Tuesday, June 29, 2010

(घर)कर्माचा सिद्धांत

मी अनेक लोकांकडुन आणि पुस्तकांतुन त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. काहींचं बालपण "रम्य" होतं, काही थोर पुरुषांचं बालपण फार कष्टांचं होतं, काहीचं लाडाचं, काहींचं "खेड्यातलं" अशा अनेक प्रकारची वैषिष्ट्यपूर्ण बालपणे ऐकल्यावर मी म्हंटलं आपणही आपल्या बालपणाला असं काही नाव शोधावं. बराच वेळ विचार केल्यावर आणि घरच्यांशी चर्चा केल्यावर मला असं लक्षात आलं की बालपणंच नाही तर जन्मापासुन आत्तापर्यंतचं आपलं सगळं आयुष्य हे फक्त काम(चुकारपणा) करण्यात गेलं आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासारखे कमनशिबी असाल तर आधीच्या वाक्यातलं कंसाबाहेरचं मत माझं आणि कंसातलं मत घरच्याचं आहे हे ओळखायला तुम्हाला वेळ लागणार नाही. "चुकारपणा" मधे कामं चुकीची करणे आणि कामं चुकवणे हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत याची नोंद घ्यावी. खरं तर तुमची आणि माझी परिस्थिती सारखी आहे की नाही हे ओळखणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला जर चांगली कोथिंबीरीची जुडी निवडण्यापेक्षा चांगली नोकरी निवडणं सोपं वाटत असेल किंवा झेंडुच्या ढिगातुन "एकसारख्या आकाराची आणि रंगाची चांगली आणि ताजी" फुलं शोधण्यापेक्षा पुण्यातल्या लक्ष्मीरोडवर दिवाळीच्या आदल्या दिवशी बससाठी पार्किंग शोधणं सुकर आहे असं तुमचं मत असेल तर तुम्ही आणि मी "एकाच माळेचे मणी" आहोत हे नक्की!

आता आठवायला लागल्यावर असं लक्षात येतं की अगदी लहान वयात अतिशय बेमालुमपणे आपण ह्या घरातल्या कामांमधे ओढले जातो. सुरुवातिला "पेपर आणुन दे", "पाणी आण काकांसाठी" असं सांगितलं जातं आणि आपण लहान असुन ते केल्याबद्दल "अगदी सगळं कळत", "शहाणं ते बाळ" असं आपलं कौतुकही होतं. ह्या सगळ्याने आपण भारावुन जातो. हळुहळू कामांना भरती येते आणि कौतुकाला ओहोटी लागते. आणि हा हा म्हणता आपल्या नकळत कामाचं स्वरुप "(३ मजले पायर्या चढुन) ५ बादल्या पाणी आण, आज नळाला पाणी नाहिये" इथपर्यंत पोचलेलं असतं आणि "एवढे घोडे झाले तरी अक्कल म्हणुन येत नाही" हे कौतुकाचं स्वरुप झालेलं असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की मधल्या काळात आपलं बाह्यजगातलं व्यावसायिक, कला, खेळ ई. क्षेत्रातलं यश कितीही वाढलं असलं तरी त्याचा आपल्या घरातली कामं करण्याच्या क्षमतेवर अथवा घरच्यांच्या आपल्याबद्दलच्या मतांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे इतरांच्या नजरेत आपण कितीही कर्तृत्ववान आणि यशस्वी असलो तरी घरच्यांच्या लेखी आपली पात्रता ही केवळ "साधं तुंबलेलं बेसिन दुरुस्त करता येत नाही आणि म्हणे इंजिनीयर आहे" याच पातळीवर राहते.

