Friday, March 21, 2014

घर पहावं विकुन!

    "लग्नं पहावं करुन आणि घर पहावं बांधुन" हे वाक्प्रचार आपल्याला काही नविन नाही. पिढ्यान् पिढ्या ते चालत आले आहेत. नविन घर बांधणार्यांच्या सगळ्या "मजा" पुलंनी "मी आणि माझा शत्रुपक्ष" मधे लिहुंन ठेवल्या आहेतच. पुर्वी माणसं आयुष्यात एकदाच घर बांधत असांवित. पण आजकाल आपण तयार घरं विकत घेतो आणि कधी कधी विकतो देखिल. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, घर विकण्याचा प्रसंग आत्तापर्यंत माझ्या नशिबी एक-दोन वेळा नाही तर तब्बल तीन वेळा आला आहे. त्यावेळच्या अनुभवांकडे बघता "घर पहावं विकुन" हा वाक्प्रचार रुढ व्हायला फारसा वेळ लागणार नाही असं माझं मत आहे.

    घर विकायचा आपला निर्णय झाला का तो तडीस नेण्याआधी सर्वप्रथम आपल्यापुढे उभा राहणारा प्रश्न म्हणजे 'घर स्वतः विकायचं की इस्टेट एजंटमार्फे ?' तसं पाहता हा प्रश्न आणि झालेला आजार बरा होण्यासाठी 'एरंडेल पिता की कार्ल्याचा काढा ?' ह्या प्रश्नात फारसा फरक नाही. दोन्ही पर्याय तितकेच बिकट. पण दोन्हीतला एक पर्याय निवडणं भाग असतं.

    आपण स्वतः घर विकायचं ठरवलं तर त्यासाठी चढावी लागणारी पहिली पायरी म्हणजे घर विकण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देणे! प्रथमदर्शनी ही गोष्ट अतिशय सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष कथा जरा वेगळी असते. ह्या जाहिरातींची जागा अक्षरांनी मर्यादित असते. त्यात देखील किती उभी आणि किती आडवी हे सुद्धा ठराविकच. त्यामुळे जाहिरातिंचा मजकुर लिहीणे म्हणजे तार लिहीणे (किंवा आजकालच्या काळात SMS लिहीणे) आणि शब्दकोडे तयार करणे यांची सांगड घालण्यासारखे आहे. शक्यतो शब्द अर्धा तोडावा लागु नये त्यामुळे तो कोणत्या आडव्या रांगेत बसू शकतो ह्याचे भान ठेवुन घरासंबंधी शक्य तितकी जास्त माहिती अर्थ लागेल अशा क्रमाने मांडणे हे साधंसुधं काम नाही.

    अर्थातच ही कला काही सगळ्याना अवगत नसते. त्यातुन आपण दिलेला मजकुर आणि प्रत्यक्षात वृत्तपत्रात छापुन आलेला मजकुर ह्यात हॉटेलमधे आपण सांगितलेली ऑर्डर आणि प्रत्यक्षात आपल्या समोर येणारं अन्नाईतकंच साम्य असतं. ह्या सगळ्या गोंधळामुळे कधीकधी अतिशय चमत्कारीक जाहिराती छापुन येतात. उदाहरणार्थ:-

"विकणे, ७३५, १ कार वर्ष हड
  पसर ५ जुना चौथा एजंट क्षमस्व
  अपेक्षा सकाळी ९ ते संध्या
  काळी ५, २५ ला त्वरीत
  व्यवहारास प्राधान्य फो १२३४५६७८ "

गुप्तहेरांच्या सांकेतिक भाषेलाही लाजवेल अशा ह्या जाहिरातितुन मराठी विषयाच्या परिक्षेतल्या पेपरमधल्या "शब्दांच्या जोड्या लावा" ह्या प्रश्नाप्रमाणे आपल्याला अर्थ "शोधावा" लागतो.

म्हणजे, ७३५ हे घराचे क्षेत्रफळ असावे. "५ वर्ष जुना" हे घराचे वय असावं. "हड" आणि "पसर" ह्या वरवर असंबद्ध वाटणार्या शब्दांना जोडल्यावर बनणारा शब्द "हडपसर" हा पुण्यातला एक भाग आहे जिथे हे घर असावे. "१ कार" म्हणजे घराबरोबर १ गाडी मोफत असल्याचा गोड गैरसमज न करता एका गाडीच्या पार्कींगची जागा देखील असावी. "चौथा" हा घराचा मजला असावा कारण फक्त चौथ्या एजंटलाच क्षमस्व म्हणावं असा काय अपराध त्याच्या हातुन घडणार? "एजंट क्षमस्व" म्हणजे एजंटनी संपर्क करू नये. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही संपर्काची वेळ असावी. २५ ला म्हणजे २५ लाख ही अपेक्षित किंमत असावी असा कयास बांधला तर थोडीफार सुसंगती सापडते.

जाहिरातित कमी जागेत शॉर्टकट वापरुन जास्तित जास्त माहिती देण्याचा अट्टाहास करण्याचं कारण म्हणजे त्यामुळे काही निरर्थक फोन करणार्‌या लोकांपासुन आपली सुटका होईल ही वेडी आशा!

आमच्या पुण्यात तरी अशी अपेक्षा ठेवणे निरुपयोगी आहे. कारण प्रत्यक्ष जाहिरात छापुन आल्यावर घर विकण्याची पुढची पायरी म्हणजे त्या अनुशंगाने येणार्‌या फोनकॉल्सना उत्तर देणे. ही पायरी चढण्याचा प्रयत्न कमजोर मनाच्या अथवा शीघ्रकोपी माणसाने कदापी करु नये. कारण फोनवरील निरर्थक आणि चिडस्पद प्रश्नांना उत्तरं देता देता संतापाने अथवा नैराश्याने (किंवा " शेण खाल्लं आणि घर विकायला निघालो" ह्या अपराधी भावनेने ) आपल्या तोंडाला फेस येऊन वाढत्या रक्तदाबामुळे हृद्‌यविकाराचा झटका येण्याची किंवा आत्महत्येची भावना मनात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय एकेक लोक फोन करतात हो ! पुरेश्या अनुभवानंतर फोन करणार्या लोकांचे ढोबळ मानाने गट पाडता येतात आणि फोनवरील व्यक्तीशी बोलतांना पहिल्या दोन वाक्यांत ती व्यक्ती कोणत्या गटात आहे हे आपल्याला ओळखु यायला लागतं.

त्यातला पहिला गट म्हणजे निव्वळ रिकामटेकडी माणसे! जसं शेअर अथवा सोन्यात एकाही पैशाची गुंतवणुक नसतांना वर्तमानपत्रात त्यांचे भाव वर गेले का खाली हे वाचण्यात त्याना रस असतो तसंच " बघुया तरी सध्या रिअल इस्टेट मार्केट काय म्हणतंय" ह्या एकमेवं हौशेपायी ते निश्कारण आपला छळ करतात. एक तर ते जाहिरातीत छापलेली सगळी माहितीच परत फोनवर विचारतात. "किती मोठा आहे फ्लॅट?", "कितवा मजला?", "लिफ्ट आहे का?" इ.इ. आणि शेवटी आपण एक बेडरुमच्या घराची जाहिरात दिलेली असतांना "नाही पण आम्हाला दोन बेडरुमचं घर हवं आहे" असलं काहीतरी पाचकळ कारण देवुन फोन ठेवतात.

काहीजण फोनवर संपुर्णपणे असंबद्ध गप्पा मारायला लागतात. "नमस्कार! हां मी कुळकर्णी बोलतोय. मी रीटायर्ड आहे. महाराष्ट्र बॅंकेत सर्विस करायचो. नगरला होतो २० वर्षे ..." वगैरे स्वतःचा वृत्तांत सांगत बसतात आणि नंतर "तुम्ही कुठे नोकरी करता? सध्या I.T. चं जॉब मार्केट कसं आहे" असल्या वाट्टेल त्या विषयाकडे वळतात.

काहीजण फोन उचलल्यावर "किंमत किती कमी करणार?" असंच पहिलं वाक्य बोलतात. आपण त्यांना घरासंदर्भात काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरीही आधी किमतीचं बोलू एवढाच त्यांचा हेका असतो. काही लोकांना स्वतःचंच घर विकायचं असतं, त्यामुळे ते फोन करुन "तुम्ही ही किंमत कशी ठरवली?" असले आचरट प्रश्न विचारतात. फार कमी लोक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतात तो म्हणजे "घर बघायला कधी येऊ?" जोपर्यंत फोनवरील माणुस हा प्रश्न विचारत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला घर घेण्यात काहीही रस नाही हे लक्षात ठेवावे!

आता तुम्हाला वाटेल की यापुढच्या गोष्टी सोप्या असतील. पण इथेच आपण चुकतो. ही शेवटची पायरी आपला अगदी अंत बघते! कारण आत्तापर्यंत फोनपलिकडे दृष्टीआड असलेल्या सृष्टीतल्या अशाच चमत्कारीक वल्लींशी आता आपली प्रत्यक्ष गाठ पडणार असते. आत्तापर्यंत पाहिलेल्या आणि ऐकलेल्या ह्या गोष्टींनी संपुर्णपणे खचलेलं मनोधैर्य कसंबसं सावरुन ; रणांगणावर समोरुन शत्रूचं सैन्य चाल करुन येत असतांना पहिल्या फळीत उभ्या असलेल्या सैनिकाचा अवतार घेउन पुढच्या अनुभवांना तोंड द्यायला आपण सज्जं होतो. "संकटं कधी एकट्यानं येत नाहीत, नेहमी टोळीनं येतात" ही म्हण खरी करणारे एकेक नग हळुहळू यायला लागतात.

यामधे सगळ्यात जास्त उच्छाद मांडणारे लोक म्हणजे "वास्तुशास्त्र" मानणारे! नाही, म्हणजे माझं वास्तुशास्त्राबद्दल बरं किंवा वाईट असं कुठलंच मत नाहिये. असते एकेकाची श्रद्धा, त्यात काही गैर नाही. पण हे लोक आपणही तितकेच वास्तुशास्त्राचे अभ्यासक आहोत असं गृहीतंच धरतात. देवाशप्पथ सांगतो, भुगोलाच्या मास्तरांनी शाळेत कधी छळलं नसेल इतके हे लोक दिशांचे प्रश्न विचारुन छळतात.
"मग आता ईथे नैऋत्य कुठली?"
"घराच्या वायव्य कोपर्यात बाथरुम आहे का?"
"पश्चिमेकडुन संध्याकाळी वाहणारा वारा घरात कोणत्या बाजुने प्रवेश करतो?"
असले भयंकर प्रश्न आपल्याला विचारले जातात. आपण आपले कसेबसे होकायंत्राकडे बघुन जेमतेम दक्षिण ओळखेपर्यंत दिशांचे प्रश्न सोडुन गाडी इतर गोष्टींकडे वळलेली असते.
"हा ओटा असा ईथे असायला हवा होता"
"बाथरुममधला नळ या भिंतीवर असू नये"
"TV खोलीच्या ह्या कोपर्यात असू नये"
अशा एकामागुन एक "चुका" निघायला लागतात आणि थोड्या वेळाने घरात एकपण गोष्ट "योग्य" दिशेला आणि "योग्य" जागेवर नाहीये असं आपल्याला वाटायला लागतं. TV चा शोध लागायला हजारो वर्षं असुनही वास्तुशास्त्रात त्याबद्दलचे नियम आहेत हे ऐकुन आपण हबंकतोच. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने इतक्या उणिवा असलेलं घर मुळात घेणारे आणि त्यातुन त्या चुका न सुधारता तसेच त्यात राहणारे कमनशीबी जीव म्हणजे आपण गाढव असल्याची पुरेपुर जाणीव "लेकी बोले सुने लागे" ह्या युक्तीने आपल्याला करुन दिली जाते. इतकं सगळं चुकलेलं असतांनाही त्या घरात इतकी वर्ष आनंदाने राहता आलं अशी कोणती पुण्यं आपण केली याचा विचार आपण करु लागतो.
अशा लोकांबरोबर नेहमीच आर्कीटेक्ट अथवा इंटिरीयर डिझायनर व्यक्ती असते जी हे सगळे "दोष" कसे सुधारता येतील हे सांगायला तत्पर असते. अशा व्यक्तींचा कल्पनाविलास
"ही खोली ईथुन काढुन तिथे बाथरुम करु ... किचनचा ओटा हलवुन बेडरुममधे नेवू" इथपासुन "घराच्या आत येणारं मुख्य दार तिथुन बंद करुन गच्चीमधुन काढू आणि तिथे तिसर्या मजल्यापर्यंत येणारा स्वतंत्र जीना करु" इथपर्यंत भौतिकशास्त्र अथवा सारासार विचारांची क्षुद्र बंधनं न बाळगता मुक्तसंचार करत असतो.

काही लोक हे एकदम १०-१२ लोकांच्या टोळीनं येतात, नातवांपासुन पणजोबांपर्यंत नानाविधं वयोगटांमधल्या ह्या व्यक्ती स्वतःची कुठलीही ओळख करुन न देता थेट घर बघायला लागतात, त्यांची लहान मुलं गाद्यांवर चढुन नाचत असतात. कोणी जाऊन बेसिनचा नळ सोडुन त्याला पाणी येतय का नाही किंवा टॉयलेटचा फ्लश चालतो का नाही अशा चाचण्या करत असतात. कोणीतरी एक जण टेप घेऊन दारं, खिडक्या, भिंती, माळे, ओटे अशा दिसेल त्या गोष्टींची लांबी-रुंदी मोजत असतात. जणू आपण तिथं नाहीच आहोत अशा अविर्भावात आपसांत हळू आवाजात काहीतरी बोलत अशा गुढ हालचाली करत असतात. ह्या सगळ्यांमधे नक्की घर कोणाला घ्यायचे आहे हे रहस्य शेरलॉक होम्सलासुद्धा बुचकळ्यात टाकू शकेल, तिथे आपली काय कथा. कधीकधी हे सगळे सोपस्कार झाल्यावर आपणंच नं राहुन विचारतो. तेव्हा असं कळतं की त्यापैकी कोणीच खरं गिर्हाईक नसुन "त्यातल्या एका व्यक्तीच्या दुसर्या गावात राहणार्या लांबच्या नातेवाईकाच्या १२ वीचा परीक्षा दुसर्यांदा देणार्या मुलाला पुढच्या वर्षी पुण्यात इंजिनीयरींगला अॅडमिशन मिळाली तर पुण्यात घर घेण्याचा त्यांचा विचार आहे" ह्या भक्कम कारणासाठी ते तत्परतेने घर बघायला आले आहेत.

हे लोक निघेपर्यंत अतिचिकीत्सक लोक यायला लागलेच असतात. ह्या लोकांचे एकेक प्रश्न म्हणजे सुवर्णाक्षरांनी लिहुन ठेवण्याच्या दर्जाचे असतात. आपण बिल्डींगमधला फ्लॅट विकत असलो तरी पाया त्या बिल्डींची गवंड्यापासुन रंगार्यापर्यंत सगळी कामं आपणंच केली आहेत अशा ठाम विश्वासानं ते आपल्याला प्रश्न विचारतात.
"पाया किती फूट खोल आहे?"
"स्लॅबमधे सिमेंट आणि कॉंक्रीटचं प्रमाण काय आहे?"
"इलेक्ट्रीक वायर कोणत्या कंपनीच्या आहेत?"
एवढ्यानं त्यांचं समाधान होत नाही. मग महानगरपालिकेतल्या सगळ्या विभागांची इत्यंभुत माहीती आपल्याला असायला पाहीजे या अपेक्षेने;
"बिल्डींगचा पाणिपुरवठा पालिकेच्या कोणत्या टाकीपासुन होतो?"
"समोरचा रस्ता कधी दुरुस्त होणार आहे?"
असे कोणतेही प्रश्न आपल्याला विचारले जातात. ह्या अशा लोकांबरोबर नेहमी एक कोणीतरी मित्र असतो ज्याला घराच्या खरेदी-विक्री व्यवहारातलं "सगळं कळतं". आत्तापर्यंत ५-६ वेळा घरं घेऊन आणि विकुनही त्यात काय "सगळं कळावं" लागतं ते मलातरी अजुन कळलेलं नाही. पण प्रत्यक्ष घर घेणार्यापेक्षा ह्या सगळं कळणार्या मित्रांचा त्रासंच जास्त असतो.

