Friday, March 21, 2014

घर पहावं विकुन!

    "लग्नं पहावं करुन आणि घर पहावं बांधुन" हे वाक्प्रचार आपल्याला काही नविन नाही. पिढ्यान् पिढ्या ते चालत आले आहेत. नविन घर बांधणार्यांच्या सगळ्या "मजा" पुलंनी "मी आणि माझा शत्रुपक्ष" मधे लिहुंन ठेवल्या आहेतच. पुर्वी माणसं आयुष्यात एकदाच घर बांधत असांवित. पण आजकाल आपण तयार घरं विकत घेतो आणि कधी कधी विकतो देखिल. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, घर विकण्याचा प्रसंग आत्तापर्यंत माझ्या नशिबी एक-दोन वेळा नाही तर तब्बल तीन वेळा आला आहे. त्यावेळच्या अनुभवांकडे बघता "घर पहावं विकुन" हा वाक्प्रचार रुढ व्हायला फारसा वेळ लागणार नाही असं माझं मत आहे.

    घर विकायचा आपला निर्णय झाला का तो तडीस नेण्याआधी सर्वप्रथम आपल्यापुढे उभा राहणारा प्रश्न म्हणजे 'घर स्वतः विकायचं की इस्टेट एजंटमार्फे ?' तसं पाहता हा प्रश्न आणि झालेला आजार बरा होण्यासाठी 'एरंडेल पिता की कार्ल्याचा काढा ?' ह्या प्रश्नात फारसा फरक नाही. दोन्ही पर्याय तितकेच बिकट. पण दोन्हीतला एक पर्याय निवडणं भाग असतं.

    आपण स्वतः घर विकायचं ठरवलं तर त्यासाठी चढावी लागणारी पहिली पायरी म्हणजे घर विकण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देणे! प्रथमदर्शनी ही गोष्ट अतिशय सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष कथा जरा वेगळी असते. ह्या जाहिरातींची जागा अक्षरांनी मर्यादित असते. त्यात देखील किती उभी आणि किती आडवी हे सुद्धा ठराविकच. त्यामुळे जाहिरातिंचा मजकुर लिहीणे म्हणजे तार लिहीणे (किंवा आजकालच्या काळात SMS लिहीणे) आणि शब्दकोडे तयार करणे यांची सांगड घालण्यासारखे आहे. शक्यतो शब्द अर्धा तोडावा लागु नये त्यामुळे तो कोणत्या आडव्या रांगेत बसू शकतो ह्याचे भान ठेवुन घरासंबंधी शक्य तितकी जास्त माहिती अर्थ लागेल अशा क्रमाने मांडणे हे साधंसुधं काम नाही.

    अर्थातच ही कला काही सगळ्याना अवगत नसते. त्यातुन आपण दिलेला मजकुर आणि प्रत्यक्षात वृत्तपत्रात छापुन आलेला मजकुर ह्यात हॉटेलमधे आपण सांगितलेली ऑर्डर आणि प्रत्यक्षात आपल्या समोर येणारं अन्नाईतकंच साम्य असतं. ह्या सगळ्या गोंधळामुळे कधीकधी अतिशय चमत्कारीक जाहिराती छापुन येतात. उदाहरणार्थ:-

"विकणे, ७३५, १ कार वर्ष हड
  पसर ५ जुना चौथा एजंट क्षमस्व
  अपेक्षा सकाळी ९ ते संध्या
  काळी ५, २५ ला त्वरीत
  व्यवहारास प्राधान्य फो १२३४५६७८ "

गुप्तहेरांच्या सांकेतिक भाषेलाही लाजवेल अशा ह्या जाहिरातितुन मराठी विषयाच्या परिक्षेतल्या पेपरमधल्या "शब्दांच्या जोड्या लावा" ह्या प्रश्नाप्रमाणे आपल्याला अर्थ "शोधावा" लागतो.

म्हणजे, ७३५ हे घराचे क्षेत्रफळ असावे. "५ वर्ष जुना" हे घराचे वय असावं. "हड" आणि "पसर" ह्या वरवर असंबद्ध वाटणार्या शब्दांना जोडल्यावर बनणारा शब्द "हडपसर" हा पुण्यातला एक भाग आहे जिथे हे घर असावे. "१ कार" म्हणजे घराबरोबर १ गाडी मोफत असल्याचा गोड गैरसमज न करता एका गाडीच्या पार्कींगची जागा देखील असावी. "चौथा" हा घराचा मजला असावा कारण फक्त चौथ्या एजंटलाच क्षमस्व म्हणावं असा काय अपराध त्याच्या हातुन घडणार? "एजंट क्षमस्व" म्हणजे एजंटनी संपर्क करू नये. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही संपर्काची वेळ असावी. २५ ला म्हणजे २५ लाख ही अपेक्षित किंमत असावी असा कयास बांधला तर थोडीफार सुसंगती सापडते.