ऑफिसातलं काम करणं त्यामानाने फार सोपं असतं हो! "काय, कसं आणि कधीपर्यंत" एवढ्यावर निभावतं. घरातली कामं करण्याचे निकष मात्र त्या कामाच्या स्वरुपानुसार "सकाळी उठल्या उठल्या, कुठल्या वाहनाने, कुठल्या रस्त्याने जाऊन, कुठली पिशवी वापरुन, कुठल्या दराने, शनिवार पेठेतल्या कुठल्याश्या गल्लीतल्या टोकाच्या दुकानातुन" अशा कोणत्याही थराला जाऊ शकतात. घरातल्या कामांमधला सर्वात अवघड भाग म्हणजे हे असले ढोबळ आणि अतिशय सापेक्ष निकष. "एक किलो बटाटे आण" एवढ्यावर गाडी थांबत नाही. "एक किलो बटाटे आण, आणि हे बघ, ती कापडी पिशवी आहे ना, पट्ट्यापट्ट्यांची... ती नाही रे, ती तेलाची पिशवी आहे, ती कशी चालेल बटाट्यांना? जरा तरी डोकं वापरा, नुसते चांगले मार्कं मिळाले म्हणजे सगळं येत नाही ... हां, ती पिशवी. कोणाकडुनही घेऊ नकोस, त्या बाजारात जरा वयस्कं भाजीवाला आहे एक, त्याच्याकडे चांगली असते भाजी, त्याच्याकडुनच आण. १२ रु किलोच्या वर भाव नाहियेत. अगदी नाहीच मिळाले तर थोडा जास्त भाव चालेल. काटा नीट बघ एक किलो होताहेत का नाही ते. नाहीतर वेंधळ्यासारखं तो देईल ते आणाल. बटाटे तू निवडुन घे नीट. फार मोठे नको आणि फार लहानही नको, आणि त्याना मोड आलेले नको, फार ओबडधोबड आणि माती लागलेले असतिल तर आणू नको" एवढं लांबलचक भाषण म्हणजे एक काम असतं. हे सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आपण भाजीबाजारात पोचलो असता आपल्याला लक्षात येतं की सगळेच भाजीवाले "थोडे वयस्क" ह्या प्रकारात मोडणारे आहेत. लिंबापासून सुरणाच्या आकारापर्यंत सर्व आकाराच्या बटाट्यांचे ढिग सगळीकडे रचलेले आहेत आणि १५ रु किलोखाली एकाही ठिकाणी भाव नाहीये. घरातल्या कामांमधे यशस्वी होण्यासाठी सर्वात मह्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं डोकं कधीही वापरु नये. १५ रु ही किंमत १२ रु पेक्षा "थोडी जास्त" आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर स्थळ, काळ, ऋतु, पर्जन्यमान, ईतर भाज्यांचे भाव यांवर अवलंबुन असल्याने ते काहीही असू शकतं. त्यामुळे ह्या आणि यासारख्या इतर अनेक गोष्टींमधे आपण स्वतःचं डोकं वापरुन काहीही काम केलंत तरी ते चूकच असतं. त्यापेक्षा पडलेल्या खेपेची पर्वा न करता सरळ घरी जाऊन "आता काय करु?" असा प्रश्न निर्लज्जपणे विचारावा आणि त्या अनुशंगाने आपल्या सामान्यज्ञानाच्या कमतरतेबद्दल उच्चारली जाणारी अपमानास्पद विधाने निमुटपणे ऐकुन घ्यावी. चुकलेल्या कामाबद्दल ऐकाव्या लागणार्या बोलण्यांपेक्षा ती कमी त्रासदायक असतात. हल्ली मोबाईलमुळे ग्रामीण भागात आणि देशात क्रांती झाली आहे असं म्हणतात. पण माझ्या मते ह्या मोबाईल फोनचा सगळ्यात जास्त फायदा "आता काय करु?" हा प्रश्न विचारण्यासाठी चार हेलपाटे घालायला लागणार्या आमच्यासारख्या लोकांनाच झाला आहे.

भाज्यांच्या आणि विशेषतः फळांत्या बाबतीत तर विधात्याने आमच्यासारख्या लोकांची फार क्रूर चेष्टा केली आहे. कारण फळ "आतुन नीट पिकलेलं आणि गोड" आहे की नाही हे आपल्याला मात्र "बाहेरुन" ओळखायचं असतं. एवढी चराचर सृष्टी निर्माण केली, एक फळ पिकलेलं आहे की नाही हे दर्शवणारी एकसारखी खुण बाहेरुन नीट दिसेल अशी सगळ्या फळांवर ठेवणं असं कितीसं अवघड होतं? बरं प्रत्येक फळासाठी हे वेगवेगळ्या पद्धतीने ओळखावं लागतं. काहूींचं रंग बघुन, काहींचा वास बघुन, काही दाबुन बघायची असतात तर काही वाजवुन! फळांचं एक तर भाज्यांचं दुसरंच. भेंडीचा देठ सहज मोडला तर ती कोवळी, तोंडली आतुन लाल नको , एक ना दोन! हे सगळं असुन आपण घेतलेली फळं बहुतांशी वेळा न पिकलेलीच असतात. अशा वेळी "मी काय करणार, गीतेत सांगितल्याप्रमाणे मी फक्त कर्म केलं, (पिकलेल्या) फळाची अपेक्षा ठेवली नाही" असा पाचकळ विनोद केला असता परिस्थिती सूधारण्याऐवजी अजुम बिकट होते हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. चांगल्या भाज्या आणि फळं ओळखण्याच्या सगळ्या खुणा जो लक्षात ठेऊ शकेल तो काय हो उद्या मराठी व्याकरणातले सगळे प्रत्यय आणि अलंकारही पाठ करेल.