हे झालं स्वतः घर विकण्याबद्दल, जर एजंटला सांगितलं तर वेगळीच कथा जी नंतर केव्हातरी सांगेन!

पण सरतेशेवटी १-२ सज्जन आणि समजुतदार माणसं येतात. पहिल्या भेटीतच ते कोण हे आपल्याला कळतं आणि गोष्टी मार्गी लागायला लागतात. कारण लग्न जमण्याप्रमाणे घर घेण्या किंवा विकण्यासाठी योग जुळावा लागतो. अगदी वधुपित्याईतके नसलो तरी आपलं राहतं घर चांगल्या माणसांना द्यावं यासाठी आपण सतर्क असतो. त्या घरात आपल्या आठवणी असतात. आपण ते घर दुसर्याला विकुन तिथं पुढे राहणार नसलो तरी पुढे कधीही त्या रस्त्यावरुन जातांना त्या घराची ओळख "आमचं घर" अशीच करुन दिली जाणार असते. आपण नसतांनाही त्या घराची तितकीच काळजी घेतली जावी ह्या भावनेने एवढी धडपड करुन योग्य माणसं मिळाल्यावर हा सगळा अट्टाहास सार्थ वाटायला लागतो!

 

Saturday, January 15, 2011

एकांत

"आपल्याला कधीही न मिळणारी गोष्ट ही आपल्याला नेहमी हवीहवीशी वाटते" हा साधा मनुष्यस्वभाव आहे. आणि तसंच "आपल्याला हवीहवीशी वाटणारी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही" हा निसर्गाचा साधा नियम आहे. ह्या दोन गोष्टींची जेव्हा बेरीज होते तेव्हा त्या गणिताचं उत्तर म्हणजे एका कमनशीबी जीवाची होणारी फरफट!

लहानपणी मी रामायण, महाभारत यासारख्या मालिकांमधे किंवा राजे-महाराजे असणार्या सिनेमांमधे बघायचो, की एखादी वाईट अथवा गंभीर बातमी मिळाल्यावर ते राजे बातमी देणार्या व्यक्तिकडे पाठ फिरवुन, कॉंग्रेसचा प्रचार केल्यासारखा आपल्या हाताचा पंजा बाजुला करुन "एकांत !" असं म्हणायचे. आणि मग तिथले सगळे लोक पटापट बाहेर निघुन जायचे. मला त्या "एकांत" ह्या संकल्पनेबद्दल तेव्हापासुन कुतुहल होतं. आणि तो कधीही अनुभवलेला नसल्यामुळे तो हवाहवासा वाटायला लागला. एकदा मी लहानपणीच घरात "एकांत !" असं जोरात ओरडुन तो मिळतो का ते पाहिलं. पण डोक्यावर एक टप्पल आणि दोन आठवडे टीव्ही न पाहण्याची शिक्षा यापलिकडे पदरात काही पडलं नाही!

कोणाला वाटेल त्यात काय एवढं? एकांत मिळवणं असं कितीसं अवघड आहे? मलाही तसंच वाटत होतं. थोडा मोठा झाल्यावर अजुन काही सिनेमांमधे "कुछ देर के लिये मुझे अकेला छो़ड दो!" असा एक संवाद ऐकला. विशेषतः नायक अथवा नायिका असं वाक्य बोलुन मोठ्या जिन्यानी वर जाऊन आपल्या खोलीचं दार धाडकन आपटतात असं ते दृश्य असायचं. आमचं घर तेव्हा मुळात एक बेडरुमचं होतं. त्यातुन तळमजल्यावर. त्यामुळे जीना आणि आपटायला दार या दोन्ही गोष्टींचा अभाव! तरी एकदा उगीच आपलं प्रयोग म्हणुन मी ते वाक्यं फेकलं आणि बेडरुमचं दार आपटायला म्हणुन ओढलं. दारांच्या मागची जागा ही आपल्या मध्यमवर्गीय घरांत पसारा लपवायचा एक छुपा कप्पाच असतो. त्यामुळे वर्षानुवर्षं कधीही बंद न केलेल्या दाराला मी हिसका देताच त्याच्या मागचा खिळ्याला टांगलेल्या पिशव्या, त्यातल्या नानाविधं गोष्टी, कपडे वाळत घालायच्या काठ्या, जुने कुंचे यांचा डोलारा मोठा आवाज करुन कोसळला. आणि मग बराच वेळ आईची बोलणी खाण्यात आणि तो पसारा आवरण्यातच गेला. ही तर झाली लहानपणची कथा. आता मोठा होऊन लग्न वगैरे झाल्यावर मी एकदा ते वाक्य बोललो तर "भरल्या घरात कसे असे दळभद्री विचार सुचतात? कसले हे भिकेचे डोहाळे? कशाला हवा आहे डोंबल्याचा एकांत? घरातली माणसं इतकी नकोशी झाली आहेत का? तसं असेल तर सांग, आम्ही जातो सगळे घर सोडुन. मग बस घरात भुतासारखा एकटा आढ्याकडे बघत!" इत्यादी वाक्य कानी पडली. मी "कुछ देर के लिये" एकांत मागतोय म्हणजे संसाराश्रम सोडुन सन्यासाश्रमात पदार्पण करायचीच परवानगी मागतो आहे अशी घरच्यांची धारणा झाली.

थोडक्यात काय, कोणत्यातरी "संयुक्तिक" कारणाशिवाय मला एकांत मिळायची चिन्हं दिसेना. म्हणुन अशा एखाद्या कारणाच्या शोधात मी होतो. एकदा कोणत्याश्या पुस्तकांच्या दुकानात "योगासने व प्राणायाम" शिकवणारी एक सीडी मला मिळाली. त्यात पाहतो तर काय! अतिशय शांत वातावरणात एकट्याने एकाग्रचित्ताने योगाभ्यास कसा करावा हे दाखवलं होतं. मला जवळजवळ हर्षवायुचा झटकाच आला. मी जोरात ओरडलो, "युरेका !". आजुबाजु्च्या कोणालाच अशा वर्तनाची अपेक्षा नसल्याने त्या आवाजाने सगळेच दचकले. माझी बायको तर माझ्याकडे "ही युरेका कोण?!" अशा संशयास्पद नजरेने पहायला लागली. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यामुळे मी तत्परतेने वे़ड्या ग्रीक शास्त्रज्ञाचा दाखला देऊन भविष्यातला संशयकलहं टाळला. आणि त्याचबरोबर माझ्या तब्येतीसाठी मी कसा योगाभ्यास केला पाहीजे आणि त्यासाठी एकांताची कशी गरज आहे हे सगळ्यांना पटवुन दररोज अर्ध्या तासाचं एकांतवासाचं लायसन्य मिळवुन सकाळची वाट पाहत मी झोपी गेलो.

दुसर्या दिवशी उठुन उत्साहाने मी एका खोलीत जाऊन बसलो आणि ओमकार म्हणायला सुरुवात केली. माझा प्रत्येक ओमकार चालू असताना बाहेरुन "कालचं सगळं दूध नासलं, असली कसली रे दुधं आणता तुम्ही?", "काल पेपरची पुरवणी का नाही रे टाकली?" , "कशी भांडी घासली आहेत? एवढे साबण आहेत, नीट लावा की जरा!" अशी वेगवेगळी तारस्वरातली वाक्या कानावर पडत होती. त्यामुळे तंत्र काही जमेना. मग मी उठुन मागील अनुभवातुन शहाणा होऊन दार हळुच लोटुन आत येऊन बसलो. तेवढ्यात आई काम करणार्या मावशींना घेऊन आत आली आणि तिला मी बसलेली जागा सोडुन बाकीची खोली झाडुन-पुसुन घ्यायला सांगितली. त्या मावशीपण सांगकामेपणाचा अतिरेक करत माझ्या चहु बाजुंनी जेमतेम दोन इंचाच्या अंतरावरुन कुंचे आणि फडकी फिरवायला लागल्या. भारतातुन प्रयाण करणार्या अलेक्झँडरला एका सन्यास्याने सांगितलेल्या "प्रत्येत माणसाच्या अधिकारात तेवढीच भुमी असते ज्यावर तो उभा असतो" या वचनाचा मला तंतोतंत प्रत्यय आला आणि तो नाद मी तिथेच सोडला.

सकाळची ही कटकट रोजचीच असल्यामुळे मी सुट्टीच्या दिवशी दुपारी प्रयत्न केला. मी बसल्यावर तिसाव्या सेकंदाला बेल वाजली. दार उघडुन बघतो तर एक गृहसुथ पोट साफ करण्यासाठी कसलेसे घरगुती काढे विकायला आले होते. त्यांनी अर्धा तास वेळ खाल्ला. त्यातुन कशीबशी सुटका करुन परत येऊन बसलो तेवढ्यात फोन वाजला. "तुम्ही आमच्या कंपनीचे विशेष ग्राहक असल्याने तुम्हाला न मागताच लोन मंजुर केलं आहे" अशा आशयाच्या फोनवरील व्यक्तिला मनातल्या मनात अर्वाच्य शिवीगाळ करुन मी परत आलो तर परत बेल वाजवुन कुरीयर आलं. ह्या आणि असल्या अनेक व्यत्ययांनंतर दुपारचा पर्याय पण बाद झाला. शेवटचा प्रयत्न म्हणुन ऑफिसातुन संध्याकाळी घरी आल्यावर बाल्कनीत जाऊन बसलो. माझ्या मागोमाग माझी दोन वर्षांची मुलगी पण आलीच. आपला बाबा काहीतरी वेगळंच करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती लगेच माझ्या बाजुला बसुन माझी नक्कल करायला लागली. थोडावेळ दुर्लक्ष केलं तर ती जाईल या वेड्या आशेने मी डोळे मिटले आणि प्राणायामाच्या नावाखाली उगाचंच वाफेच्या इंजीनासारखा फुस-फुस आवाज करत मोठमोठे श्वास घ्यायला लागलो. थोड्या वेळाने नाकाला गुदगुल्या झाल्यासारख्या वाटल्या म्हणुन डोळे उघडुन बघतो तर काय, माझी मुलगी कागदाच्या फाडलेल्या दोन पट्ट्या माझ्या नाकपुड्यांसमोर धरुन त्या कशा जोरजोराने उडतात याची चाचणी घेत होती. मी थांबलो तर "परत कर ना बाबा" म्हणुन हट्ट धरुन बसली. "भीक नको पण कुत्रं आवर" अशी माझी अवस्था झाली. पुर्वीच्या ऋषीमुनींच्या तपस्या भंग करायला अप्सरा वगैरे पाठवण्यापेक्षा माझ्या मुलीसारखे एक-दोन बालराक्षस पाठवले असते तर पटकन काम झालं असतं.

व्यायामाच्या नावाखाली एका प्रयत्नाची ही अवस्था. तसे अनेक प्रयत्न फसले. अगदी साधं अंघोळीला जाऊन पाच मिनीटं शॉवरखाली जास्त थांबावं म्हंटलं तर जोरजोरात दार वाजवुन "चला आटपा पटपट, गरम पोहे केले आहेत ते गिळा. एवढं गरम करुन वाढते आहे तर कष्टांची काही किंमतच नाही, तासतासभर अंघोळच करत बसायची" अशी आज्ञा होते. चुकुन आमच्या एका अतिउत्साहूी काकांना ही गोष्ट सांगितली तर त्यांनी "अरे मुर्ख आहेस तू! माणुस हा सोशल प्राणी आहे. अगदी आदिमानव पण घोळक्यानेच गुहांमधे रहायचे ... " इथुन सुरुवात करुन थेट अष्मयुगापासुन कलियुगापर्यंतचा मनुष्याच्या सामाजिक जीवनाच्या उत्क्रांतीचा वृतांत मला सांगुन माझ्या आयुष्यातले अनेक मोलाचे क्षण खाल्ले. त्यांच्या बोलण्याचा रोख असा काही होता की जणु एकांत हवा असेल तर मी मनुष्याप्राणीच नाही अशी कबुलीच मला द्यावी लागेल.

या सगळ्यानंतर एकांत मिळण्याची अपेक्षा मी जवळजवळ सोडलीच होती. पण त्यातल्या त्यात गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळत होतो. पण कसलं काय. एका दिवशी जवळच कुठेशी जत्रा भरली होती. झक मारत सगळ्यांना त्या जत्रेला घेउन जावं लागलं. सगळे आपापल्या धुंदीत फिरत होते. प्रचंड गर्दी होती. मी वैतागुन आकाशपाळण्यात (Giant Wheel) बसायला म्हणुन गेलो. मी बसायला लागल्यावर माझी एकंदरीत रुंदी आणि आकारमान बघुन, त्या पाळण्याची आणि तो फिरवणार्या यंत्रणेची क्षमता लक्षात घेउन तिथल्या माणसाने कुत्सितपणे मला "साहब आप अकेले ही बैठो, एकदम आरामसे" असं म्हणुन पाठवलं. मी बसलो आणि ते चक्र फिरायला लागलं. एक-दोन वेळा फिरलं असावं. मी माझ्याच विचारात होतो. मी बसलेला पाळणा अगदी वरती गेला असतांना मोठा आवाज होउन ते फिरायचं थांबलं. मी ओरडुन विचारलं "क्या हुआ?" खालुन अंधारातुन आवाज आला "कुछ नही साहब, छोटा प्रॉब्लम है, पांच मिनट मे ठिक करता हूँ" . मी वैतागुन कपाळाला हात लावला. आणि तेवढ्यात वीज चमकावी तसा माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला ! त्या भर मनुष्यामेळाव्याच्या मधोमध, कोणताही प्रयत्न न करता आणि कोणतीही पूर्वकल्पना नसतांना मी शोधत असलेला एकांत मला मिळाला होता. मी कृतज्ञतेने आकाशाकडे पाहिलं, आणि डोळे मिटुन घेतले. किती वेळ गेला, तेव्ही मी काय विचार केला हे मला आता नीटसं स्मरत नाही. पण थोड्या वेळाने ते चक्र परत फिराला लागलं आणि काही वेळातच माझे पाय परत "जमिनीला" टेकले. काही वेळासाठी मिळालेल्या त्या एकांताच्या अनुभवाचं आणि आठवणीचं गाठोडं मी मनात सांभाळुन ठेवलं आणि एक निःश्वास टाकुन समोरच्या गर्दीत पुन्हा जाऊन मिसळलो!

Tuesday, June 29, 2010

(घर)कर्माचा सिद्धांत

मी अनेक लोकांकडुन आणि पुस्तकांतुन त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. काहींचं बालपण "रम्य" होतं, काही थोर पुरुषांचं बालपण फार कष्टांचं होतं, काहीचं लाडाचं, काहींचं "खेड्यातलं" अशा अनेक प्रकारची वैषिष्ट्यपूर्ण बालपणे ऐकल्यावर मी म्हंटलं आपणही आपल्या बालपणाला असं काही नाव शोधावं. बराच वेळ विचार केल्यावर आणि घरच्यांशी चर्चा केल्यावर मला असं लक्षात आलं की बालपणंच नाही तर जन्मापासुन आत्तापर्यंतचं आपलं सगळं आयुष्य हे फक्त काम(चुकारपणा) करण्यात गेलं आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासारखे कमनशिबी असाल तर आधीच्या वाक्यातलं कंसाबाहेरचं मत माझं आणि कंसातलं मत घरच्याचं आहे हे ओळखायला तुम्हाला वेळ लागणार नाही. "चुकारपणा" मधे कामं चुकीची करणे आणि कामं चुकवणे हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत याची नोंद घ्यावी. खरं तर तुमची आणि माझी परिस्थिती सारखी आहे की नाही हे ओळखणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला जर चांगली कोथिंबीरीची जुडी निवडण्यापेक्षा चांगली नोकरी निवडणं सोपं वाटत असेल किंवा झेंडुच्या ढिगातुन "एकसारख्या आकाराची आणि रंगाची चांगली आणि ताजी" फुलं शोधण्यापेक्षा पुण्यातल्या लक्ष्मीरोडवर दिवाळीच्या आदल्या दिवशी बससाठी पार्किंग शोधणं सुकर आहे असं तुमचं मत असेल तर तुम्ही आणि मी "एकाच माळेचे मणी" आहोत हे नक्की!

