत गेली. जाता जाता जोरजोरात "अमोल मला चॉकलेट देणार" असं ओरडत ती थेट आई बसली होती त्या खोलीत जाउन धडकली. मी मागोमाग तिथे पोचलोच. आईने माझ्याकडे एक अर्थपुर्ण आणि प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. लाच देणार्या लोकांना anti corruption ऑफिसरनी रंगे हाथ पकडल्यावर त्यांच्या चेहर्यावर काय भाव येत असतिल
ते मला कळलं. मी पुन्हा एकदा माझ्या दंतपंक्तींचे प्रदर्शन मांडलं.)

आई - काय, झाली का नाही तुमची १० मिनीटं?
मी - झालंच आहे, २ घास राहीलेत फक्त.

(आईच्या पुढच्या टोमण्याची वाट न पाहता मी निकीताला उचललं आणि बाहेर आलो. येता येता एका ताटात तुप-साखर-पोळी आणली. निकीताने तुप साखर पोळी भरभर संपवली, वरण-भात मी न चावता भराभर गिळला. जेवण संपेपर्यंत एकच गोष्ट तिला पढवत होतो.)

मी - पोट भरलं बाळा?
निकीता -होSS
मी - जर कोणी विचारलं काय जेवली तर काय सांगायचं
निकीता - (थोडा विचार करुन) वरण-भात
मी - Good Girl (हुश्श!)

(येनकेनप्रकारेण मिशन पूर्ण झालं. तात्पर्य काय, तर तिच्या दसपट वयाचा असुन तिच्यापुढे माझं काही चाललं नाही.
मला वाटतं,

ना हर्ष मदतीस येतो, ना उपयोगाचा काही खेद,
बालहट्टापुढे तर हरती साम-दाम-दंड अन् भेद)

Monday, July 03, 2006

पिठाच्या गिरणीतला पट्टा

पुन्हा एकदा दिवा लागला. आदल्या दिवशी बजावुन सांगितल्याप्रमाणे ठरल्या वेळी कोंबडा आरवला. झुरळ आपल्या अंधार्या ड्रॉवरमधुन डोळे मिचकावत बाहेर आलं. रोजच्याप्रमाणे पुन्हा एकदा त्याला उडण्याची तीव्र ईच्छा झाली. पण पंखातलं बळंच गेल्यासारखं झालं होतं. तो विचार मनातुन झटकुन टाकत ते परत रांगायला लागलं. आजुबाजुला त्याच्यासारखे बरेच होते. कालच घोड्याकडुन आणलेली उसनी झापडं त्याने डोळ्यावर चढवली, मग समोर दिसत होती फक्त एकच वाट. रोज दिसायला वेगळी असणारी, पण सुरवातही तीच आणि शेवटही तोच, कधी वाळवंटातुन जायची तर कधी समुद्रातुन. आज फार धुकं होत, आणि त्या धुक्यात बाकी सर्व अंधुक! पायाखाली काय असेल याची पर्वा न करता ते निघालं. आजचं आपलं रंगांचं नशीब काय म्हणतय? एवढाच त्या प्रवासातला फरक.

आज तरी ही वाट दुसरीकडे घेऊन जाईल का? पुन्हा वेडी आशा, पण थोड्या वेळानं उकीरडा आलाच. खिशातुन आणलेली गेंड्याची कातडी त्याने अंगावर चढवली. ओळखीची काड्यापेटी दिसताच ते पटकन आत जाउन बसलं. काळोख...शांतता...बाहेर चालू होतं घमासान युद्ध...आलं होतं घोंघावणारं वादळ...आत ते आपलं आगपेटीच्या काड्यांशी खेळत बसलेलं. सगळ्या एकसारख्याच! अगदी साध्या लाकडाच्या, पण थोडं कुठे घर्षण झालं की चटका देउन जाणार्या.