पण या सगळ्या गोष्टी सुसह्य म्हणाव्यात अशी अजुन एक त्रासदायक गोष्ट म्हणजे भाव करणे अथवा घासाघीस करणे. "सांगितलेल्या किमतीला कधीही गोष्ट घ्यायची नाही" ही शिकवण लहानपणापासुन पाळण्याचा प्रयत्न करुनही माझ्यासारख्या "मुखदुर्बळ" माणसाला एका रुपयानीसुद्धा भाव कमी करता येत नाहीत. मला वाटतं माझ्यासारखी बावळट आणि बिचारी माणसं ओळखण्यासाठी भाजीवाले आणि दुकानदारांना तिसरा डोळा असावा. कारण ज्या दुकानात आई गेली असता
"फ्लॉवर कसा दिला?"
"८ रुपये पाव ताई"
"काहीही भाव काय सांगता, अर्धा किलो घ्यायचाय, नीट सांगा"
"ठिक आहे ताई, घ्या ६ रुपयानी"
असा संवाद होतो त्याच ठिकाणी मी गेल्यावर मात्र
"फ्लॉवर कसा दिला?"
" (माझ्याकडे संपू्र्ण दुर्लक्ष करत) ८ रुपये पाव"
"अहो नीट सांगा की, २ किलो घ्यायचाय"
"(वैतागलेल्या आवाजात) पाव किलो घ्या नाहीतर १० किलो, एकच भाव"
असं चित्र असतं. बोहनीसाठी ईतरांना अर्ध्या किमतीत माल विकणारे दुकानदार मला मात्र "ओ साहेब, कशाला भवानीच्या टायमाला वेळ खराब करता" असं म्हणून वाटेला लावतात.

काही कामं मात्र वर्षानुवर्ष जशीच्या तशी राहतात दळण आणणे आणि रद्दी विकणे ही रविवार सकाळ खराब करणारी कंटाळवाणी कामं इतक्या वर्षांनीदेखील माझा पिच्छा सोडत नाहीत। आधी पायी जायचो, मग सायकलवर, मग दुचाकी आणि आता चाकचाकीतुन जातो तरी या कामांचं स्वरुप आणि ती करण्याचा येणारा कंटाळा ह्यात तसुभरही फरक पडलेला नाही. ह्या कामांची एक अवस्था तर "संस्कार" ह्या नावाखाली करायला लागणार्या कामांची दुसरी. "स्वावलंबन" ह्या सदराखाली "चहा प्यायल्यावर स्वतःची कप बशी धुउन ठेवणे आणि जेवणानंतर स्वतःचं ताट उचलुन ठेवणे" अशा "हातासरशी" करायच्या कामांची मला इतकी सवय झाली की एकदा मी टपरीवजा हॉटेलात चहा पिऊन थर्माकोलचा कप विसळुन बेसिनवर पालथा घातला आहे आणि एका पंचतारांकीत हॉटेलात स्वतःचं ताट उचलुन आत नेऊन ठेवलं आहे. त्यातुन मला लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे गाळ्यातली चहाची टपरी असो अथवा पंचतारांकीत हॉटेल, "येडा का खुळा" या भावनेने आपल्याकडे बघणार्या नजरा दोन्हीकडे तितक्याच बोचर्या असतात.

कधी कधी घरातली काही कामं करण्यासाठी माणसं शोधुन आणणे हेच एक मोठं काम होऊन बसतं. प्लंबर आणि ईलेक्ट्रिशियन ह्यांचा अशा प्रकारच्या कामांच्या क्रमवारीत वरचा नंबर लागतो. पण कुठल्याही प्रकारची कामाला ही मंडळी "इतकी छोटी कामं करायला टाईम नाही आपल्याला साहेब" असं म्हणुन समोरच्या दुकानदारीशी स्थानिक राजकारणावर चर्चा करायला लागुन त्यातच त्यांच्या वेळेचा सदुपयोग आहे याची जाणिव आपल्याला करुन देतात. मग अशी कामं आपण घरीच करण्याचा प्रयत्न करतो. घरात योग्य काम करण्यासाठी योग्य अवजार सापडेल तो दिवस सुवर्णाक्षरांनी नाही तर किमान पितळ्याच्या अक्षरांनी तरी कुठेतरी लिहुन ठेवला पाहीजे. माझ्या या वाक्यामागचा कळवळा ज्यानी स्क्रू-ड्रायव्हर नाही म्हणुन सुरीच्या टोकानी स्क्रू काढणे , पकड नाही म्हणुन सांडशीने नट ढिला करणे, हातोडी नाही म्हणुन बत्त्याने खिळा ठोकणे (आणि ते करताना स्वतःच्या अंगठ्यावर बत्ता मारुन तो काळा निळा करुन घेणे) ही दिव्य पार केली असतिल त्याला कळेल.