जाहिरातित कमी जागेत शॉर्टकट वापरुन जास्तित जास्त माहिती देण्याचा अट्टाहास करण्याचं कारण म्हणजे त्यामुळे काही निरर्थक फोन करणार्‌या लोकांपासुन आपली सुटका होईल ही वेडी आशा!

आमच्या पुण्यात तरी अशी अपेक्षा ठेवणे निरुपयोगी आहे. कारण प्रत्यक्ष जाहिरात छापुन आल्यावर घर विकण्याची पुढची पायरी म्हणजे त्या अनुशंगाने येणार्‌या फोनकॉल्सना उत्तर देणे. ही पायरी चढण्याचा प्रयत्न कमजोर मनाच्या अथवा शीघ्रकोपी माणसाने कदापी करु नये. कारण फोनवरील निरर्थक आणि चिडस्पद प्रश्नांना उत्तरं देता देता संतापाने अथवा नैराश्याने (किंवा " शेण खाल्लं आणि घर विकायला निघालो" ह्या अपराधी भावनेने ) आपल्या तोंडाला फेस येऊन वाढत्या रक्तदाबामुळे हृद्‌यविकाराचा झटका येण्याची किंवा आत्महत्येची भावना मनात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय एकेक लोक फोन करतात हो ! पुरेश्या अनुभवानंतर फोन करणार्या लोकांचे ढोबळ मानाने गट पाडता येतात आणि फोनवरील व्यक्तीशी बोलतांना पहिल्या दोन वाक्यांत ती व्यक्ती कोणत्या गटात आहे हे आपल्याला ओळखु यायला लागतं.

त्यातला पहिला गट म्हणजे निव्वळ रिकामटेकडी माणसे! जसं शेअर अथवा सोन्यात एकाही पैशाची गुंतवणुक नसतांना वर्तमानपत्रात त्यांचे भाव वर गेले का खाली हे वाचण्यात त्याना रस असतो तसंच " बघुया तरी सध्या रिअल इस्टेट मार्केट काय म्हणतंय" ह्या एकमेवं हौशेपायी ते निश्कारण आपला छळ करतात. एक तर ते जाहिरातीत छापलेली सगळी माहितीच परत फोनवर विचारतात. "किती मोठा आहे फ्लॅट?", "कितवा मजला?", "लिफ्ट आहे का?" इ.इ. आणि शेवटी आपण एक बेडरुमच्या घराची जाहिरात दिलेली असतांना "नाही पण आम्हाला दोन बेडरुमचं घर हवं आहे" असलं काहीतरी पाचकळ कारण देवुन फोन ठेवतात.

काहीजण फोनवर संपुर्णपणे असंबद्ध गप्पा मारायला लागतात. "नमस्कार! हां मी कुळकर्णी बोलतोय. मी रीटायर्ड आहे. महाराष्ट्र बॅंकेत सर्विस करायचो. नगरला होतो २० वर्षे ..." वगैरे स्वतःचा वृत्तांत सांगत बसतात आणि नंतर "तुम्ही कुठे नोकरी करता? सध्या I.T. चं जॉब मार्केट कसं आहे" असल्या वाट्टेल त्या विषयाकडे वळतात.

काहीजण फोन उचलल्यावर "किंमत किती कमी करणार?" असंच पहिलं वाक्य बोलतात. आपण त्यांना घरासंदर्भात काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरीही आधी किमतीचं बोलू एवढाच त्यांचा हेका असतो. काही लोकांना स्वतःचंच घर विकायचं असतं, त्यामुळे ते फोन करुन "तुम्ही ही किंमत कशी ठरवली?" असले आचरट प्रश्न विचारतात. फार कमी लोक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतात तो म्हणजे "घर बघायला कधी येऊ?" जोपर्यंत फोनवरील माणुस हा प्रश्न विचारत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला घर घेण्यात काहीही रस नाही हे लक्षात ठेवावे!