किती काळ गेला असेल कोणास ठाउक? त्याने हळुच काड्यापेटीतुन डोकं बाहेर काढलं. दिवा विझला होता. सहस्त्र सुर्यांच्या प्रकाशालाही न घाबरणारं, पण कोणी आपल्याला बघेल का बाहेर जाताना याचीच त्याला भिती. हळुच ते काड्यापेटीतुन बाहेर आलं, गेंड्याची कातडी परत घडी करुन खिशात ठेवली परत जायची वाट मात्र मखमली होती. त्याने उडण्याचा प्रयत्न केला, पण थोड्या उंचीवर जाउन ते खाली पडलं. पुन्हा रांगायला सुरुवात केली. झापडांसमोर जेव्हा अंधार दिसायला लागला, तेव्हा त्याने झापडं काढली, कोंबड्याला उद्याची वेळ सांगुन ते पुन्हा ड्रॉवरच्या अंधारात दिसेनासं झालं.



संदर्भासह स्पष्टीकरण:

(दिवा = सूर्य)उगवला होता. (झुरळ = मी) सकाळी उठलो (कोंबडा = गजराच्या) आवाजाने. (ड्रॉवर = माझी खोली) मधुन बाहेर आलो. (उडण्याची = आज तरी दांडी मारावी) तीव्र ईच्छा झाली. काम किती आहे ते आठवलं आणि मुकाट निघालो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, काही पण असो, तोच रस्ता. प्रदुषण फारच वाढलं होतं, पाउसही होता,पाण्याखाली किती आणि कसे खड्डे असतिल याची काही पर्वा नाही. आज कुठला (रंग = ट्राफीक सिग्नल) किती वेळ नशीबात आहे काय माहीत. थोड्या वेळाने (उकीरडा = हे मात्र बरोब्बर ओळखलत, ऑफिस) आलंच. (गेंड्याची कातडी = निगरगट्टपणाचा भाव) चेहर्यावर चढवुन मी माझ्या (काड्यापेटी = ऑफिसमधलं माझं क्युबिकल) मधे जाउन बसलो. असल्या शांत वातानुकुलित ऑफिसमधे असताना बाहेर कितीही गोंधळ झाला तरी काहीही कळत नाही. काम सुरु केलं, नेहमीचं, तेच तेच. फक्त एवढिशी कुठे चुक झाली की बोंबाबोंब सुरू. हे असं अनेक वर्ष चालू आहे. सू्र्य मावळला, तरी अजुन कोणी धरतं का काय याची भीती बाळगतच लपुनछपुन बाहेर पडायचं. परत जाताना कितीही ट्राफीक असला तरी त्याचं काही वाटत नाही. उद्या नक्की दांडी मारू असा होत आलेला निश्चय एका deadline च्या आठवणीने बारगळतो, घरी येउन, उद्याचा गजर लावुन मी परत झोपी जातो.

पिठाच्या गिरणीतला पट्टा = तसंच गोल गोल फिरत राहणारी माझी दिनच्रर्या

तर ही माझी सध्याची दिनचर्या. इतके दिवस ब्लॉग न लिहीण्याचं कारण म्हणजे नेहमीचंच, बुरसटलेलं आणि गंज चढलेलं- "ऑफिसात खुप काम आहे". पण "हापिसात काम करत राहणे ही काही जीवनाची इतिकर्तव्यता नाही" हे पुलंचं वाक्या स्मरुन पुन्हा लिहायला सुरुवात करतो आहे.

ता.क.- वरील वाक्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला संदर्भाशिवायच लागलं असेल तर माझ्यासारखीच तुम्हाला या दिनच्रर्येतुन सुटकेची नितांत आवश्यकता आहे हे समजुन ताबडतोब ऑफिसात रजेचा अर्ज टाकावा.

(स्फुर्ती: "त्याचे व्यवच्छेदक लक्षण"- नस्ती उठाठेव, "नानुचे आत्मचरीत्र"- असा मी असामी, पु. ल. देशपांडे... अजुन कोण ? :) )