असो, आता काय सांगावं आणि किती सांगावं? मस्त सुटीच्या दिवशी गोडाचं जेवण झालेलं असतं, निद्रादेवीचा आराधना करायला डोळे आतुर झालेले असतात, वामकुक्षी घ्यायला आपण निघणार तेवढ्यात "अरे जरा पटकन पायी जाउन कोपर्यावरुन बारीक रवा घेऊन ये पाव किलो। संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, उपमा करायचा आहे. आणि थोड्या मिरच्या पण आण, चांगल्या तिखट, मागच्या वेळेसारख्या नको ..." अशी आज्ञा ऐकू येते. "दैव देतं आणि कर्म नेतं" ह्याचा असाही अर्थ होऊ शकतो असा साक्षात्कार दैवाने दिलेली झोप हे घरकर्म नेतं तेव्हा आपल्याला होतो. संध्याकाळी येणार्या पाहुण्यांबद्दल अपशब्द पुटपुटत आपण कामाला लागतो. थोरामोठ्यानी सांगितलेले कर्माचे सिदुधांत कळण्याईतकी माझी बुद्धी नाहूी. पण माझ्या मर्यादीत बुद्धीप्रमाणे आमचा घरकर्माचा सिद्धांत एवढंच सांगतो की घरातली कामं टाळण्याचा तुम्ही केलेला प्रयत्न आणि तुम्हाला करावी लागणारी कामं ह्याची गोळाबेरीज ह्याच आयुष्यात शून्य होते. त्यामुळे आपल्याकडे येणारं प्रत्येक काम टाळंटाळ न करता तडीस नेण्याचा प्रयत्न करत राहणं हीच ह्यातुन मुक्तीची सगळ्यात सोपी वाट आहे!

Tuesday, April 06, 2010

सहभोजन

सर्वांनी मिळुन बाहेर जेवायला जाणे हा आमच्या घरातिल अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. "धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय" या वाक्प्रचाराचं ते आमच्याकडलं उत्तम उदाहरण आहे. बाहेर जेवायला जाण्याच्या आमच्या ह्या कार्यक्रमात अनेक नानाविध वादांचा आणि भांडणांचा समावेश असतो.

सर्वात पहिला वाद म्हणजे "कुठे जायचं?" हा! या विषयावर एकमत न होण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाला दर वेळी वेगवेगळं काहीतरी खायचं असतं. कुणाला चायनीज, कुणाला थाळी, कुणाला सामिष, कुणाला सीझलर ... एक ना दोन! आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना हवा तो पदार्थ एकाच ठिकाणी मिळू शकेल असं हॉटेल या भूतलावर अजुन यायचंय. आता एकदा वाद सुरू झाला की मूळ विषय सुटायला फारसा वेळ लागत नाही. मग भूतकाळातल्या संपूर्णपणे असंबद्ध गोष्टींवर एकमेकांशी अर्धा-पाऊण तास तावातावाने भांडण होतं. इतकी बाष्फळ बडबड केल्याने सगळ्याना भुक लागते आणि मग गाडी पुन्हा मूळ विषयाकडे वळते. सरतेशेवटी त्या दिवशी ज्या व्यक्तिचा आवाज सगळ्यात मोठा निघेल त्याचं म्हणणं ऐकलं जाऊन हॉटेल निश्चित होतं. बहुतांशी वेळा तो आवाज स्त्रीवर्गापैकी कोणाचातरी असतो हे जाणकारांस वेगळे सांगायला नकोच. मग एकमेकांना आवरायला लागणार्या वेळेबद्दल ताशेरे ओढले जातात आणि सभा बरखास्त होऊन सगळे आपापल्या खोल्यांमधे तयार व्हायला जातात.

खरं तर नेहेमी पासुन असं नव्हतं. लहानपणी आम्ही, म्हणजे आई, बाबा, मी आणि माझा मोठा भाऊ या विषयावर इतके भांडायचो नाही. तेव्हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे हॉटेलात जाणे ही क्रिया "चैन" या प्रकारात मोडायची, "गरज" या प्रकारात नाही. हॉटेलची आणि तिथे गेल्यावर ऑर्डर करायच्या गोष्टींची निवड ही "बजेट" या एकाच गोष्टीवर अवलंबुन असायची. आता काळ बदलला, परिस्थितीही थोडी बदलली. आम्हाला आमची स्वतंत्र मतं आली (म्हणचे आई-बाबांच्या भाषेत आम्हाला "शिंग फुटली"). आमच्या लग्नानंतर मतभेदांत भर घालायला पूर्णपणे वेगळ्या मतप्रवाहांच्या व्यक्तिंचा कुटुंबात समावेश झाला. त्यामुळे हॉटेलच्या निवडीत आता "घरापासुनचं अंतर", तिथे मिळणार्या गोष्टींचं नाविन्य, तिथे जागा मिळायला लागणारा वेळ अशा अनेक बाबींनी गोंधळात भर घातली आहे.