आता आठवायला लागल्यावर असं लक्षात येतं की अगदी लहान वयात अतिशय बेमालुमपणे आपण ह्या घरातल्या कामांमधे ओढले जातो. सुरुवातिला "पेपर आणुन दे", "पाणी आण काकांसाठी" असं सांगितलं जातं आणि आपण लहान असुन ते केल्याबद्दल "अगदी सगळं कळत", "शहाणं ते बाळ" असं आपलं कौतुकही होतं. ह्या सगळ्याने आपण भारावुन जातो. हळुहळू कामांना भरती येते आणि कौतुकाला ओहोटी लागते. आणि हा हा म्हणता आपल्या नकळत कामाचं स्वरुप "(३ मजले पायर्या चढुन) ५ बादल्या पाणी आण, आज नळाला पाणी नाहिये" इथपर्यंत पोचलेलं असतं आणि "एवढे घोडे झाले तरी अक्कल म्हणुन येत नाही" हे कौतुकाचं स्वरुप झालेलं असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की मधल्या काळात आपलं बाह्यजगातलं व्यावसायिक, कला, खेळ ई. क्षेत्रातलं यश कितीही वाढलं असलं तरी त्याचा आपल्या घरातली कामं करण्याच्या क्षमतेवर अथवा घरच्यांच्या आपल्याबद्दलच्या मतांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे इतरांच्या नजरेत आपण कितीही कर्तृत्ववान आणि यशस्वी असलो तरी घरच्यांच्या लेखी आपली पात्रता ही केवळ "साधं तुंबलेलं बेसिन दुरुस्त करता येत नाही आणि म्हणे इंजिनीयर आहे" याच पातळीवर राहते.

ऑफिसातलं काम करणं त्यामानाने फार सोपं असतं हो! "काय, कसं आणि कधीपर्यंत" एवढ्यावर निभावतं. घरातली कामं करण्याचे निकष मात्र त्या कामाच्या स्वरुपानुसार "सकाळी उठल्या उठल्या, कुठल्या वाहनाने, कुठल्या रस्त्याने जाऊन, कुठली पिशवी वापरुन, कुठल्या दराने, शनिवार पेठेतल्या कुठल्याश्या गल्लीतल्या टोकाच्या दुकानातुन" अशा कोणत्याही थराला जाऊ शकतात. घरातल्या कामांमधला सर्वात अवघड भाग म्हणजे हे असले ढोबळ आणि अतिशय सापेक्ष निकष. "एक किलो बटाटे आण" एवढ्यावर गाडी थांबत नाही. "एक किलो बटाटे आण, आणि हे बघ, ती कापडी पिशवी आहे ना, पट्ट्यापट्ट्यांची... ती नाही रे, ती तेलाची पिशवी आहे, ती कशी चालेल बटाट्यांना? जरा तरी डोकं वापरा, नुसते चांगले मार्कं मिळाले म्हणजे सगळं येत नाही ... हां, ती पिशवी. कोणाकडुनही घेऊ नकोस, त्या बाजारात जरा वयस्कं भाजीवाला आहे एक, त्याच्याकडे चांगली असते भाजी, त्याच्याकडुनच आण. १२ रु किलोच्या वर भाव नाहियेत. अगदी नाहीच मिळाले तर थोडा जास्त भाव चालेल. काटा नीट बघ एक किलो होताहेत का नाही ते. नाहीतर वेंधळ्यासारखं तो देईल ते आणाल. बटाटे तू निवडुन घे नीट. फार मोठे नको आणि फार लहानही नको, आणि त्याना मोड आलेले नको, फार ओबडधोबड आणि माती लागलेले असतिल तर आणू नको" एवढं लांबलचक भाषण म्हणजे एक काम असतं. हे सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आपण भाजीबाजारात पोचलो असता आपल्याला लक्षात येतं की सगळेच भाजीवाले "थोडे वयस्क" ह्या प्रकारात मोडणारे आहेत. लिंबापासून सुरणाच्या आकारापर्यंत सर्व आकाराच्या बटाट्यांचे ढिग सगळीकडे रचलेले आहेत आणि १५ रु किलोखाली एकाही ठिकाणी भाव नाहीये. घरातल्या कामांमधे यशस्वी होण्यासाठी सर्वात मह्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं डोकं कधीही वापरु नये. १५ रु ही किंमत १२ रु पेक्षा "थोडी जास्त" आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर स्थळ, काळ, ऋतु, पर्जन्यमान, ईतर भाज्यांचे भाव यांवर अवलंबुन असल्याने ते काहीही असू शकतं. त्यामुळे ह्या आणि यासारख्या इतर अनेक गोष्टींमधे आपण स्वतःचं डोकं वापरुन काहीही काम केलंत तरी ते चूकच असतं. त्यापेक्षा पडलेल्या खेपेची पर्वा न करता सरळ घरी जाऊन "आता काय करु?" असा प्रश्न निर्लज्जपणे विचारावा आणि त्या अनुशंगाने आपल्या सामान्यज्ञानाच्या कमतरतेबद्दल उच्चारली जाणारी अपमानास्पद विधाने निमुटपणे ऐकुन घ्यावी. चुकलेल्या कामाबद्दल ऐकाव्या लागणार्या बोलण्यांपेक्षा ती कमी त्रासदायक असतात. हल्ली मोबाईलमुळे ग्रामीण भागात आणि देशात क्रांती झाली आहे असं म्हणतात. पण माझ्या मते ह्या मोबाईल फोनचा सगळ्यात जास्त फायदा "आता काय करु?" हा प्रश्न विचारण्यासाठी चार हेलपाटे घालायला लागणार्या आमच्यासारख्या लोकांनाच झाला आहे.

भाज्यांच्या आणि विशेषतः फळांत्या बाबतीत तर विधात्याने आमच्यासारख्या लोकांची फार क्रूर चेष्टा केली आहे. कारण फळ "आतुन नीट पिकलेलं आणि गोड" आहे की नाही हे आपल्याला मात्र "बाहेरुन" ओळखायचं असतं. एवढी चराचर सृष्टी निर्माण केली, एक फळ पिकलेलं आहे की नाही हे दर्शवणारी एकसारखी खुण बाहेरुन नीट दिसेल अशी सगळ्या फळांवर ठेवणं असं कितीसं अवघड होतं? बरं प्रत्येक फळासाठी हे वेगवेगळ्या पद्धतीने ओळखावं लागतं. काहूींचं रंग बघुन, काहींचा वास बघुन, काही दाबुन बघायची असतात तर काही वाजवुन! फळांचं एक तर भाज्यांचं दुसरंच. भेंडीचा देठ सहज मोडला तर ती कोवळी, तोंडली आतुन लाल नको , एक ना दोन! हे सगळं असुन आपण घेतलेली फळं बहुतांशी वेळा न पिकलेलीच असतात. अशा वेळी "मी काय करणार, गीतेत सांगितल्याप्रमाणे मी फक्त कर्म केलं, (पिकलेल्या) फळाची अपेक्षा ठेवली नाही" असा पाचकळ विनोद केला असता परिस्थिती सूधारण्याऐवजी अजुम बिकट होते हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. चांगल्या भाज्या आणि फळं ओळखण्याच्या सगळ्या खुणा जो लक्षात ठेऊ शकेल तो काय हो उद्या मराठी व्याकरणातले सगळे प्रत्यय आणि अलंकारही पाठ करेल.

पण या सगळ्या गोष्टी सुसह्य म्हणाव्यात अशी अजुन एक त्रासदायक गोष्ट म्हणजे भाव करणे अथवा घासाघीस करणे. "सांगितलेल्या किमतीला कधीही गोष्ट घ्यायची नाही" ही शिकवण लहानपणापासुन पाळण्याचा प्रयत्न करुनही माझ्यासारख्या "मुखदुर्बळ" माणसाला एका रुपयानीसुद्धा भाव कमी करता येत नाहीत. मला वाटतं माझ्यासारखी बावळट आणि बिचारी माणसं ओळखण्यासाठी भाजीवाले आणि दुकानदारांना तिसरा डोळा असावा. कारण ज्या दुकानात आई गेली असता
"फ्लॉवर कसा दिला?"
"८ रुपये पाव ताई"
"काहीही भाव काय सांगता, अर्धा किलो घ्यायचाय, नीट सांगा"
"ठिक आहे ताई, घ्या ६ रुपयानी"
असा संवाद होतो त्याच ठिकाणी मी गेल्यावर मात्र
"फ्लॉवर कसा दिला?"
" (माझ्याकडे संपू्र्ण दुर्लक्ष करत) ८ रुपये पाव"
"अहो नीट सांगा की, २ किलो घ्यायचाय"
"(वैतागलेल्या आवाजात) पाव किलो घ्या नाहीतर १० किलो, एकच भाव"
असं चित्र असतं. बोहनीसाठी ईतरांना अर्ध्या किमतीत माल विकणारे दुकानदार मला मात्र "ओ साहेब, कशाला भवानीच्या टायमाला वेळ खराब करता" असं म्हणून वाटेला लावतात.

काही कामं मात्र वर्षानुवर्ष जशीच्या तशी राहतात दळण आणणे आणि रद्दी विकणे ही रविवार सकाळ खराब करणारी कंटाळवाणी कामं इतक्या वर्षांनीदेखील माझा पिच्छा सोडत नाहीत। आधी पायी जायचो, मग सायकलवर, मग दुचाकी आणि आता चाकचाकीतुन जातो तरी या कामांचं स्वरुप आणि ती करण्याचा येणारा कंटाळा ह्यात तसुभरही फरक पडलेला नाही. ह्या कामांची एक अवस्था तर "संस्कार" ह्या नावाखाली करायला लागणार्या कामांची दुसरी. "स्वावलंबन" ह्या सदराखाली "चहा प्यायल्यावर स्वतःची कप बशी धुउन ठेवणे आणि जेवणानंतर स्वतःचं ताट उचलुन ठेवणे" अशा "हातासरशी" करायच्या कामांची मला इतकी सवय झाली की एकदा मी टपरीवजा हॉटेलात चहा पिऊन थर्माकोलचा कप विसळुन बेसिनवर पालथा घातला आहे आणि एका पंचतारांकीत हॉटेलात स्वतःचं ताट उचलुन आत नेऊन ठेवलं आहे. त्यातुन मला लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे गाळ्यातली चहाची टपरी असो अथवा पंचतारांकीत हॉटेल, "येडा का खुळा" या भावनेने आपल्याकडे बघणार्या नजरा दोन्हीकडे तितक्याच बोचर्या असतात.

कधी कधी घरातली काही कामं करण्यासाठी माणसं शोधुन आणणे हेच एक मोठं काम होऊन बसतं. प्लंबर आणि ईलेक्ट्रिशियन ह्यांचा अशा प्रकारच्या कामांच्या क्रमवारीत वरचा नंबर लागतो. पण कुठल्याही प्रकारची कामाला ही मंडळी "इतकी छोटी कामं करायला टाईम नाही आपल्याला साहेब" असं म्हणुन समोरच्या दुकानदारीशी स्थानिक राजकारणावर चर्चा करायला लागुन त्यातच त्यांच्या वेळेचा सदुपयोग आहे याची जाणिव आपल्याला करुन देतात. मग अशी कामं आपण घरीच करण्याचा प्रयत्न करतो. घरात योग्य काम करण्यासाठी योग्य अवजार सापडेल तो दिवस सुवर्णाक्षरांनी नाही तर किमान पितळ्याच्या अक्षरांनी तरी कुठेतरी लिहुन ठेवला पाहीजे. माझ्या या वाक्यामागचा कळवळा ज्यानी स्क्रू-ड्रायव्हर नाही म्हणुन सुरीच्या टोकानी स्क्रू काढणे , पकड नाही म्हणुन सांडशीने नट ढिला करणे, हातोडी नाही म्हणुन बत्त्याने खिळा ठोकणे (आणि ते करताना स्वतःच्या अंगठ्यावर बत्ता मारुन तो काळा निळा करुन घेणे) ही दिव्य पार केली असतिल त्याला कळेल.

असो, आता काय सांगावं आणि किती सांगावं? मस्त सुटीच्या दिवशी गोडाचं जेवण झालेलं असतं, निद्रादेवीचा आराधना करायला डोळे आतुर झालेले असतात, वामकुक्षी घ्यायला आपण निघणार तेवढ्यात "अरे जरा पटकन पायी जाउन कोपर्यावरुन बारीक रवा घेऊन ये पाव किलो। संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, उपमा करायचा आहे. आणि थोड्या मिरच्या पण आण, चांगल्या तिखट, मागच्या वेळेसारख्या नको ..." अशी आज्ञा ऐकू येते. "दैव देतं आणि कर्म नेतं" ह्याचा असाही अर्थ होऊ शकतो असा साक्षात्कार दैवाने दिलेली झोप हे घरकर्म नेतं तेव्हा आपल्याला होतो. संध्याकाळी येणार्या पाहुण्यांबद्दल अपशब्द पुटपुटत आपण कामाला लागतो. थोरामोठ्यानी सांगितलेले कर्माचे सिदुधांत कळण्याईतकी माझी बुद्धी नाहूी. पण माझ्या मर्यादीत बुद्धीप्रमाणे आमचा घरकर्माचा सिद्धांत एवढंच सांगतो की घरातली कामं टाळण्याचा तुम्ही केलेला प्रयत्न आणि तुम्हाला करावी लागणारी कामं ह्याची गोळाबेरीज ह्याच आयुष्यात शून्य होते. त्यामुळे आपल्याकडे येणारं प्रत्येक काम टाळंटाळ न करता तडीस नेण्याचा प्रयत्न करत राहणं हीच ह्यातुन मुक्तीची सगळ्यात सोपी वाट आहे!

Tuesday, April 06, 2010

सहभोजन

सर्वांनी मिळुन बाहेर जेवायला जाणे हा आमच्या घरातिल अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. "धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय" या वाक्प्रचाराचं ते आमच्याकडलं उत्तम उदाहरण आहे. बाहेर जेवायला जाण्याच्या आमच्या ह्या कार्यक्रमात अनेक नानाविध वादांचा आणि भांडणांचा समावेश असतो.

सर्वात पहिला वाद म्हणजे "कुठे जायचं?" हा! या विषयावर एकमत न होण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाला दर वेळी वेगवेगळं काहीतरी खायचं असतं. कुणाला चायनीज, कुणाला थाळी, कुणाला सामिष, कुणाला सीझलर ... एक ना दोन! आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना हवा तो पदार्थ एकाच ठिकाणी मिळू शकेल असं हॉटेल या भूतलावर अजुन यायचंय. आता एकदा वाद सुरू झाला की मूळ विषय सुटायला फारसा वेळ लागत नाही. मग भूतकाळातल्या संपूर्णपणे असंबद्ध गोष्टींवर एकमेकांशी अर्धा-पाऊण तास तावातावाने भांडण होतं. इतकी बाष्फळ बडबड केल्याने सगळ्याना भुक लागते आणि मग गाडी पुन्हा मूळ विषयाकडे वळते. सरतेशेवटी त्या दिवशी ज्या व्यक्तिचा आवाज सगळ्यात मोठा निघेल त्याचं म्हणणं ऐकलं जाऊन हॉटेल निश्चित होतं. बहुतांशी वेळा तो आवाज स्त्रीवर्गापैकी कोणाचातरी असतो हे जाणकारांस वेगळे सांगायला नकोच. मग एकमेकांना आवरायला लागणार्या वेळेबद्दल ताशेरे ओढले जातात आणि सभा बरखास्त होऊन सगळे आपापल्या खोल्यांमधे तयार व्हायला जातात.