आता तुम्हाला वाटेल की यापुढच्या गोष्टी सोप्या असतील. पण इथेच आपण चुकतो. ही शेवटची पायरी आपला अगदी अंत बघते! कारण आत्तापर्यंत फोनपलिकडे दृष्टीआड असलेल्या सृष्टीतल्या अशाच चमत्कारीक वल्लींशी आता आपली प्रत्यक्ष गाठ पडणार असते. आत्तापर्यंत पाहिलेल्या आणि ऐकलेल्या ह्या गोष्टींनी संपुर्णपणे खचलेलं मनोधैर्य कसंबसं सावरुन ; रणांगणावर समोरुन शत्रूचं सैन्य चाल करुन येत असतांना पहिल्या फळीत उभ्या असलेल्या सैनिकाचा अवतार घेउन पुढच्या अनुभवांना तोंड द्यायला आपण सज्जं होतो. "संकटं कधी एकट्यानं येत नाहीत, नेहमी टोळीनं येतात" ही म्हण खरी करणारे एकेक नग हळुहळू यायला लागतात.

यामधे सगळ्यात जास्त उच्छाद मांडणारे लोक म्हणजे "वास्तुशास्त्र" मानणारे! नाही, म्हणजे माझं वास्तुशास्त्राबद्दल बरं किंवा वाईट असं कुठलंच मत नाहिये. असते एकेकाची श्रद्धा, त्यात काही गैर नाही. पण हे लोक आपणही तितकेच वास्तुशास्त्राचे अभ्यासक आहोत असं गृहीतंच धरतात. देवाशप्पथ सांगतो, भुगोलाच्या मास्तरांनी शाळेत कधी छळलं नसेल इतके हे लोक दिशांचे प्रश्न विचारुन छळतात.
"मग आता ईथे नैऋत्य कुठली?"
"घराच्या वायव्य कोपर्यात बाथरुम आहे का?"
"पश्चिमेकडुन संध्याकाळी वाहणारा वारा घरात कोणत्या बाजुने प्रवेश करतो?"
असले भयंकर प्रश्न आपल्याला विचारले जातात. आपण आपले कसेबसे होकायंत्राकडे बघुन जेमतेम दक्षिण ओळखेपर्यंत दिशांचे प्रश्न सोडुन गाडी इतर गोष्टींकडे वळलेली असते.
"हा ओटा असा ईथे असायला हवा होता"
"बाथरुममधला नळ या भिंतीवर असू नये"
"TV खोलीच्या ह्या कोपर्यात असू नये"
अशा एकामागुन एक "चुका" निघायला लागतात आणि थोड्या वेळाने घरात एकपण गोष्ट "योग्य" दिशेला आणि "योग्य" जागेवर नाहीये असं आपल्याला वाटायला लागतं. TV चा शोध लागायला हजारो वर्षं असुनही वास्तुशास्त्रात त्याबद्दलचे नियम आहेत हे ऐकुन आपण हबंकतोच. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने इतक्या उणिवा असलेलं घर मुळात घेणारे आणि त्यातुन त्या चुका न सुधारता तसेच त्यात राहणारे कमनशीबी जीव म्हणजे आपण गाढव असल्याची पुरेपुर जाणीव "लेकी बोले सुने लागे" ह्या युक्तीने आपल्याला करुन दिली जाते. इतकं सगळं चुकलेलं असतांनाही त्या घरात इतकी वर्ष आनंदाने राहता आलं अशी कोणती पुण्यं आपण केली याचा विचार आपण करु लागतो.
अशा लोकांबरोबर नेहमीच आर्कीटेक्ट अथवा इंटिरीयर डिझायनर व्यक्ती असते जी हे सगळे "दोष" कसे सुधारता येतील हे सांगायला तत्पर असते. अशा व्यक्तींचा कल्पनाविलास
"ही खोली ईथुन काढुन तिथे बाथरुम करु ... किचनचा ओटा हलवुन बेडरुममधे नेवू" इथपासुन "घराच्या आत येणारं मुख्य दार तिथुन बंद करुन गच्चीमधुन काढू आणि तिथे तिसर्या मजल्यापर्यंत येणारा स्वतंत्र जीना करु" इथपर्यंत भौतिकशास्त्र अथवा सारासार विचारांची क्षुद्र बंधनं न बाळगता मुक्तसंचार करत असतो.