पण ह्या गोष्टी बदलल्या असल्या तरी लहानपणच्या काही सवयी मात्र आता कायम तशाच राहतील. उदाहरणार्थ हॉटेलात सॅलड-रायता अथवा मसाला पापड हे पदार्थ कधीही ऑर्डर करायचे नाहूीत. याच सरळ साधं कारण म्हणजे उगाचच "इटालियन", "रशियन", "ग्रिन" अशा नावाची सॅलड शेवटी फक्त ताटलीत नीटशा रचलेल्या गाजर-काकडी-टमाट्याच्या चकत्याच असतात असं आईचं ठाम मत होतं. आणि त्यासाठी अथवा पापडावर भिरभिरलेल्या कांदा-कोथिंबिरीसाठी किंवा दह्यात साखर आणि बुंदी कालवलेल्या रायत्यासाठी उजव्या रकान्यातला आकडा कधीही योग्य किंमत दर्शवू शकत नाही हे आमच्या मनावर बिंबलं गेलं आहे. तशीच दुसरी गोष्ट म्हणजे ice cream.हॉटेलात मिळणारं ice cream हे बाहेर दुकानात मिळणार्या ice cream पेक्षा महाग असल्याने ते तिथे न खाता जेवणानंतर दुसर्या एखाद्या दुकानात जाऊन खायचं. या गोष्टींची मला आणि माझ्या भावाला ईतकी सवय झाली आहे की हॉटेलाच वेटरने सॅलड-रायता-पापडृice cream हे शब्द उच्चारायला सुरुवात करताच आमच्या मेंदुकडुन मानेला आपोआप संकेत जाऊन आमची मान क्षणार्धात नकारार्थी हलायला लागते.

हॉटेलच्या निवडीसंदर्भातला वाद ही निव्वळ सुरुवात असते. तिथे गेल्यावर ऑर्डर काय करायचं हा पुढचा वादाचा मुद्दा. ऑर्डर करताना आमच्यातला प्रत्येकजण वेगवेगळ्या भयगंडाने पछाडलेला असतो. मी आणि भाऊ ऑर्डर कमी तर पडणार नाही ना ह्या भितीने, आमतच्या सहचारीणी ऑर्डर जास्त होऊन उरणार तर नाही ना या भितीने, आई बिल जास्त होणार नाही ना या भितीने तर बाबांना कढीपत्ता आवडत नसल्याने पदार्थात कढीपत्ता तर नसेल ना या भितीने ते पछाडलेले असतात. त्यांची ही भिती या थराला पोचली आहे की इटालियन पास्ता ऑर्डर करतानाही त्यात कढीपत्ता नसतो ना याची ते वेटरला विचारुन खात्री करुन घेतात. स्त्रीवर्गाचं लक्ष आपण काय ऑर्डर करायचं यापेक्षा आपले नवरे काय खाताहेत याकडे जास्त असतं. इतकं खाल्यानेच आमची वजनं कशी "भरमसाठ" वाढली आहेत याची जाणीव पहिला घास तोंडात जाण्याआधीच आम्हाला करुन दिली जाते. किमान त्या विचाराने तरी खाल्लेलं अन्न अंगी लागणार नाही अशी वेडी आशा त्यांना वाटत असावी. ह्या सगळ्या गोंधळात वेटरच्या स्मरणशक्तीनुरुप काहीतरी ऑर्डर दिली जाते. जणू हे सगळं कमी आहे की आता यात तिसर्या पिढीच्या मतांचीही भर पडली आहे. माझी पुतणी आता काय खायचं याबद्दल स्वत:चं मत असण्याईतकी मोठी झाली आहे. हल्ली हे वय ४ वर्षे असतं हे ईथं नमूद करायला पाहीजे. तिला काय पाहीजे हे जरी माहित असलं तरी कुठे काय मिळतं हे तिला कळत नाही आणि त्यामुळे अतिशय चमत्कीरीक प्रसंगांना आम्हाला तोंडी जावं लागतं. एकदा आम्ही "फक्त शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीय थाळी मिळेल" अशा अस्सल ठिकाणी आम्ही गेलो आणि सगळ्यांसाठी थाळी सांगितली. आपल्याला न विचारता ऑर्डर दिल्याचा तिला राग आल्याने ती एकदम खुर्चीवर उभी राहुन "मला चिकन लॉलिपॉप पाहीजे...." असं ती मोठ्याने ओरडुन वेटरला सांगायला लागली. चिकन हा शब्द त्या ठिकाणी पहिल्यांदाच उच्चारला गेला असावा कारण तो कानावर पडताच तिथल्या एक-दोन वेटरच्या हातातली भांडी गळुन खाली पडली, एखाद्याला चक्कर आल्यासारखंदेखील वाटलं. तरी नशीबाने गल्ल्यावर बसलेल्या सत्तरीपलीकडल्या आजोबांना कमी ऐकु येत असल्याने त्यांना हे कळलं नाही. नाहीतर त्या जागीच त्यांच्या तोंडाला फेस येऊन डोळ्यांना कायमची उर्ध्व लागली असती.