खरं तर नेहेमी पासुन असं नव्हतं. लहानपणी आम्ही, म्हणजे आई, बाबा, मी आणि माझा मोठा भाऊ या विषयावर इतके भांडायचो नाही. तेव्हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे हॉटेलात जाणे ही क्रिया "चैन" या प्रकारात मोडायची, "गरज" या प्रकारात नाही. हॉटेलची आणि तिथे गेल्यावर ऑर्डर करायच्या गोष्टींची निवड ही "बजेट" या एकाच गोष्टीवर अवलंबुन असायची. आता काळ बदलला, परिस्थितीही थोडी बदलली. आम्हाला आमची स्वतंत्र मतं आली (म्हणचे आई-बाबांच्या भाषेत आम्हाला "शिंग फुटली"). आमच्या लग्नानंतर मतभेदांत भर घालायला पूर्णपणे वेगळ्या मतप्रवाहांच्या व्यक्तिंचा कुटुंबात समावेश झाला. त्यामुळे हॉटेलच्या निवडीत आता "घरापासुनचं अंतर", तिथे मिळणार्या गोष्टींचं नाविन्य, तिथे जागा मिळायला लागणारा वेळ अशा अनेक बाबींनी गोंधळात भर घातली आहे.

पण ह्या गोष्टी बदलल्या असल्या तरी लहानपणच्या काही सवयी मात्र आता कायम तशाच राहतील. उदाहरणार्थ हॉटेलात सॅलड-रायता अथवा मसाला पापड हे पदार्थ कधीही ऑर्डर करायचे नाहूीत. याच सरळ साधं कारण म्हणजे उगाचच "इटालियन", "रशियन", "ग्रिन" अशा नावाची सॅलड शेवटी फक्त ताटलीत नीटशा रचलेल्या गाजर-काकडी-टमाट्याच्या चकत्याच असतात असं आईचं ठाम मत होतं. आणि त्यासाठी अथवा पापडावर भिरभिरलेल्या कांदा-कोथिंबिरीसाठी किंवा दह्यात साखर आणि बुंदी कालवलेल्या रायत्यासाठी उजव्या रकान्यातला आकडा कधीही योग्य किंमत दर्शवू शकत नाही हे आमच्या मनावर बिंबलं गेलं आहे. तशीच दुसरी गोष्ट म्हणजे ice cream.हॉटेलात मिळणारं ice cream हे बाहेर दुकानात मिळणार्या ice cream पेक्षा महाग असल्याने ते तिथे न खाता जेवणानंतर दुसर्या एखाद्या दुकानात जाऊन खायचं. या गोष्टींची मला आणि माझ्या भावाला ईतकी सवय झाली आहे की हॉटेलाच वेटरने सॅलड-रायता-पापडृice cream हे शब्द उच्चारायला सुरुवात करताच आमच्या मेंदुकडुन मानेला आपोआप संकेत जाऊन आमची मान क्षणार्धात नकारार्थी हलायला लागते.

हॉटेलच्या निवडीसंदर्भातला वाद ही निव्वळ सुरुवात असते. तिथे गेल्यावर ऑर्डर काय करायचं हा पुढचा वादाचा मुद्दा. ऑर्डर करताना आमच्यातला प्रत्येकजण वेगवेगळ्या भयगंडाने पछाडलेला असतो. मी आणि भाऊ ऑर्डर कमी तर पडणार नाही ना ह्या भितीने, आमतच्या सहचारीणी ऑर्डर जास्त होऊन उरणार तर नाही ना या भितीने, आई बिल जास्त होणार नाही ना या भितीने तर बाबांना कढीपत्ता आवडत नसल्याने पदार्थात कढीपत्ता तर नसेल ना या भितीने ते पछाडलेले असतात. त्यांची ही भिती या थराला पोचली आहे की इटालियन पास्ता ऑर्डर करतानाही त्यात कढीपत्ता नसतो ना याची ते वेटरला विचारुन खात्री करुन घेतात. स्त्रीवर्गाचं लक्ष आपण काय ऑर्डर करायचं यापेक्षा आपले नवरे काय खाताहेत याकडे जास्त असतं. इतकं खाल्यानेच आमची वजनं कशी "भरमसाठ" वाढली आहेत याची जाणीव पहिला घास तोंडात जाण्याआधीच आम्हाला करुन दिली जाते. किमान त्या विचाराने तरी खाल्लेलं अन्न अंगी लागणार नाही अशी वेडी आशा त्यांना वाटत असावी. ह्या सगळ्या गोंधळात वेटरच्या स्मरणशक्तीनुरुप काहीतरी ऑर्डर दिली जाते. जणू हे सगळं कमी आहे की आता यात तिसर्या पिढीच्या मतांचीही भर पडली आहे. माझी पुतणी आता काय खायचं याबद्दल स्वत:चं मत असण्याईतकी मोठी झाली आहे. हल्ली हे वय ४ वर्षे असतं हे ईथं नमूद करायला पाहीजे. तिला काय पाहीजे हे जरी माहित असलं तरी कुठे काय मिळतं हे तिला कळत नाही आणि त्यामुळे अतिशय चमत्कीरीक प्रसंगांना आम्हाला तोंडी जावं लागतं. एकदा आम्ही "फक्त शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीय थाळी मिळेल" अशा अस्सल ठिकाणी आम्ही गेलो आणि सगळ्यांसाठी थाळी सांगितली. आपल्याला न विचारता ऑर्डर दिल्याचा तिला राग आल्याने ती एकदम खुर्चीवर उभी राहुन "मला चिकन लॉलिपॉप पाहीजे...." असं ती मोठ्याने ओरडुन वेटरला सांगायला लागली. चिकन हा शब्द त्या ठिकाणी पहिल्यांदाच उच्चारला गेला असावा कारण तो कानावर पडताच तिथल्या एक-दोन वेटरच्या हातातली भांडी गळुन खाली पडली, एखाद्याला चक्कर आल्यासारखंदेखील वाटलं. तरी नशीबाने गल्ल्यावर बसलेल्या सत्तरीपलीकडल्या आजोबांना कमी ऐकु येत असल्याने त्यांना हे कळलं नाही. नाहीतर त्या जागीच त्यांच्या तोंडाला फेस येऊन डोळ्यांना कायमची उर्ध्व लागली असती.

एकदा सांगितलेले पदार्थ आले की स्त्रीवर्गाकडुन त्याची चव, त्याची पाकक्रुती, त्याची अवाजवी किंमत , तोच पदार्थ आपण घरी कसा अजुन चांगला करु शकतो, तो पदार्थ ईथल्यापेक्षा अमुक एका ठिकाणी कसा चांगला असतो इत्यादी विषयांवर टिप्पणी होते. घरी केलेल्या एखाद्या पदार्थाबद्दल आपण मत व्यक्त करायला गेलो असता "पानातल्या अन्नाला नावं ठेवू नयेत" ही आपल्याला दिली गेलेली शिकवण इथे सोयीस्करपणे नजरेआड केली जाते. सरतेशेवटी ठरल्याप्रमाणे "हे पहा किती उरलंय, तरी सांगत होते", "इतकी टीप कशाला द्यायला पाहीजे" ह्या विषयांवर वक्तव्य करुन "आपण सगळ्यानी यापुढे एकत्र हॉटेलात जायलाच नको ना" असा ठराव पास करुन आम्ही घरी यायला निघतो.

काही दिवस असेच जातात, नवीन वर्षाच्या निश्चयांप्रमाणे हा ठराव पण लगेच बारगळतो. उगाचच एखादं क्षुल्लक कारण काढुन त्यानिमित्त बाहेर जेवायला जायचा प्रस्ताव कुणीतरी मांडतं आणि २ मजले खाली ऐकू जाईल अशा आवाजांत आमच्या भविष्यातला हास्यकारक अशा अजुन एका आठवणीची जोरदार सुरुवात होते.

Tuesday, February 16, 2010

कृष्णविवर

आपल्या महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटुंबामधे घर घेताना अथवा बांधताना ; "घरातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली?" या विषयावर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तोडीस तोड दर्जाचे मतभेद आणि वादविवाद असतात. पण कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला माहिती असेलच, की अशा वादांमधे तर्क , मुद्दे असल्या गोष्टींना काहीही स्थान नसुन घरातल्या मुख्य स्त्रीचं काय म्हणणं आहे त्यालाच महत्व असतं. आणि अशा वेळी स्त्रीवर्गाकडुन ज्या दोन गोष्टी सर्वप्रथम पाहिल्या जातात त्या म्हणजे स्वयंपाक घरातल्या ओट्याची लांबी किती आहे आणि त्या घरात किती माळे आहेत. घरातल्या खोल्याच्या आकारापेक्षा कपाटासाठी भिंतीत एखादी खाच असेल तर ती खोली जास्त आवडते. बाल्कनी मधुन दिसणार्या देखाव्यापेक्षा कुंड्या ठेवण्यासाठी कठड्यावर असणारी जागा जास्त महत्वाची असते. आणि खिडक्यांमधुन प्रकाश आणि वारा येतो का नाही यापेक्षा मांजर आत येऊ शकत नाही ना य़ाची काळजी जास्त असते.

तर अशा बुचकळ्यात पाडणार्या अनेक गोष्टींमधे घरातत्या माळ्यांबद्दलची आत्मियता मला सगळ्यात चमत्कारीक वाटते. तसं पाहिलं तर दाराच्या अथवा खिडकीच्या वर, छपरापासुन दीड हात जागा सोडुन, भरपुर वजन पेलू शकेल अशा ताकदीची विटांची रचना याव्यतिरीक्त त्या माळ्यात वर्णन करण्यासारखं काहीही नाही. त्यात कोणताही सौंदर्यभाव अथवा वास्तुशास्त्राचं कौशल्य देखील नाही.

जसं जसं घर लागायला लागतं आणि सामान वाढायला लागतं, तसे हळुहळ् हे माळे आपलं महत्व पटवायला लागतात. रोजच्या वापरात न लागणार्या, जून्या झालेल्या, बोजड, फेकुन द्यायच्या लायकीच्या असु कोणत्याही गोष्टीबद्दल "काय करु याचं?" असा प्रश्न विचारला असता तात्काळ "माळ्यावर टाक" असं उत्तर मिळतं. रद्दी, गाद्या, जुने कपडे, जास्तीची स्टीलची भांडी, धान्याचे डबे, चौरंग, पाट ... एक ना दोन, शेकडो गोष्टींची रवानगी माळ्यावर होते. त्या क्षणी त्या गोष्टी लवकरात लवकर नजरेआड करायच्या घाईपोटी काहीही विचार न करता आपण जमेल तशा गोष्टी माळ्यावर नुसत्या फेकत जातो.

अर्थातच अशामुळे त्या माळ्यांवरची झालेली अडगळ नजरेला फार काही सुखावणारी नसते. मग त्याची लाज वाटायला लागुन, आलेल्या पाहुण्यांपासुन ते दृश्य लपवण्याची आपली धडपड सुरू होते. मग माळ्यांना दारं करुन घेणं परवडत असेल तर ते, ते नाही जमलं तर घरातले जुने पडदे उंचीला कमी करुन लावणे आणि तेही शक्य नसल्यास जुन्या चादरी टाकुन तो पसारा झाकणे असे अनेक मार्ग अवलंबले जातात.

या सगळ्या प्रकारात सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे "माळ्यावरची जागा संपली" असं कधी होतच नाही. कसंही आणि कितीही सामान भरलं तरी अजुन एखादी गोष्ट ठेवायला एखादा कोपरा, दोन ट्रंकांच्या मधे, कपड्यांची गाठोडी थोडी आत दाबुन अशा कुठुन तरी ती जागा निर्माण होते. लहानपणी विज्ञानात "कृष्णविवर" नावाची गोष्ट शिकल्याचं मला आठवतंय. सूर्यकिरणांसकट कोणतीही गोष्ट शोषुन घेणारं, कितीही वस्तुमान सामावुन घेण्याची क्षमता असणारं असं हे कृष्णविवर. माळ्यांकडे बघुन मला त्यांची तुलना या कृष्णविवराशी कराविशी वाटते. पण कृष्णविवरात लुप्त झालेली गोष्ट पुन्हा बाहेर येणं ही महाकठीण गोष्ट. तसेच आपले हे माळे. माळे भरतांना केलेल्या घाईची आणि धसमुसळेपणाची सगळी शिक्षा त्यातुन गोष्टी परत बाहेर काढतांना आपल्याला मिळते.

एरवी कधीही न लागणारी एखादी गोष्ट एक दिवस एकदम महत्वाची होऊन जाते. ती मग इतक्या तत्परतेने हवी असते की हातातली सगळी कामं सोडुन (आणि त्याहुन वाईट म्हणजे कधी कधी सुटीच्या दिवशीचा आराम सोडुन) आपल्याला माळे धुंडाळायची वेळ येते. ही "महत्वाची" गोष्ट म्हणजे काहीही असु शकतं. कधी पाहुणे येणार या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करण्यासाठी कोणत तरी जुन्या घाटाचं पितळ्याचं पातेलंच काय हवं असतं. आधी वजन वाढल्यामुळे लहान झालेल्या कपड्यांमधला एखादा आवडता ड्रेस आता आपण परत कसे बारीक झालो आहोत हे इतरांना दाखवण्यासाठी त्या दिवशी तोच हवा असतो. तर कधी रेडीओ मधे बिघाड झाल्यावर जुन्या कागदपरत्रांच्या अनेक पिशव्यांमधुन त्या रेडीओच्या वारंटीचा छोटासा कागद हवा असतो. त्यातुनही माळे शोधण्याचं काम टाळण्यासाठी आपण आधी कपाटाच्या खालच्या कप्प्यात अथवा पलंगाखाली ती गोष्ट मिळते आहे का ते शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो ज्यातुन निराशेपलिकडे काहीही साध्य होत नाही.

सरतेशेवटी माळे शोधायच्या मोहीमेची आपल्याला तयारी करावी लागतेच. मोहीमेची सगळ्यात पहीली पायरी म्हणजे ती गोष्ट कुठल्या माळ्यावर, कोणत्या गाठोड्यात अथवा बॅगेत आहे हे आठवण्याचा प्रयत्न करणे. बहुतांशी ती गोष्ट कुठे ठेवली हे कोणालाच आठवत नसतं. तरीही माळ्यावरचं सामान चढवणारे आणि उतरवणारे मजुर आपणच असल्याने आपल्याच स्मरणशक्तीच्या कमतरतेबद्दल ताशेरे ओढले जातात. तो अपमान गिळुन आपण मोहीमेच्या पुढच्या पायरीची तयारी करायला लागतो, आणि ती म्हणजे माळ्यापर्यंत कस पोचायचं ते ठरवणे. कारण माळ्यावरच्या कोणत्याही कोपर्यापर्यंत हात पोचू शकेल इतपत उंचीची खुर्ची, स्टुल अथवा शिडी घरात ठेवण्याची दुरदृष्टी आपल्यात नसतेच. मग चौरंगावर स्टुल ठेवणे अथवा खुर्चीच्या हातांवर उभे राहणे इत्यादी डोंबार्याचे खेळ सुरु होतात. एवढं करुनही हव्या त्या बॅगेपर्यंत हात पोचत नसल्यास कुंचा अथवा कपडे वाळत घालायची काठी हातात घेउन त्या बॅगेच्या हँडल मधे अडकवुन ती ओढण्याचा विफल प्रयत्न आपण करतो. इतक्यात आपल्या या नसत्या उपद्व्यापामळे माळ्यावर शांतपणे आपल्या दृष्टीआड वास्तव्य करत असलेले सरपटणारे प्राणी बाहेर येतात. आणि मग "अगंबाई पाल!" असे उद्गार कानावर पडुन आपल्या पायाखालचा डुगडुगणारा डोलारा सांभाळणारे हात आपल्याला अक्षरशः ताटकळत (किंवा कधी कधी माळ्याला लोंबकळत ठेवुन ) नाहीसे झाले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. कधी भांडीच काय डोक्यात पडतात, कधी आपणच डोक्यावर खाली पडतो असा विलक्षण मनोरंजक कार्यक्रम चालु असतो. त्यातुन माळ्यावरची गोष्ट शोधायला निघालेला माणुस हा नशिबासाठी विनोद करण्याची सुवर्णसंधीच असते. आपल्याला हवी असलेली गोष्ट ही नेहमी शेवटच्या माळ्यावरच्या शेवटच्या गाठोड्यातच असते.