काही लोक हे एकदम १०-१२ लोकांच्या टोळीनं येतात, नातवांपासुन पणजोबांपर्यंत नानाविधं वयोगटांमधल्या ह्या व्यक्ती स्वतःची कुठलीही ओळख करुन न देता थेट घर बघायला लागतात, त्यांची लहान मुलं गाद्यांवर चढुन नाचत असतात. कोणी जाऊन बेसिनचा नळ सोडुन त्याला पाणी येतय का नाही किंवा टॉयलेटचा फ्लश चालतो का नाही अशा चाचण्या करत असतात. कोणीतरी एक जण टेप घेऊन दारं, खिडक्या, भिंती, माळे, ओटे अशा दिसेल त्या गोष्टींची लांबी-रुंदी मोजत असतात. जणू आपण तिथं नाहीच आहोत अशा अविर्भावात आपसांत हळू आवाजात काहीतरी बोलत अशा गुढ हालचाली करत असतात. ह्या सगळ्यांमधे नक्की घर कोणाला घ्यायचे आहे हे रहस्य शेरलॉक होम्सलासुद्धा बुचकळ्यात टाकू शकेल, तिथे आपली काय कथा. कधीकधी हे सगळे सोपस्कार झाल्यावर आपणंच नं राहुन विचारतो. तेव्हा असं कळतं की त्यापैकी कोणीच खरं गिर्हाईक नसुन "त्यातल्या एका व्यक्तीच्या दुसर्या गावात राहणार्या लांबच्या नातेवाईकाच्या १२ वीचा परीक्षा दुसर्यांदा देणार्या मुलाला पुढच्या वर्षी पुण्यात इंजिनीयरींगला अॅडमिशन मिळाली तर पुण्यात घर घेण्याचा त्यांचा विचार आहे" ह्या भक्कम कारणासाठी ते तत्परतेने घर बघायला आले आहेत.

हे लोक निघेपर्यंत अतिचिकीत्सक लोक यायला लागलेच असतात. ह्या लोकांचे एकेक प्रश्न म्हणजे सुवर्णाक्षरांनी लिहुन ठेवण्याच्या दर्जाचे असतात. आपण बिल्डींगमधला फ्लॅट विकत असलो तरी पाया त्या बिल्डींची गवंड्यापासुन रंगार्यापर्यंत सगळी कामं आपणंच केली आहेत अशा ठाम विश्वासानं ते आपल्याला प्रश्न विचारतात.
"पाया किती फूट खोल आहे?"
"स्लॅबमधे सिमेंट आणि कॉंक्रीटचं प्रमाण काय आहे?"
"इलेक्ट्रीक वायर कोणत्या कंपनीच्या आहेत?"
एवढ्यानं त्यांचं समाधान होत नाही. मग महानगरपालिकेतल्या सगळ्या विभागांची इत्यंभुत माहीती आपल्याला असायला पाहीजे या अपेक्षेने;
"बिल्डींगचा पाणिपुरवठा पालिकेच्या कोणत्या टाकीपासुन होतो?"
"समोरचा रस्ता कधी दुरुस्त होणार आहे?"
असे कोणतेही प्रश्न आपल्याला विचारले जातात. ह्या अशा लोकांबरोबर नेहमी एक कोणीतरी मित्र असतो ज्याला घराच्या खरेदी-विक्री व्यवहारातलं "सगळं कळतं". आत्तापर्यंत ५-६ वेळा घरं घेऊन आणि विकुनही त्यात काय "सगळं कळावं" लागतं ते मलातरी अजुन कळलेलं नाही. पण प्रत्यक्ष घर घेणार्यापेक्षा ह्या सगळं कळणार्या मित्रांचा त्रासंच जास्त असतो.

हे झालं स्वतः घर विकण्याबद्दल, जर एजंटला सांगितलं तर वेगळीच कथा जी नंतर केव्हातरी सांगेन!

पण सरतेशेवटी १-२ सज्जन आणि समजुतदार माणसं येतात. पहिल्या भेटीतच ते कोण हे आपल्याला कळतं आणि गोष्टी मार्गी लागायला लागतात. कारण लग्न जमण्याप्रमाणे घर घेण्या किंवा विकण्यासाठी योग जुळावा लागतो. अगदी वधुपित्याईतके नसलो तरी आपलं राहतं घर चांगल्या माणसांना द्यावं यासाठी आपण सतर्क असतो. त्या घरात आपल्या आठवणी असतात. आपण ते घर दुसर्याला विकुन तिथं पुढे राहणार नसलो तरी पुढे कधीही त्या रस्त्यावरुन जातांना त्या घराची ओळख "आमचं घर" अशीच करुन दिली जाणार असते. आपण नसतांनाही त्या घराची तितकीच काळजी घेतली जावी ह्या भावनेने एवढी धडपड करुन योग्य माणसं मिळाल्यावर हा सगळा अट्टाहास सार्थ वाटायला लागतो!