एकदा सांगितलेले पदार्थ आले की स्त्रीवर्गाकडुन त्याची चव, त्याची पाकक्रुती, त्याची अवाजवी किंमत , तोच पदार्थ आपण घरी कसा अजुन चांगला करु शकतो, तो पदार्थ ईथल्यापेक्षा अमुक एका ठिकाणी कसा चांगला असतो इत्यादी विषयांवर टिप्पणी होते. घरी केलेल्या एखाद्या पदार्थाबद्दल आपण मत व्यक्त करायला गेलो असता "पानातल्या अन्नाला नावं ठेवू नयेत" ही आपल्याला दिली गेलेली शिकवण इथे सोयीस्करपणे नजरेआड केली जाते. सरतेशेवटी ठरल्याप्रमाणे "हे पहा किती उरलंय, तरी सांगत होते", "इतकी टीप कशाला द्यायला पाहीजे" ह्या विषयांवर वक्तव्य करुन "आपण सगळ्यानी यापुढे एकत्र हॉटेलात जायलाच नको ना" असा ठराव पास करुन आम्ही घरी यायला निघतो.

काही दिवस असेच जातात, नवीन वर्षाच्या निश्चयांप्रमाणे हा ठराव पण लगेच बारगळतो. उगाचच एखादं क्षुल्लक कारण काढुन त्यानिमित्त बाहेर जेवायला जायचा प्रस्ताव कुणीतरी मांडतं आणि २ मजले खाली ऐकू जाईल अशा आवाजांत आमच्या भविष्यातला हास्यकारक अशा अजुन एका आठवणीची जोरदार सुरुवात होते.

Tuesday, February 16, 2010

कृष्णविवर

आपल्या महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटुंबामधे घर घेताना अथवा बांधताना ; "घरातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली?" या विषयावर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तोडीस तोड दर्जाचे मतभेद आणि वादविवाद असतात. पण कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला माहिती असेलच, की अशा वादांमधे तर्क , मुद्दे असल्या गोष्टींना काहीही स्थान नसुन घरातल्या मुख्य स्त्रीचं काय म्हणणं आहे त्यालाच महत्व असतं. आणि अशा वेळी स्त्रीवर्गाकडुन ज्या दोन गोष्टी सर्वप्रथम पाहिल्या जातात त्या म्हणजे स्वयंपाक घरातल्या ओट्याची लांबी किती आहे आणि त्या घरात किती माळे आहेत. घरातल्या खोल्याच्या आकारापेक्षा कपाटासाठी भिंतीत एखादी खाच असेल तर ती खोली जास्त आवडते. बाल्कनी मधुन दिसणार्या देखाव्यापेक्षा कुंड्या ठेवण्यासाठी कठड्यावर असणारी जागा जास्त महत्वाची असते. आणि खिडक्यांमधुन प्रकाश आणि वारा येतो का नाही यापेक्षा मांजर आत येऊ शकत नाही ना य़ाची काळजी जास्त असते.

तर अशा बुचकळ्यात पाडणार्या अनेक गोष्टींमधे घरातत्या माळ्यांबद्दलची आत्मियता मला सगळ्यात चमत्कारीक वाटते. तसं पाहिलं तर दाराच्या अथवा खिडकीच्या वर, छपरापासुन दीड हात जागा सोडुन, भरपुर वजन पेलू शकेल अशा ताकदीची विटांची रचना याव्यतिरीक्त त्या माळ्यात वर्णन करण्यासारखं काहीही नाही. त्यात कोणताही सौंदर्यभाव अथवा वास्तुशास्त्राचं कौशल्य देखील नाही.