तर असा हा माळा वर्षानुवर्ष कोणाच्या अध्यात मध्यात न करता, सगळ्यांच्या नजरेआड, "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" अशी कोणतीही तक्रार न करता ओझं घेउन उभा असतो. कधीतरी नको ते सामान फेकुन देण्याच्या उद्देशाने तो आवरण्यासाठी खाली काढला जातो आणि "हे राहुदे, लागेल कधीतरी" असं करत काहीही न फेकता सगळं सामान परत तसंच वर टाकलं जातं.

आणि अशाच माळा आवरण्याच्या एखाद्या प्रसंगी हाच अडगळीचा माळा जादुची कांडी फिरवावी तसा खजिना होउन जातो. कधी लोखंडी ट्रंकेत जपुन ठेवलेली, वाळवी लागुन खराब झालेली, शाळेला मॅच जिंकवुन देताना वापरलेली बॅट सापडते. कधी लहानपणी तबला शिकतांना बोल लिहीण्यासाठी वापरलेली वही, तिच्या पानात जपुन ठेवलेली पिंपळाच्या पानाची जाळी किंवा एक रुपयाची नोट सापडते. कधी आजीचा जुन फोटो तर कधी लहानपणच्या विसरुन गेलेल्या एखाद्या मित्राचं पत्र सापडतं. आई-बाबांच्या कडेवर बसुन असलेला फोटो आपण बर्याच दिवसात त्यांच्याबरोबर म्हणावा तसा वेळ घालवला नाहीये याची आठवण करुन देतो. घरातल्या माळ्याबरोबर आपल्या मनातला पण असाच एक माळा पण उघडला जातो, जिथे अडगळ समजुन कोंबलेल्या जुन्या आठवणी, "नंतर केव्हातरी.. वेळ मिळेल तेव्हा" अशी पुढे ढकललेली स्वप्न आपण झाकुन ठेवलेली असतात. आणि अशा वेळी क्षणार्धात घरात आणि मनात माळ्याचं महत्व काय आहे हे कोणीही न सांगता आपल्या लक्षात येतं.

असाच एक दिवस माळा आवरताना, कॉलेजात असताना केलेल्या लिखाणाची वही सापडते, कोणे काळी आपल्याला लिहीण्याची आवड होती याची आठवण होते आणि तब्बल साडे तीन वर्षांनंतर मी असा एखादा ब्लॉग लिहायला बसतो.

Friday, July 14, 2006

साम-दाम-दंड-भेद

पात्रपरीचय -
निकीता - माझी पुतणी, वय वर्षे २.५
मी - म्हणजे मीच, वय वर्षे २५

मिशन - निकीताला जेवायला घालणे. (ताटातलं सगळं जेवण संपलच पाहिजे अशी एक उपसुचना)
जेवण - वरण-भात
अडचण - निकीताला वरण-भात खायचा नसुन तिला जॅम किंवा तुप साखर किंवा चॉकलेट यापैकीच काहीतरी खायचं आहे.
वेळ - दुपारचे १२:३० वाजले आहेत. (मिशन १ वाजेपर्यंत संपवायचे आहे)

(मी बाहेरच्या खोलीत येतो. आतुन आवाज येत असतो)
आई - अरे ती फार त्रास देते जेवतांना, अजिबात ऐकत नाही.
मी - काही काळजी करु नका, मी बघतो बरोबर माझ्या पद्धतीने. तुम्हाला लहान मुलांची मानसिकता नीट कळत नाही.
आई - डोंबल्याची मानसिकता. एका रविवारी फक्त तिला सांभाळायची वेळ येते आहे म्हणुन हे सुचतय तुला. बघु आता काय दिवे लावताय.
मी - (घोर अपमान) १० मिनटात संपवेल ती सगळं.

(माझ्या ह्या कोणतीही पु्र्वकल्पना नसताना केलेल्या आगाऊ विधानाला मराठीत "फुशारक्या मारणे" किंवा "वल्गना करणे" हे अतिशय योग्य वाक्प्रचार आहेत. पण अशाच विधानांच्या बळावर मी एक दिवस मॅनेजर होऊ शकतो,काय ?!)

मी - निकीता, बाहेर ये बाळा, आपल्याला मंमं करायची ना?
निकीता - होSSS!!
मी - शहाणी मुलगी आहे ती, चला घास घ्या पटपट. (घास घेते)
मी - (मनात) अरे सोप्पं आहे एकदम, एवढी कशाला बोंबाबोंब होते हिच्या जेवणावरुन?
निकीता - (एक घास खाउन, तो तोंडात असताना) याया ऍ दसो, यायं लेवत आअं.
मी - काय? तोंडात घास असताना बोलू नये बाळा.

(निकीता आज्ञाधारकपणे तोंडातला घास परत ताटात काढुन ठेवते आणि परत तेच बोलते, यावेळी तोंडात घास नसल्याने तिचं बोलणं कळतं)

निकीता - मला हे नको, माझं जेवण झालं.
मी - (ओरडायची ईच्छा आवरत) बाळा, असं करु नये, तोंडातला घास असा काढायचा नसतो. चला परत घ्या घास.
निकीता - नाही
मी - शहाणी मुलगी ना तू?
निकीता - नाही.
मी - माझं ऐकणार ना?
निकीता - नाही.
मी - बघ, पटपट खा, नाहीतर खारुताई तुझं जेवण घेऊन जाईल.

(आता वास्तविक पाहत खारुताईचा इथे अर्थाअर्थी संबंध नाही. आणि त्या प्रामाणिक आणि कष्टाळू जीवावर उगाचच लहान मुलांचं जेवण चोरण्याचा भयंकर आरोप लावण्याचाही मला काहीही हक्क नाही. पण काय करणार, त्या वेळी मला याहुन चांगलं काही सुचलच नाही.)

निकीता - (जोरात) खारुताई ये, आणि वरण-भात घेउन जा.
मी - असं नाही करु, घे पटपट, एक घास चिऊचा आणि एक घास काऊचा. (काय उगाच चिऊ-काऊला ह्यात ओढायचं? पण सगळे म्हणतात म्हणुन मी पण म्हटलं)
निकीता - नको. (अरे वा! नाहीचं नको झालं, थोडी तरी प्रगती आहे.)
मी - असं काय करते, जेवायचं नाही का तुला?
निकीता - नाही (परत गाडी नाहीवर आली)
मी - मग काय करायचंय?
निकीता - आपण चित्र काढू हं?

(निकीता जेव्हा "आपण" चित्र काढू असं म्हणते तेव्हा खरंच आपण चित्र काढायचं असतं आणि ती बाजुला बसुन नुसती फर्माईश करते. माझी चित्रकला आधीच दिव्य ! पण मगाजची लहान मुलांच्या मानसिकतेबद्दलची विधानं आता अंगाशी आली)

मी - मी चित्र काढून दाखवल्यानंतर जेवशील?
निकीता - (नुसती होकारार्थी मान हलवुन चित्रांची वही आणायला आत पळते. ५ मिनीटं होऊन गेलेली असतात. निकीता वही घेऊन परत येते)
मी - काय काढायचं?
निकीता - वाघोबा
मी - (अरे बापरे!) वाघोबा नको, आपण फुगा काढू या.
निकीता - नको, हत्ती.
मी - (वाचवा!) पतंग चालेल का?
निकीता - पोपट
मी - (ठिक आहे, नाही जमलं तर नंतर आपलाच पोपट होणार आहे, पोपटावर तंटा मोडू) चालेल

(पुढची ५ मिनीटं महत्प्रयत्नांनी मी एक पक्षीसदृश चित्र काढलं. तोपर्यंत निकीता मनसोक्तपणे इकडे-तिकडे बागडत होती.)

मी - (तिला चित्र दाखवत कौतुकाच्या अपेक्षेने तिच्याकडे पाहतो) हे बघ !
निकीता - आSSहा , बदक!!
मी - (माझा खाली पडलेला चेहरा उचलण्याचा प्रयत्न करतो, आवाज थोडासा उंचावत) हिरव्या रंगाचं बदक पाहिलं आहेस का कधी, पोपट आहे तो, आणि चला आता जेवा पटपट.
(निकीता एक घास निमुटपणे खाते, दुसरा घास देतांना)

निकीता - बास, झालं, आता आपण हात धुवु हं?
मी - झालं कसलं इतक्यात? आ कर, चल.
निकीता - अंSSS नको ना, आपण गाणं म्हणुया ना
मी - नंतर गाणं म्हणायचं, आत्ता जेव
निकीता - नाही आत्ता
मी - (निकीताचं "आपण" गाणं म्हणू हे सुद्धा आपण चित्र काढू सारखंच असतं) ठिक आहे, मी गाणं म्हणतो, तू खा, कुठलं गाणं? नाच रे मोरा म्हणायचं का?
निकीता - नाही, कजरारे कजरारे म्हण
मी - (कार्टीचं टीव्ही पाहणं कमी केलं पाहीजे) ठिक आहे, म्हणतो, तू घास घे.

(इतक्या वाटाघाटींनंतर महत्कष्टाने मिळवलेला घास तिला भरवुन आणि देवाचं नाव घेउन मी एकदम तार सप्तकातला सुर लावला)

मी - हो कजरारे कजरारे तेरे काले काले नैना ...

(तेवढ्यात आतुन एकदम खुप भांडी पडल्याचा आवाज आला आणि थोड्याच वेळात वैतागलेल्या चेहर्याने आई बाहेर आली)

आई - काय झालं? कशाला ईतक्या मोठ्याने ओरडतो आहेस? किती दचकले मी, हातातलं सगळं विरझण सांडलं.
मी - (माझ्या जबड्यात सर्व ३२ दात शिल्लक आहेत याचा पुरावा देणारं हास्य करत) निकीताने सांगितलं म्हणुन गाणं म्हणत होतो.
आई - ती काय वाट्टेल ते सांगेल, तुला नाही का अक्कल? पटपट भरव तिला (आत जाता जाता) म्हणे मुलांची मानसिकता कळत नाही.

मी - (आईला आत जातांना बघत, निकीताला उद्देशुन) निकीता, संपला का घास, good girl, चला पुढचा घास घ्या

(निकीताकडुन काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मी वळुन पाहीलं तर ती तिथे नव्हतीच. आजुबाजुला पाहिल्यवर निकीता खिडकीत चढुन गजाला लटकते आहे असं दृश्य मला दिसलं)

मी -(ओरडुन) निकीता!!! काय करते आहेस?
निकीता - (ओरडण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन) मी सुपरमॅन आहे.

(मी उठुन मांजराच्या पिल्लाला उचलुन आणतात तसं तिला पकडुन आणलं)

मी - (कडक आवाजात) चला बसा आता इथे गुपचुप, नाहीतर बागुलबुवा येतो (बागुलबुवा, थॅंक्यु रे बाबा!)
निकीता - अंSSS नको ना मला
मी - (आत ऐकु जाणार नाही याची काळजी घेत) हे बघ, तू नीट जेवण केलंस तर नंतर तुला चॉकलेट देईन.
(निकीताचा चेहरा एकदम खुलतो, आणि त्या आनंदात ती एक घास घेते. मला वाटतं सुटलो, पण लगेचंच निकीताच्या कोर्टात जेवणाच्या खटल्याला स्थगिती मिळते आणि प्रकरण पुन्हा जैसे थे)

निकीता - बास, आता पाणी प्यायचं आणि मग चॉकलेट खायचं.

(माझा संयम आता संपत आलेला असतो. २० मिनीटे जाउन ताटातला ऐवज फक्त ३-४ घासांनी कमी झालेला असतो)

मी - (अजुन जोरात ओरडुन) आता वेडेपणा पुरे, नाहीतर फटका मिळेल, चल खा
निकीता - नाही.
मी - मार खायचाय, घे पटकन
निकीता - नाही
(आपण एखाद्याच्या कपड्याना लागलेला भिंतीचा चुना जसा लांबुव झटकतो, तसा मी तिच्या पाठीत उगाच फटका मारल्याचं नाटक केलं. आता ती भोकाड कधी पसरणार याची वाट बघत होतो)

निकीता - आSSS आपण मारामारी करु या (??!!) आता मी तुला मारु?

(असं म्हणुन माझ्या उत्तराची वाट न बघता तिने तिच्या हातातली बॅट जोरात माझ्या डोक्यात मारली. मी पुर्णपणे हतबल होउन तिला पकडायला उठलो.)

निकीता - मला पकड, मला पकड, मी पळते
(सुसाट वेगाने ती आत पळत गेली. जाता जाता जोरजोरात "अमोल मला चॉकलेट देणार" असं ओरडत ती थेट आई बसली होती त्या खोलीत जाउन धडकली. मी मागोमाग तिथे पोचलोच. आईने माझ्याकडे एक अर्थपुर्ण आणि प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. लाच देणार्या लोकांना anti corruption ऑफिसरनी रंगे हाथ पकडल्यावर त्यांच्या चेहर्यावर काय भाव येत असतिल
ते मला कळलं. मी पुन्हा एकदा माझ्या दंतपंक्तींचे प्रदर्शन मांडलं.)

आई - काय, झाली का नाही तुमची १० मिनीटं?
मी - झालंच आहे, २ घास राहीलेत फक्त.

(आईच्या पुढच्या टोमण्याची वाट न पाहता मी निकीताला उचललं आणि बाहेर आलो. येता येता एका ताटात तुप-साखर-पोळी आणली. निकीताने तुप साखर पोळी भरभर संपवली, वरण-भात मी न चावता भराभर गिळला. जेवण संपेपर्यंत एकच गोष्ट तिला पढवत होतो.)

मी - पोट भरलं बाळा?
निकीता -होSS
मी - जर कोणी विचारलं काय जेवली तर काय सांगायचं
निकीता - (थोडा विचार करुन) वरण-भात
मी - Good Girl (हुश्श!)

(येनकेनप्रकारेण मिशन पूर्ण झालं. तात्पर्य काय, तर तिच्या दसपट वयाचा असुन तिच्यापुढे माझं काही चाललं नाही.
मला वाटतं,

ना हर्ष मदतीस येतो, ना उपयोगाचा काही खेद,
बालहट्टापुढे तर हरती साम-दाम-दंड अन् भेद)

Monday, July 03, 2006

पिठाच्या गिरणीतला पट्टा

पुन्हा एकदा दिवा लागला. आदल्या दिवशी बजावुन सांगितल्याप्रमाणे ठरल्या वेळी कोंबडा आरवला. झुरळ आपल्या अंधार्या ड्रॉवरमधुन डोळे मिचकावत बाहेर आलं. रोजच्याप्रमाणे पुन्हा एकदा त्याला उडण्याची तीव्र ईच्छा झाली. पण पंखातलं बळंच गेल्यासारखं झालं होतं. तो विचार मनातुन झटकुन टाकत ते परत रांगायला लागलं. आजुबाजुला त्याच्यासारखे बरेच होते. कालच घोड्याकडुन आणलेली उसनी झापडं त्याने डोळ्यावर चढवली, मग समोर दिसत होती फक्त एकच वाट. रोज दिसायला वेगळी असणारी, पण सुरवातही तीच आणि शेवटही तोच, कधी वाळवंटातुन जायची तर कधी समुद्रातुन. आज फार धुकं होत, आणि त्या धुक्यात बाकी सर्व अंधुक! पायाखाली काय असेल याची पर्वा न करता ते निघालं. आजचं आपलं रंगांचं नशीब काय म्हणतय? एवढाच त्या प्रवासातला फरक.

आज तरी ही वाट दुसरीकडे घेऊन जाईल का? पुन्हा वेडी आशा, पण थोड्या वेळानं उकीरडा आलाच. खिशातुन आणलेली गेंड्याची कातडी त्याने अंगावर चढवली. ओळखीची काड्यापेटी दिसताच ते पटकन आत जाउन बसलं. काळोख...शांतता...बाहेर चालू होतं घमासान युद्ध...आलं होतं घोंघावणारं वादळ...आत ते आपलं आगपेटीच्या काड्यांशी खेळत बसलेलं. सगळ्या एकसारख्याच! अगदी साध्या लाकडाच्या, पण थोडं कुठे घर्षण झालं की चटका देउन जाणार्या.

किती काळ गेला असेल कोणास ठाउक? त्याने हळुच काड्यापेटीतुन डोकं बाहेर काढलं. दिवा विझला होता. सहस्त्र सुर्यांच्या प्रकाशालाही न घाबरणारं, पण कोणी आपल्याला बघेल का बाहेर जाताना याचीच त्याला भिती. हळुच ते काड्यापेटीतुन बाहेर आलं, गेंड्याची कातडी परत घडी करुन खिशात ठेवली परत जायची वाट मात्र मखमली होती. त्याने उडण्याचा प्रयत्न केला, पण थोड्या उंचीवर जाउन ते खाली पडलं. पुन्हा रांगायला सुरुवात केली. झापडांसमोर जेव्हा अंधार दिसायला लागला, तेव्हा त्याने झापडं काढली, कोंबड्याला उद्याची वेळ सांगुन ते पुन्हा ड्रॉवरच्या अंधारात दिसेनासं झालं.संदर्भासह स्पष्टीकरण:

(दिवा = सूर्य)उगवला होता. (झुरळ = मी) सकाळी उठलो (कोंबडा = गजराच्या) आवाजाने. (ड्रॉवर = माझी खोली) मधुन बाहेर आलो. (उडण्याची = आज तरी दांडी मारावी) तीव्र ईच्छा झाली. काम किती आहे ते आठवलं आणि मुकाट निघालो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, काही पण असो, तोच रस्ता. प्रदुषण फारच वाढलं होतं, पाउसही होता,पाण्याखाली किती आणि कसे खड्डे असतिल याची काही पर्वा नाही. आज कुठला (रंग = ट्राफीक सिग्नल) किती वेळ नशीबात आहे काय माहीत. थोड्या वेळाने (उकीरडा = हे मात्र बरोब्बर ओळखलत, ऑफिस) आलंच. (गेंड्याची कातडी = निगरगट्टपणाचा भाव) चेहर्यावर चढवुन मी माझ्या (काड्यापेटी = ऑफिसमधलं माझं क्युबिकल) मधे जाउन बसलो. असल्या शांत वातानुकुलित ऑफिसमधे असताना बाहेर कितीही गोंधळ झाला तरी काहीही कळत नाही. काम सुरु केलं, नेहमीचं, तेच तेच. फक्त एवढिशी कुठे चुक झाली की बोंबाबोंब सुरू. हे असं अनेक वर्ष चालू आहे. सू्र्य मावळला, तरी अजुन कोणी धरतं का काय याची भीती बाळगतच लपुनछपुन बाहेर पडायचं. परत जाताना कितीही ट्राफीक असला तरी त्याचं काही वाटत नाही. उद्या नक्की दांडी मारू असा होत आलेला निश्चय एका deadline च्या आठवणीने बारगळतो, घरी येउन, उद्याचा गजर लावुन मी परत झोपी जातो.

पिठाच्या गिरणीतला पट्टा = तसंच गोल गोल फिरत राहणारी माझी दिनच्रर्या

तर ही माझी सध्याची दिनचर्या. इतके दिवस ब्लॉग न लिहीण्याचं कारण म्हणजे नेहमीचंच, बुरसटलेलं आणि गंज चढलेलं- "ऑफिसात खुप काम आहे". पण "हापिसात काम करत राहणे ही काही जीवनाची इतिकर्तव्यता नाही" हे पुलंचं वाक्या स्मरुन पुन्हा लिहायला सुरुवात करतो आहे.

ता.क.- वरील वाक्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला संदर्भाशिवायच लागलं असेल तर माझ्यासारखीच तुम्हाला या दिनच्रर्येतुन सुटकेची नितांत आवश्यकता आहे हे समजुन ताबडतोब ऑफिसात रजेचा अर्ज टाकावा.

(स्फुर्ती: "त्याचे व्यवच्छेदक लक्षण"- नस्ती उठाठेव, "नानुचे आत्मचरीत्र"- असा मी असामी, पु. ल. देशपांडे... अजुन कोण ? :) )

Monday, February 20, 2006

आम्ही आहोत खवय्ये!

(माझ्यासारख्या खाद्यप्रेमींना प्रेमपुर्वक अर्पण)

आम्ही आहोत खवय्ये

चितळ्यांची ती वडी असो वा कोंडाजींचा चिवडा,
बेडेकरांची मिसळ असो वा जोश्यांचा तो वडा,
कधी कोल्हापुरचा रस्सा, कधी सातार्याचा पेढा,
कधी सात्विक ती खिचडी कधी तामसी कोंबडी-वडा,
पंक्तित लागता पैज वाजतो सनई अन् चौघडा
मग श्रिखंडाचा राग आळवुन गाणारे गवैय्ये, आम्ही आहोत खवय्ये

खाऊ जाउन गाडीवरचे पोहे शुभप्रभाती,
मध्यान्हीही चालेल झुणका-भाकर गडावरती,
सांजवेळी आठवे आम्हाला द्रोणामधली भेळ,
मध्यरात्री मग आमचा जमतो कुल्फीशीही मेळ,
खाण्याची साधना, नसे त्या स्थळ ना कुठली वेळ
आमच्या दादेसाठी झटती भले भले रसोईये, आम्ही आहोत खवय्ये

वजनाचा नको काटा, नको उदराचे त्या माप,
नको मधुमेहाची चिंता, नको व्यायामाचा ताप,
कशास भिवुनी कमी खाउनी तब्येतीला जपणे,
कशास अर्ध्या पोटी राहुन सडपातळ ते दिसणे,
नसे जगण्यासाठी खाणे, आमचे खाण्यासाठी जगणे
मेजवानीच्या रणांगणातील भरवशाचे लढवैय्ये, आम्ही आहोत खवय्ये

Sunday, February 05, 2006

आलिया भोगासी - भाग २

(पूर्वार्ध)

आता याऐवजी जर तुम्ही "कांन-नाक-घसा" तज्ञ अशी पाटी असलेल्या खोलित शिरलात तर तिथं तिसरच काहीतरी चालु असतं. इशंही अपल्या नशिबातुन टॉर्च सुटत नाहीच. हे डॉक्टर सगळ्यात आधी आपल्या नाकाचा शेंडा पकडुन वर करतात. म्हणजे साधारणपणे वराह जातिच्या प्राण्याप्रमाणे आपलं नाक केल्यावर मग त्यात टॉर्च मारतात. नंतर मग घसा पहायच्या निमित्ताने ते जीभ बाहेर काढुन आपल्याला "आ" वासायला सांगतात.
"मोठा करा आ ... अजुन मोठा ... जीभ काढा अजुन बाहेर"
आपण जीभ अगदी मुळापासुन निघायच्या बेताला येईबर्यंत बाहेर काढली की मग परत टॉर्च मारतात. त्यांच्या एका डोळ्यावर आरसासदृश गोष्टही असते. अगदी त्यांचा डोळा आपल्या तोंडात जाईपर्यंत जवळ येउन काहीतरी निरीक्षण करतात. मग एक लोखंडाची लांब पट्टी आपल्या घशापर्यंत आत घालुन जीभ अजुन खाली दाबतात. या अनपेक्षित प्रकाराने आपण "ऑक-व्यॅक" असले काहीतरी आवाज काढले की त्यांचं समाधान होतं. मग लगेच "झालं झालं" असं आपलं सांत्वन करतात.

एकदा मी दुपारी "अगदी ओ येईपर्यंत" म्हणतात तसं जेवण केल्यावर या ENT कडे गेलो होतो. नेहमाचे सोपस्कार सुरु झाले. आधीच माझ्या खुप घशाशी येत होतं. त्यातुन तो डॉक्टर माझ्या अगदी समोर बसुन या कसल्या कसल्या लोखंडी पट्ट्या माझ्या घशात घालंत होता. खरं तर त्यावेळी त्याचे सगळे दात त्याच्याच घशात घालायची इतकी तीव्र इच्छा झाली होती की काय सांगु. या सगळ्या गोंधळात माझ्या घशातल्या अन्नावरचा ताबा सुटला असता म्हणजे!!?? पण नाही ! त्याला माझ्या पडजीभेची काळजी "पडलेली"! माझी पडजीभ मनसोक्त पाहुन होईपर्यंत त्याने काही मला सोडलं नाही. बाका प्रसंग थोडक्यात निभावला म्हणायचं.

यानंतर उरतो कान, तिकडे यांचा मोर्चा वळतो. त्याचं पण टॉर्चनी निरीक्षण करुन झालं की त्यात काय काय द्रव्य ओततात, का? तर म्हणे कान साफ करायला. एकदा तर एका पेशंटचा कान साफ करायत्या बहाण्याने त्या डॉक्टरनी एक छोटाशी पिचकारी घेउन चक्क कानात पाण्याचा फवाराच मारला! उगाच काहीतरी क्लिष्ट नाव असलं तरी ती मुळात होती पिचकारीच. अरे माणसाच्या कानाचे अंतरंग म्हणजे काय रंगपंचमी खेळायची जागा आहे का?!

एखाद्याच्या खाजगी बाबतीत इतरांनी लक्ष घालु नये असा साघा सर्वमान्य शिष्टाचार आहे. माणसाचे कान-नाक-घशाचे अंतर्गत ही किती खाजगी गोष्ट आहे. पण हे लोक अगदी टॉर्च मारुन मारुन त्यात बघतात. इतकं "उच्च" शिक्षण घेउनही यांना इतके साधे शिष्टाचार माहित नसावेत ही फार लज्जस्पद गोष्ट आहे.

देव न करो पण कधी तुम्हाला दंतवैद्यक शास्त्राचं शिक्षण घेतलेल्या व्यक्तिकडे जायची वेळ आलीच तर तयारी असावी म्हणुन सांगतो. तिथे गेल्यावर आपल्याला एक मोठ्ठी आरामखुर्चीसारखी खु्र्ची दिसते. आपल्याला वाटतं "व्वा! आपल्या आरामाची केवढी सोय!" पण प्रत्यक्षात ती खु्र्ची म्हणजे आपल्याला अडकवण्यासाठी रचलेला एक सुंदर सापळा असतो. त्यावर आपण बसलो रे बसलो की वरुन एक मोठ्ठा प्रकाशाचा झोत आपल्या तोंडावर पडतो. मग चहोबाजुंनी असख्य ट्रे बाहेर येतात. त्यावर हातोडी(!), पक्कड (!?), ड्रिल (!!!) अशी वाट्टेल ती अवजारं (आणि हत्यारं) असतात. दात काढायचा असेल तर एक माणूस आपलं डोकं पकडुन ठेवणार आणि डॉक्टर भिंतितुन खिळा उपटावा तसा पक्कडिने आपला दात उपटणार असलं महाभयंकर दृश्य बघायला मिळते. दर दोन मिनिटांनी कसल्याशा पिचकारीने तोंडात पाणि मारुन आपल्याला चुळ भरायला सांगतात. इथे प्रसग काय, हे सांगतात काय, काही विचारू नका. दातातल्या फटी बुजवायला ते ज्या कौशल्याने सिमेंट भरतात की त्याची तुलना एखाद्या गवंड्याशीच होऊ शकते. फरक एवढाच की सिमेंट सरळ बसले आहे की नाही ते बघायला हे आपल्या तोंडात कोळंबा सोडत नाहीत.

या सगळ्याव्यतिरीक्त आजकाल एक नवीन प्रकार प्रचारात आहे, Overall Checkup, किंवा संपू्र्ण तपासणी. त्यात हजारेक प्रकारच्या चाचण्या असतात, आणि प्रत्येक चाचणासाठी हे लोक आपलं रक्त शोषतात, अक्षरशः !
त्या रक्तपिपासु लोकांचा तर कथाच निराळी. मी एकदा अशा चाचणीसाठी एका ठिकाणी गेलो होतो. तिथल्या माणसाने फार उत्साहाने एक इंजेक्शन माझ्या दंडाच्या खालच्या भागात खुपसलं. बराच वेळ त्यात काही येईचना.

तो - "काय हो, तुमच्या शरिरात रक्ताची फारच कमतरता दिसते! .. हॅ हॅ हॅ"

मी - "तुमच्यासारख्या ड्रॅक्युलाकडे सारखं जाउन दुसरं काय होणार? अजुन फार तर एक-दोन वेळा टिकेन, त्यानंतर भुसा भरुन प्राणिसंग्रहालयातच ठेवायची वेळ येणार आहे."

माझ्याकडुन अशा उत्तराची अपेक्षा नसल्याने तो थोडा वरमला. चौकशीअंती असं कळलं की तो डॉक्टर नविन होता आणि त्याला माझी नसंच सापडत नव्हती. ते ऐकल्यावर शेजारच्या सिनियर डॉक्टरनी त्याला शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या ह्या प्रयोगाचा गिनीपीग मीच! त्या गुरू-शिष्यांचा प्रेमळ संवाद चालु असेपर्य़ंत सुई साझ्या अंगात खुपसलेलीच होती. त्यानंतर, पलंगाखाली गेलेली गोष्ट काढायला त्याखाली हात घतल्यावर काहीही दिसत नसतांना आपण ज्या प्रकारे वाट्टेल तसा हात फिरवुन चाचपडुन बघतो, तसा तो त्या इंजेक्शनची सुई माझ्या अंगात इकडे तिकडे खुपसुन बघत होता. माझ्या नशीबाने ती नस एकदाची सापडली आणि माझं वजन थोडं कमी करुन तो निघुन गेला.

हे सगळे अनुभव घेतल्यावर तर हाडाचे, मेंदुचे, ह्रदयाचे मोठमोठे डॉक्टर काय करत असतिल याची कल्पनाही न केलेली बरी. या सगळ्यातुन तारुन न्यायला देवाने एकच गोष्ट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे संयम आणि कदाचित त्यामुळेच रुग्णाला इंग्रजीत पेशंट असं म्हणत असावेत. नुसती लक्षणं ऐकुन आणि नाडी तपासुन योग्य औषघ देणारे, हलक्या हाताने इंजेख्शन देणारे डॉक्टर पत्रिकेतच असाबे लागतात. हे भाग्य फार थोड्या पुण्यावानांना मिळतं. बाकी आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी संतांनी भविष्य जाणुन आधीच सोय करुन ठेवलेली आहे,

आलिया भोगासी, असावे सादर!

Sunday, January 29, 2006

आलिया भोगासी - भाग १

"जा आतं, डॉक्टरांनी बोलावलय."

अतिशय सुतकी अशा वातावरणाच्या डॉक्टरांच्या केबिनबाहेरच्या जागेत बसलेलं असताना आपल्याला हाक ऐकू येते. डॉक्टरांच्या केबिनबाहेरची जागा ही तिथे आलेल्या कोणत्याही व्यक्तिला चुकुनही प्रसन्न वाटू नये याची तंतोतंत काळजी घेऊन बनवलेली असते. तिथे नेहमी उदास-भकास असं वातावरण असतं. जागोजागी "शांतता राखा", "कृपया पादत्राणे येथे काढावी", "खुर्चीत बसण्याची योग्य पद्धत" असे कुठली ना कुठली शिस्त शिकवणारे फलक लावलेले असतात. उजेड, हवा असल्या गोष्टी तर निषिद्धच असतात. प्रकाशापेक्षा अंधाराची जाणिव करुन देणारे मंद असे दिवे असतात. वाचायला म्हणुन चार एक वर्षापूर्वीचे काही मासिकांचे अंक असतात. आपण जर १-२ वेळा आधी पण त्याच डॉक्टरकडे गेलो असलो तर ते सगळं आपलं आधिच वाचुन झालेलं असतं. त्याला कंटाळुन आपण इतरत्र भिंतीवर लावलेली पत्रकं जर वाचायला गेलो तर त्यावर कुठल्या कुठल्या महाभयंकर रोगांची "ठळक" लक्षणं लिहीलेली असतात. आजुबाजुच्या उदास वातावरणामुळे त्यातली काही लक्षणं आपल्याला झाली आहेत असं उगाचच आपल्याला वाटायला लागतं. अहो अशा ठिकाणी आजारी तर सोडाच, त्याला घेउन आलेल्या धडधाकट माणसालाही आपल्याला काहीतरी झालं आहे असं वाटायला लागतं. किंबहुना ही पत्रकं लावण्यामागे अजुन काही पेशंट मिळवण्याचं षङयंत्र असावं अशी माझी आपली एक शंका आहे. हे सगळं तर केबिनच्या बाहेर, केबिनच्या आत गेल्यावर कोणत्या दिव्यांतुन जावं लागेल हे मात्र आत कोणत्या प्रकारचा डॉक्टर आहे यावर अवलंबुन असतं.