जसं जसं घर लागायला लागतं आणि सामान वाढायला लागतं, तसे हळुहळ् हे माळे आपलं महत्व पटवायला लागतात. रोजच्या वापरात न लागणार्या, जून्या झालेल्या, बोजड, फेकुन द्यायच्या लायकीच्या असु कोणत्याही गोष्टीबद्दल "काय करु याचं?" असा प्रश्न विचारला असता तात्काळ "माळ्यावर टाक" असं उत्तर मिळतं. रद्दी, गाद्या, जुने कपडे, जास्तीची स्टीलची भांडी, धान्याचे डबे, चौरंग, पाट ... एक ना दोन, शेकडो गोष्टींची रवानगी माळ्यावर होते. त्या क्षणी त्या गोष्टी लवकरात लवकर नजरेआड करायच्या घाईपोटी काहीही विचार न करता आपण जमेल तशा गोष्टी माळ्यावर नुसत्या फेकत जातो.

अर्थातच अशामुळे त्या माळ्यांवरची झालेली अडगळ नजरेला फार काही सुखावणारी नसते. मग त्याची लाज वाटायला लागुन, आलेल्या पाहुण्यांपासुन ते दृश्य लपवण्याची आपली धडपड सुरू होते. मग माळ्यांना दारं करुन घेणं परवडत असेल तर ते, ते नाही जमलं तर घरातले जुने पडदे उंचीला कमी करुन लावणे आणि तेही शक्य नसल्यास जुन्या चादरी टाकुन तो पसारा झाकणे असे अनेक मार्ग अवलंबले जातात.

या सगळ्या प्रकारात सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे "माळ्यावरची जागा संपली" असं कधी होतच नाही. कसंही आणि कितीही सामान भरलं तरी अजुन एखादी गोष्ट ठेवायला एखादा कोपरा, दोन ट्रंकांच्या मधे, कपड्यांची गाठोडी थोडी आत दाबुन अशा कुठुन तरी ती जागा निर्माण होते. लहानपणी विज्ञानात "कृष्णविवर" नावाची गोष्ट शिकल्याचं मला आठवतंय. सूर्यकिरणांसकट कोणतीही गोष्ट शोषुन घेणारं, कितीही वस्तुमान सामावुन घेण्याची क्षमता असणारं असं हे कृष्णविवर. माळ्यांकडे बघुन मला त्यांची तुलना या कृष्णविवराशी कराविशी वाटते. पण कृष्णविवरात लुप्त झालेली गोष्ट पुन्हा बाहेर येणं ही महाकठीण गोष्ट. तसेच आपले हे माळे. माळे भरतांना केलेल्या घाईची आणि धसमुसळेपणाची सगळी शिक्षा त्यातुन गोष्टी परत बाहेर काढतांना आपल्याला मिळते.

एरवी कधीही न लागणारी एखादी गोष्ट एक दिवस एकदम महत्वाची होऊन जाते. ती मग इतक्या तत्परतेने हवी असते की हातातली सगळी कामं सोडुन (आणि त्याहुन वाईट म्हणजे कधी कधी सुटीच्या दिवशीचा आराम सोडुन) आपल्याला माळे धुंडाळायची वेळ येते. ही "महत्वाची" गोष्ट म्हणजे काहीही असु शकतं. कधी पाहुणे येणार या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करण्यासाठी कोणत तरी जुन्या घाटाचं पितळ्याचं पातेलंच काय हवं असतं. आधी वजन वाढल्यामुळे लहान झालेल्या कपड्यांमधला एखादा आवडता ड्रेस आता आपण परत कसे बारीक झालो आहोत हे इतरांना दाखवण्यासाठी त्या दिवशी तोच हवा असतो. तर कधी रेडीओ मधे बिघाड झाल्यावर जुन्या कागदपरत्रांच्या अनेक पिशव्यांमधुन त्या रेडीओच्या वारंटीचा छोटासा कागद हवा असतो. त्यातुनही माळे शोधण्याचं काम टाळण्यासाठी आपण आधी कपाटाच्या खालच्या कप्प्यात अथवा पलंगाखाली ती गोष्ट मिळते आहे का ते शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो ज्यातुन निराशेपलिकडे काहीही साध्य होत नाही.