आपण जर "जनरल फिजिशीयन" असं संबोधल्या जाणार्या व्यक्तिकडे गेलो तर त्यांचं वर्तन एखाद्या सरावलेल्या भटजीसारखं असतं. ठरलेले सोपस्कार पार पडल्याशिवाय ते मुख्य गोष्टीकडे वळतंच नाहीत. भटजी जसे कोणतंही कार्य असलं तरी चौरंग, तांब्या, नारळ, सुपारी, विड्याची पानं याची मनासारखी रचना केल्याशिवाय मुख्या कार्याकडे वळत नाहीत तसेच हे डॉक्टर. त्यांच्याकडे जाउन आपण सांगितलं की "डॉक्टर, जरा गुडघा दुखतो आहे."
आपल्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन त्यांचं सुरु होतं ...
"बसा. जीभ बघु (!!). मोठ्ठा आ करा थोडा अजुन. हं .. डोळे पाहू."
"अहो पण तो गुडघा .." आपण क्षीण आवाजात अजुन एकदा प्रयत्न केला तरी डॉक्टरांना ते ऐकू जात नाही कारण तोपर्यंत त्यांनी कानात स्टथोस्कोप घातलेला असतो. तो स्टथोस्कोप आपल्या पोटावर लावुन "श्वास घ्या....सोडा...परत घ्या.....मोठ्याने घ्या जरा" असे प्राणायामाचे धडे आपल्याला दिले जातात. पोटाने त्यांचं समाधान झालं नाही तर पाठीवर पुन्हा तेच. मग एक हात आपल्या पोटावर ठेवुन दुसर्या हाताने त्यावर गुद्दा मारुन काहीतरी ऐकल्यासारखं करतात. असं २-३ ठिकाणी करतात. या क्रियेतुन काय साध्य होतं ते मला आजतागायत कळलेलं नाही. त्यानंतर मग दोन्ही हातांनी आपलं पोट दाबुन घुसळल्यासारखं करतात "इथं दुखतंय ? ... इथं ?" असं विचारतात. पूर्वी एवढ्यावर सुटका व्हायची. आजकाल बी.पी. मोजायची पण फॅशन आहे. हे सगळं मनासारखं करुन झालं की मग विचारतात,
"हं, काय होतंय तुम्हाला?"

हे सुसह्यच म्हणावं लागेल, कारण हे डॉक्टर फक्त हात आणि स्टथोस्कोप या दोनच अवजारांचा वापर करतात. याउलट आपण जर डोळ्याच्या डॉक्टर कडे गेलो तर ते बाकी काहीही संभाषण न करता आधी आपल्या डोळ्यावर टॉर्च मारतात. आता मला सांगा, कोणाच्या डोळ्यावर टॉर्च मारणे हे किती असभ्य वर्तन मानलं जातं? पण इथे असं करण्यासाठीच आपण त्यांना पैसे देतो ! त्यानंतर औषधाच्या नावाखाली आपल्या डोळ्यात २-३ गार पाण्याचे थेंब टाकुन आपल्याला डोळे बंद करुन बसायला सांगतात. त्याने म्हणे डोळे स्वच्छ होतात. मला तर वाटतं, आपल्याला डोळे बंद करायला सांगुन ते हळुच चहा वगैरे पिउन येत असावेत. डोळे उघडल्यावर ते आपल्याला एका मोठ्या मशीनसमोर बसवुन, एक कसलासा स्टॅंड आणुन आपल्याला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसायला सांगतात. मला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसलेला माणुस आणि शिरच्छेदाची शिक्षा झाल्यावर गिलोटीन का काय त्यात मान अडकवुन बसलेला माणुस यात खुप साधर्म्य वाटतं. त्यांचं छोट्या टॉर्चनी समाधान झालेलं नसतं म्हणुन ते मशीन आपल्या डोळ्याजवळ आणुन त्यातुन असुन प्रखर टॉर्च डोळ्यावर मारतात. मग खुप वेळ बघत बसतात, अधुन मधुन "डाविकडे बघा ... उजवीकडे बघा" असं म्हणुन आपण काहीतरी करतो आहे असं भासवतात. "हलु नका, स्थिर रहा .. मान सरळ ठेवा .. डोळे नका मिटू" असलंही काहीतरी बोलत असतात. अरे हलू कसलं नका ? काय फोटोसेशन चालू आहे? आणि उठसूट डोळ्यावर असे वेगवेगळे टॉर्च मारले तर चांगले डोळे असलेला माणुसही पुढच्या वेळी आंधळा होउन येइल. हाच त्याचा प्लॅन असणार. मला वाटतं लहानपणी ज्या मुलांना इतरांच्या डोळ्यावर टॉर्च मारुन विकृत आनंद मिळतो तिच मुलं पुढे जाउन डोळ्याचे डॉक्टर होत असतिल. स्वतःच्या छंदाचाच प्रोफेशन म्हणुन वापर करण्याचं याहुन चांगलं उदाहरण शोधुन सापडणार नाही.

क्रमशः

Tuesday, January 17, 2006

ती ५ मिनीटं !

"हो!! उठतोय, फक्त ५ मिनीट झोपू दे"

हे माझं रोज झोपेतुन उठतानाचं पेटंट वाक्यं. अगदी लहानपणापासुनचं. त्या शेवटच्या ५ मिनीटांच्या झोपेसाठी मी खुप पुर्वीपासुन झगडत आलो आहे. खरं तर या ५ मिनीटांच्या झोपेवरुनच तुमची झोप पूर्ण होते का नाही ते ठरत असतं. आदल्या रात्री तुम्ही किती वेळ झोपता याशी त्याचा काही संबंध नाही. तुम्ही ४ तास झोपा नाहीतर १०, झोप पूर्ण की अपूर्ण ते या ५ मिनीटानी ठरतं. ही ५ मिनीटांची झोप पुरणपोळीवर घेतलेल्या तुपासारखी असते, पुरणपोळी कितीही चांगली झाली तरी त्याची चव तुपाशिवाय अपूर्णच, किंबहुनी तुपाशिवाय खाल्ली तर पोळी बाधतेच.

ही ५ मिनीटं तुम्हाला मिळाली तर त्या दिवसा सारखा शुभदिवस कुठला नाही. दिवसभर तुमचा मुड प्रसन्न राहतो, सारखं एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं, सगळ्यांशी (हो! बॉसशी सुद्धा) चांगलं बोलावं आणि वागावसं वाटतं, रस्त्यावरुन जातांना तो ओलांडू पाहणार्या आजींना मदत केली जाते, अहो एवढंच कशाला ? चालता चालता गुणगुणत असलेल्या गाण्यावर एखादी मस्त dance step आपल्याला कधी जमुन जाते हे कळत पण नाही. थोडक्यात म्हणजे एखाद्या "super fresh" टुथपेस्टच्या जाहिरातितल्या व्यक्तिसारखा आपला दिवस जातो. आता अशा दिवसांचे फायदे किती आहेत बघा. आपला मुड चांगला असल्यामुळे खाणं-पिणं छान असतं,त्यामुळे तब्येत चांगली राहते... अगदी बी.पी. का काय म्हणतात ते पण नॉर्मल राहतं, गुणगुणण्यामुळे गाण्याचा रियाज होतो. बॉसशी चांगलं वागल्यामुळे promotion चे चान्सेस वाढतात. आजींना मदत केल्याबद्दल थोडं पुण्य पदरात पडतं. थोडक्यात प्रगतिच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते.

याविरुद्ध जर ही ५ मिनीटं आपल्याला मिळाली नाही तर आपण दिवसभर चिडचिड करत असतो. रस्त्यावरुन जाताना कोणी मधे आलं तर त्याच्या अंगावर खेकसतो आणि त्याचे शिव्याशाप पदरात पाडुन घेतो. ऑफिसात बॉसशी भांडण करुन आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेतो. अशा दिवशी साधा ताकभात खाल्ला तरी तो घशाशी येउन acidity होते.

आता हे पाहिल्यावर प्रगतिचा मूलमंत्र का काय तो सापडला असं तुम्हाला वाटेल. पण हे सगळं इतकं सोपं असतं तर ना!
कुठलीही चांगली गोष्ट सांगितली की त्याचे विरोधक तयारच असतात. लोकांचं (विशेषतः आयांचं) या ५ मिनीटांशी इतकं वाकडं का असतं काय माहित. काही लोक त्याला उगाचच मनोनिग्रहाचे मापदंड लावतात. "५ वाजता ठरलं म्हणजे ५ वाजताच उठायचं, ५ वाजुन ५ मिनीटांनी नाही" असले काहीतरी अघोरी विचार असतात त्यांचे. आणि ५ ला म्हणजे ५ लाच उठुन हे करतात काय? तर कुठे टेकड्याच चढ. नाहीतर सगळे एका ठिकाणी जमुन वेगवेगळ्या स्वरात हसतंच बस वगैरे वगैरे. अरे छान अजुन थोडा वेळ लोळावं, घरी दात न घासता पण चहा मिळत असेल तर तो प्यावा, सकाळचा एखादा (इतरांनी गायलेला) राग ऐकावा. कशाला जीवाला एवढे कष्ट?

आयांचं वेगळंच काहीतरी असतं. त्यांनी मारलेल्या पहिल्या हाकेत आपण उठलो नाही तर तो त्यांना त्यांचा नैतिक पराभव वाटतो. मग चिडुन त्या आपल्याला उठवतातच. सुटीच्या दिवशी "आत्ता उठ, नंतर दुपारी हवा तेवढा वेळ झोप" असलं काहीतरी बिनबुडाचं विधान करतात. अरे! दुपारी कसलं झोप? "जो बुंद से गयी हौद से नही आती! " अशी म्हण मला फेकाविशी वाटते. पण तो पहिला "जोSS" म्हणताना मला मोठ्ठी जांभई येते आणि त्याचा फायदा घेउन आई तिथुन निघुन जाते. कसं आहे, ५ मिनिटांची किंमत काय आहे हे ती ५ मिनीटं कधीची आहेत यावर अवलंबुन असतं. कडकडुन भुक लागलेली असतांना जेवण मिळण्यासाठी लागलेली ५ मिनीट आणि आवडीचं पोटभर जेवण झाल्यावर थोडीशी पण हालचाल न करता जाणारी ५ मिनीट यात काही फरक आहे का नाही?

असो! कधी ही ५ मिनीटं मिळतात तर कधी नाही. त्यांच्यासाठी रोजचा होणारा झगडा ही पण त्यातलीच मजा. कधी आपण झोपावं आणि कधी आईला आपल्याला उठवल्याचं समाधान मिळू द्यावं ... तिनं केलेली दुधीभोपळ्याची भाजी आवडत नसतांनाही आपण खातो कारण उरलेल्या अर्ध्या भोपळ्याचा उद्या ती हलवा करणार असते ... तसं.

Thursday, January 12, 2006

मी सिरीयस होतो!

प्रत्येक गोष्टीत कसली रे चेष्टा - हिचा नेहमीचा सूर असतो.
पुढची बोलणी टाळायला म्हणुन ... मी आपला सिरीयस होतो.

सकाळी मस्तपणे लोळायचं सोडुन ,
हातापायांच्या गाठी मारत योगासनं करतो.
उगाचच दमेकर्यासारखे मोठे श्वास घेउन,
त्याला प्राणायामाचं गोड नाव देतो.
या सगळ्यातला छुपा कंटाळा,
मला रोज वाकोल्या दाखवुन हिणावतो.
व्यायाम हा काय गमतीचा विषय आहे?
लगेच परिचित प्रश्न कानावर पडतो
आलेलं हसु आवंढ्याबरोबर गिळुन,
मी मात्र सिरीयस होतो

हापिसात दिवसभर मिटींगच्या नावाखाली,
मॅनेजर भरमसाठ काम देत बसतो.
जबाबदारीच्या नावाखाली उद्यापर्यंत,
सगळं काम करुन तो आणायला सांगतो.
अतिशयोक्ती अलंकाराचा इतका सुंदर वापर,
मला खुप गुदगुल्या करायला लागतो.
हापिसाच्या शिष्टाचारात हसणं बसत नाही,
पुर्वी वाचलेला नियम एकदम आठवतो
हास्याच्या सुरकुत्यांवर मख्खपणाची इस्त्री फिरवुन,
मी प्रामाणिकपणे सिरीयस होतो.


पोळ्यांना तेल लावतात - फुलकेच खावेत,
फुलक्यांवर तुप घेणार्यांचा सल्ला येतो.
कंटाळा आल्यामुळे कच्च्या भाज्यांचाच,
सॅलडच्या बहाण्याने ताटात ढिग असतो.
जेवणाच्या ताटातली विसंगती पाहुन,
हसायचा मोह अनावर होतो.
ताटातल्या अन्नाला हसायचं नसतं,
लहानपणचा संस्कार हळुच कानात सांगतो.
हास्याची तहान मौनाने भागवुन,
मी पुन्हा एकदा सिरीयस होतो.

सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेपर्यंत,
मोकळ्याने हसायला जागा शोधत असतो.
तेही नाही जमलं तर झोपल्यानंतर,
स्वप्नात तरी मनसोक्त हसुन घ्यावं म्हणतो.
मनातल्या हास्याला वाट करुन द्यायला,
एखाद दिवस कविताच लिहायला बसतो.

पणं हाय दैवा .......

कविता लिहीणं म्हणजे विनोद वाटला का?
एक साहित्यिक विचार लगेच मला दटावतो
त्यामुळे कविता लिहिण्यापुरता का होईना,
मी अपशब्द पुटपुटत सिरीयस होतो.

Monday, January 09, 2006

Oh no... not again

Just after my "Dear Readers" post below, after posting "तेथे पाहिजे जातिचे", my blogger account again refused to post any more stuff. I have been trying this for last 2 weeks now, and had to re-create the entire blog again (yes, re-create and again :(). This time, I am not only creating a new blog, I have also created a new account (so my profile may have changed) to see if that was not an account problem.

This has tested my patience enough. One more such problem with my blog and I am moving to another blog host, in which case, this url (palshikar.blogspot.com) will no longer hold my blogs, instead I will try to convey the new url for my blog on this page.

Regards
Amol

तेथे पाहिजे जातिचे

माSSSज!!

माझ्या कोणत्याही वक्तव्यावर अथवा वर्तनावर माझ्या मित्रांची ही ठरलेली प्रतिक्रीया असते. किंबहुना त्यांना आता इतकी सवय झाली आहे की मला शिंकं आली तरी "माSSSज!!" असं ओरडायला ते मागे पुढे पाहत नाहीत. मी काही बोललो तर त्यात माज असतो, मी काही नाही बोललो तरी तो माजच असतो. थोडक्यात अभिषेकीबुवांच्या "काटा रुते कुणाला" या गाण्यातल्या "माझे अबोलणेही विपरीत होत आहे" या वाक्यासारखी माझी अवस्था झाली आहे."खाउन माजा पण टाकुन माजू नका" या म्हणीमधल्या पहिल्या प्रकारात मी मोडतो असंही काही आचरट लोकांचं म्हणणं आहे. पण त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हरकत नाही.

यावरुन मला असं लक्षात येतं की जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांना माज असतो आणि दुसरे ज्यांना माज म्हणजे काय ते कळत नाही. स्वतःला माज असल्याशिवाय माज म्हणजे काय हे पण कळत नाही. म्हणुन मग अशा माणसांमधे "माज" या गोष्टीविषयी अनेक गैरसमज असतात. ते वाट्टेल त्या वर्तनाला माज समजतात, "माज करायला तुमच्यात काहीतरी विशेष असावं लागतं" असलं काहीतरी त्यांना वाटत असतं. तर हे आणि यासारखे इतर काही गैरसमज दुर करण्याचा दस्तुरखुद्दांचा (म्हणजे माझा) विचार आहे.