सरतेशेवटी माळे शोधायच्या मोहीमेची आपल्याला तयारी करावी लागतेच. मोहीमेची सगळ्यात पहीली पायरी म्हणजे ती गोष्ट कुठल्या माळ्यावर, कोणत्या गाठोड्यात अथवा बॅगेत आहे हे आठवण्याचा प्रयत्न करणे. बहुतांशी ती गोष्ट कुठे ठेवली हे कोणालाच आठवत नसतं. तरीही माळ्यावरचं सामान चढवणारे आणि उतरवणारे मजुर आपणच असल्याने आपल्याच स्मरणशक्तीच्या कमतरतेबद्दल ताशेरे ओढले जातात. तो अपमान गिळुन आपण मोहीमेच्या पुढच्या पायरीची तयारी करायला लागतो, आणि ती म्हणजे माळ्यापर्यंत कस पोचायचं ते ठरवणे. कारण माळ्यावरच्या कोणत्याही कोपर्यापर्यंत हात पोचू शकेल इतपत उंचीची खुर्ची, स्टुल अथवा शिडी घरात ठेवण्याची दुरदृष्टी आपल्यात नसतेच. मग चौरंगावर स्टुल ठेवणे अथवा खुर्चीच्या हातांवर उभे राहणे इत्यादी डोंबार्याचे खेळ सुरु होतात. एवढं करुनही हव्या त्या बॅगेपर्यंत हात पोचत नसल्यास कुंचा अथवा कपडे वाळत घालायची काठी हातात घेउन त्या बॅगेच्या हँडल मधे अडकवुन ती ओढण्याचा विफल प्रयत्न आपण करतो. इतक्यात आपल्या या नसत्या उपद्व्यापामळे माळ्यावर शांतपणे आपल्या दृष्टीआड वास्तव्य करत असलेले सरपटणारे प्राणी बाहेर येतात. आणि मग "अगंबाई पाल!" असे उद्गार कानावर पडुन आपल्या पायाखालचा डुगडुगणारा डोलारा सांभाळणारे हात आपल्याला अक्षरशः ताटकळत (किंवा कधी कधी माळ्याला लोंबकळत ठेवुन ) नाहीसे झाले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. कधी भांडीच काय डोक्यात पडतात, कधी आपणच डोक्यावर खाली पडतो असा विलक्षण मनोरंजक कार्यक्रम चालु असतो. त्यातुन माळ्यावरची गोष्ट शोधायला निघालेला माणुस हा नशिबासाठी विनोद करण्याची सुवर्णसंधीच असते. आपल्याला हवी असलेली गोष्ट ही नेहमी शेवटच्या माळ्यावरच्या शेवटच्या गाठोड्यातच असते.

तर असा हा माळा वर्षानुवर्ष कोणाच्या अध्यात मध्यात न करता, सगळ्यांच्या नजरेआड, "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" अशी कोणतीही तक्रार न करता ओझं घेउन उभा असतो. कधीतरी नको ते सामान फेकुन देण्याच्या उद्देशाने तो आवरण्यासाठी खाली काढला जातो आणि "हे राहुदे, लागेल कधीतरी" असं करत काहीही न फेकता सगळं सामान परत तसंच वर टाकलं जातं.

आणि अशाच माळा आवरण्याच्या एखाद्या प्रसंगी हाच अडगळीचा माळा जादुची कांडी फिरवावी तसा खजिना होउन जातो. कधी लोखंडी ट्रंकेत जपुन ठेवलेली, वाळवी लागुन खराब झालेली, शाळेला मॅच जिंकवुन देताना वापरलेली बॅट सापडते. कधी लहानपणी तबला शिकतांना बोल लिहीण्यासाठी वापरलेली वही, तिच्या पानात जपुन ठेवलेली पिंपळाच्या पानाची जाळी किंवा एक रुपयाची नोट सापडते. कधी आजीचा जुन फोटो तर कधी लहानपणच्या विसरुन गेलेल्या एखाद्या मित्राचं पत्र सापडतं. आई-बाबांच्या कडेवर बसुन असलेला फोटो आपण बर्याच दिवसात त्यांच्याबरोबर म्हणावा तसा वेळ घालवला नाहीये याची आठवण करुन देतो. घरातल्या माळ्याबरोबर आपल्या मनातला पण असाच एक माळा पण उघडला जातो, जिथे अडगळ समजुन कोंबलेल्या जुन्या आठवणी, "नंतर केव्हातरी.. वेळ मिळेल तेव्हा" अशी पुढे ढकललेली स्वप्न आपण झाकुन ठेवलेली असतात. आणि अशा वेळी क्षणार्धात घरात आणि मनात माळ्याचं महत्व काय आहे हे कोणीही न सांगता आपल्या लक्षात येतं.

असाच एक दिवस माळा आवरताना, कॉलेजात असताना केलेल्या लिखाणाची वही सापडते, कोणे काळी आपल्याला लिहीण्याची आवड होती याची आठवण होते आणि तब्बल साडे तीन वर्षांनंतर मी असा एखादा ब्लॉग लिहायला बसतो.