कधीकधी आपल्या ऐकण्यात येतं, काही जण म्हणत असतात "अरे असं एकदा होऊ दे रे, मग आपण पण असा माज करु ना की सगळे बघत राहतील." मला अशा लोकांची कीव येते. कारण माज ही "करायची" गोष्ट नसुन, माज हा "असावा" लागतो - ही मुलभूत गोष्टच त्यांना माहिती नसते.

आधी माज म्हणजे तरी काय हे इथे सांगितलं पाहिजे. तर मुख्य गोष्ट म्हणजे माज ही कोणत्याही प्रकारची भावना नसुन ती मनाची एक अवस्था आहे. पण तरीही "राग" या भावनेला जशी संताप, चीड, तणतण अशी वेगवेगळी अंगं आहेत तशीच ती माजालाही आहेत. त्यातील काही प्रामुख्याने आढळणारी अंगं आपण पाहु यात. या सगळ्या अंगांतील फरक दर्शवणारी रेघ अगदी बारीक पण ठळक आहे.

१. मी लै भारी
या प्रकारात मोडणार्या व्यक्ती "आपणच या विश्वाचा केंद्रबिंदू आहोत" या पद्धतीने वावरत असतात. असं वागण्यामागे किमान एखाद्या गोष्टीत तरी त्यांना काही विशेष नैपुण्य असतं असं काही नाही. तरीही खगोलशास्त्रापासुन अर्थशास्त्रापर्य़ंत कोणत्याही शास्त्राचं आपल्याइतकं ज्ञान कोणालाही नाही, विणकामापासुन पाककलेपर्यंतच्या सर्व कला आपल्याइतक्या कोणालाही अवगत नाहीत आणि हुतुतु पासुन बिलियर्ड पर्यंत कोणत्याही खेळात आपला हात धरणारा कोणी नाही असा त्यांचा एक समज असतो. पण असं प्रत्येकाला पटवुन देण्याचा त्यांचा काही अट्टाहास नसतो. आपापल्या जगात ते खुश असतात. काही अज्ञानी लोक याला अहंकार समजतात.

२. माझी मर्जी
या प्रकारात मोडणारी माणसं "आपण कोणीतरी आहोत" याऐवजी "आपण कोणी असो अथवा नसो, जसे आहोत तसे पण आपल्या मर्जीने वागणार" या पद्धतीने वावरत असतात. ते आपल्याला वाटेल तसंच वागतात, इतरांना पटो अथवा नाही. त्यामुळे अशा लोकाची निर्णयक्षमता चांगली असते, त्यात अनिश्चितपणा नसतो. याला इतर लोक हट्टीपणा किंवा दुराग्रह समजतात.

३. "तु कोण?" किवा "का म्हणुन?"
माजाबाबत जे अनेक गैरसमज आहेत त्यात - "माज हा नेहमी स्वतःबद्दलच्या काहीतरी समजातुनच असतो" - असाही एक प्रसिद्ध गैरसमज आहे. त्याला या प्रकारात मोडणारी माणसे खोटं ठरवतात.
या लोकांची ओळख म्हणजे त्याना "अमुक अमुक कर" असं सांगितलं तर "तु कोण मला सांगणारा?" किंवा "का म्हणुन मी असं करु?" असं उत्तर मिळतं. त्यांचं वर्तन "मी म्हणजे कोण!" किंवा "मला असं वाटतं" याऐवजी "तो मला सांगणारा कोण? मी का असं करायचं" या विचारांनी प्रेरित असतं. अशा वागण्याला अनेकदा तुसडेपणा किंवा खडुसपणा म्हटलं जातं.

तर प्रामुख्याने हे आणि अजुनही बरेच प्रकार असतात. काही लोकांमधे एकापेक्षा जास्त प्रकारच्या माजाच्या छटा पहायला मिळतात. जिथे हे सगळे प्रकार एकत्र येतात तिथे अजुन वरच्या पातळीचा माज तयार होतो. त्याला आपण अत्युच्च माज म्हणुया. या पातळीचा माज असणार्यांची संख्या फार कमी असते. कारण या पातळीचा माज करायला अतिशय खंबीर स्वभाव असावा लागतो. षडरिपूंवरही विजय मिळवावा लागतो.

त्याच्याही पुढच्या पातळीवर गेलेल्या माणसांमधे recursive माज असतो. म्हणजे आपल्याला माज आहे याचा पण त्यांना
माज असतो. असं करत करत तो माज वाढतच असतो. त्याला आपण परमोच्च माज म्हणुया. या पातळीवर फार म्हणजे फारच कमी जण पोचतात.

आणि याच्याही वरच्या पातळीवर गेलं असता, आपल्याला माज नसुन माजाची निर्मिती आपल्यातुनच होते आहे अशा निर्णयास माणुस पोचतो. आपल्यातुनच माज निर्माण होत असेल तर आपल्यालाच माज कसा असेल? याला आपण सर्वोच्च माज म्हणुया. सर्वोच्च माजाची अवस्था आणि मोक्षाची अवस्था यात फारसा फरक नाही. या पातळीवर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं असतात.

तात्पर्य म्हणजे मोक्षाची अवस्था गाठायला माजाचा रस्त्या सुद्धा आहे.

एक लक्षात ठेवा, तुम्हाला माज असेल तर तो आपोआप होतो, तो कधीही "करावा" लागत नाही. एखादी गोष्ट करणार म्हटलं
तर कोणत्याही परिस्थितीत ती करायची जिद्द लागते आणि एखादी गोष्ट नाही करणार म्हटलं तर कोणत्याही मोहाला बळी न पडता त्यापासुन अलिप्त रहायचा निग्रह लागतो. थोडक्यात एखाद्या वैराग्याला लागणारेच गुण असावे लागतात म्हणा ना. कदाचित म्हणुनच या दोन्ही मार्गांनी मोक्षप्राप्ती होऊ शकते. माज निभावुन नेणे हा पोरखेळ नाही,

"तेथे पाहिजे जातीचे, हे काम नोहे येरागाबाळाचे!"

Dear Readers

Dear Readers,

Due to some problem with my blogger account, I was unable to add any new posts to the blog. I tried to solve this issue in many ways by deleting the old blog and creating new ones to finally figure out that my last post (पहिलं वहिलं) seems too big for comsumption by the blogger servers and once that post is published, I can not perform any more activity on that blog.
So I had to delete the old blog and create a new one with the same URL as this URL is being reffered to from some places. I have tried to recover all my old posts with their original post dates printed at the end of each post, I will also try to recover the comments soon. It seems that the last post can not be recovered as it will again cause this blog to fail. I am really sorry for any inconvinience caused to you by this blog changing business.

पु.ल. म्हणतात तसं ....
कळावे ... नुसतंच कळावे नाही तर "कळावे, लोभ असावा" ही नम्र विनंती.

अमोल
Originally posted on 23/12/2005

पहिलं वहीलं

"लिमिट" हे मी पुरुषोत्तम साठी लिहिलेलं आणि बसवलेलं पहिलं नाटक. त्याआधी मी फरोदिया साठी "तो मी नव्हेच" लिहिलं होतं आणि लिमिटच्या आधी पुरुषोत्तम साठी "कुलुप" नावाचं एक सस्पेन्स असलेलं नाटक लिहिलं होतं. पण ते मी मित्रांना वाचुन दाखवल्यावर त्यानी मला"इतकं चांगलं नाटक लोकांना कळू न देता त्याबद्दल सस्पेन्सच ठेवलेला बरा" असं सांगुन ते नाटक मला "कुलुपात" बंद करुन ठेवायला सांगितलं.चेहर्यावरुन वाटत असलो तरी या सल्ल्यामागचा खवचटपणा न कळण्याइतका मी बावळट नाही. त्यामुळे हार न मानता मी लिमिट लिहिलंच.

तर सांगायची गोष्ट अशी की का कोण जाणे पण लिमिटचा पहिला draft लिहितांना त्यातला शेवटचा सीन म्हणजे नाटकातलं मुख्य पात्रएका स्पॉटमधे उभं राहुन नाटकाचं सार सांगणारी कविता वाचुन दाखवतं असा असावा अशी एक "प्रायोगिक" कल्पना मला सुचली. जर आधीच्यासीन्स मधे आपल्या अभिनयातुन आपले विचार मांडण्यात आपण कुठे कमी पडलो असलो तर शेवटी किमान नाटकाचं सार तरी प्रेक्षकांना पाजावंएवढाच या कवितेमागचा उदात्त हेतू होता. तुम्ही जर कधी पुरुषोत्तम केलं असेल तर ही भीषण संकल्पना अंमलात आणल्यास भरतच्या स्टेजवरकाय हैदोस होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. पण हे वाचुन माझ्यावर "यडछाप" असा छाप मारण्यापुर्वी मीआधी म्हटल्याप्रमाणे हे माझं पुरुषोत्तमच पहिलं नाटक होतं हे जाणकारांनी लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.

त्यामुळे script लिहीतांना भावनेच्या आणि उत्साहाच्या भरात मी एक मोठ्ठीच्या मोठ्ठी कविता लिहुन काढली. पण प्रेक्षकांच्या आणिविशेषतः माझ्या सुदैवाने आपल्यासारख्याच काही जाणकारांनी वेळीच हा डाव हाणुन पाडला. मी script चे अजुन काही draft लिहिले(कविता नसलेले). नाटक झालं. आम्हाला एकाच वेळी सर्वोत्कृष्ठ नाटकाचा पुरुषोत्तम करंडक, सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक नाटकाचा जयराम हार्डीकरकरंडक, मला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा गणपतराव बोडस करंडक आणि अभिनयाचे बापुसाहेब ओक पारितोषिक मिळालं. एकाच नाटकाला पुरुषोत्तमआणि जयराम हार्डीकर हे यापुर्वी स्पर्धेत फक्त एकदाच झालं होतं. सगळं काही चांगलं झालं आणि नंतर पहिल्या draft मधल्या कविता हाफक्त चेष्टेचा विषय बनुन राहिल्या.

मी काही कवी नाही (आयला, यमक जुळलं की, मी काही ... कवी नाही). पण आज जेव्हा मी त्या कवितेकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जे काही थोडंफार लिहिलं आहे त्यात ही आपली पहिली कविता आहे. ती कविता आज इथे लिहायचा विचार आहे. कविता खुप मोठी आहे. आता ५० पानांच्या नाटकाचं सार सांगायला ५ पानांची तरी कविता पाहिजेच ..... काय? आता मी ती कविती वाचली तर त्यात बर्याचगोष्टी बदलता येतील हे कळतं ... पण त्या बदलाव्याशा वाटत नाही. त्याचं कसं आहे, अनेकदा आपण एखादी गोष्ट,कला वगैरे शिकतजातो. शिकता शिकता त्यातल्या चुका सुधारत जातो. पण आपण केलेली पहिली गोष्ट, कलाकृती ही त्यातल्या सौंदर्यापेक्षा त्यातल्यात्रुटींसाठीच आपल्याला जास्त प्रिय असते. कारण नंतर आपण मनात आणलं तरी तशा त्रुटी, चुका आपण करु शकत नाही.

तुम्हाला अशा कविता वाचण्यात रस नसेल तर खरंच पुढचं वाचु नका. " फिर ये ना कहना के मैने वार्निंग नही दी थी". कविता तशी "गद्यमय पद्य" या प्रकारात मोडणारी आहे, काही ठिकाणी यमक बळंबळंच जुळवले आहे. बर्याच ठिकाणी तोच-तो पणाआहे असंही वाटू शकतं. विषय देखील थोडा "सिरीयस" प्रकारात मोडणाराच आहे. पण कशी का असेना, माझ्यासाठी ती माझी पहिली कविता आहे.


मी एवढं घाबरवल्यावर पण पुढे वाचण्याचा तुमचा अट्टाहासच असेल तर वाचकहो .. प्रस्तुत आहे .... खरं तर कविता जेव्ही लिहिलीतेव्हा ती नाटकासाठी असल्याने त्याला काही नाव वगैरे दिलं नव्हतं ... आता काहीतरी ठेवतो .... तर वाचकहो, प्रस्तुत आहे


अबाधित

कधीतरी ऐकलं होतं, की दृष्टीआडही एक सृष्टी असते,
पण त्या सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला नसते.


निर्विवाद सत्यांच्या एका सृष्टीत आपण जगतो,
कारण त्या सत्यांची सत्यता आपल्याला पडताळता येत नसते.


विश्रांतीसाठी झोप घेणं हा एकच उपाय आपल्यला ठाउक आहे,
कारण झोपेत आपले अस्तित्व आपल्यालाच जाणवत नसते.


झोपेत काय घडतं हे आपल्याला आठवच नाही,
आणि आपण काय विसरलो हे आठवण्याचा प्रयत्नही आपण करत नाही.


झोप ही विश्रांती आहे असं आपण मानतो,
तिला दुसर्या दृष्टीकोनातुन पाहण्याचा प्रयत्न करत नाही.


पण एकदा वाटलं झोप म्हणजे विसावा नसेल तर काय?
झोपेपर्यंत विश्रांती आहे, झोपेत कष्ट असतील तर काय?


झोप हा जर दरवाजा असेल, स्वप्नातुन सत्यात जाण्याचा,
मग तोच का नसेल एकमेव रस्ता, या प्रवासाच्या परतीचा?


पण मग सत्याची आणि स्वप्नाची परिभाषा काय?
या दोन जगांना विभागणारी रेषा काय?


मी खरा की माझं प्रतिबिंब हे मला कसं कळणार?
आरशाच्या आतुन बाहेरच्या स्वतःला मी कसं ओळखणार?


माझी सत्यातली ईच्छा मी स्वप्नात पूर्ण करतो,
सत्यात ज्याची भिती वाटते ते पण स्वप्नातच बघतो.


ईच्छापूर्ती जर स्वप्न असेल तर ईच्छाभंग का नसेल?
स्वप्नातलेच स्वप्न म्हणजे सत्य का नसेल?


म्हणजे ईच्छा हेच मुळ आहे का जगण्याचं?
तेच आहे का प्रतिक प्रवासातल्या दीपस्तंभाचं?


ईच्छेचा पत्ता शोधत राहणं हेच माझं काम आहे का?
त्या पत्त्याकडे जाणारा रस्ता मला माहिती आहे का?


पण ईच्छा पूर्ण झाल्यावर तरी माझा प्रवास थांबतो?
का परत एक नवीन पत्ता माझी वाट बघत असतो?


म्हणजे ईच्छापूर्ती हाही थांबा नाही का?
माझ्या प्रवासात कुठेच विसावा नाही का?


काळाला आव्हान देणं मला शक्य आहे का?
त्याच्या प्रवाहाविरुद्ध जाणं माझ्या हातात आहे का?


काळाचे दुत त्याच्या प्रवाहात अडथळा येउ देत नाहीत,
मी केलेला विरोध त्याला अपवाद असेल का?


आहे का अशी कुठली जागा जिथे काळही विसावा घेतो,
सदैव सगळ्यांना घेउन वाहणारा प्रवाहही क्षणभर थबकतो?


पण तो क्षण देखील काळाशिवाय कसा मोजणार?
काळाशिवाय क्षणाचा विचार तरी कसा करणार?


विचार .. विचार हेच मुळ आहे प्रत्येक प्रश्नाचं.
विचार हेच कारण आहे प्रत्येक उत्तराचं.


विचारांचा प्रवाह काळाशी जिंकण्याचा प्रयत्न करतो,
पण काळापुढे जाण्याचा प्रयत्न विफळ असतो.


स्वप्न आणि सत्य, दोन्हीकडे विचार आहे,
म्हणुनच त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे.


विचार नसला तर प्रश्न नसतील,
आणि त्यांचा विचार करायला लावणारी उत्तरही नसतील.


मग अशा अबाधित सत्यालाच तडा गेला तर?
विचारांची देणगी म्हणजे शाप असला तर?


आयुष्याच्या वर्तुळावर जीवनाच्या शेवटी मृत्यू दिसतो,
मृत्युच्या आधीपर्यंत जीवन असाही दृष्टीकोन असु शकतो.


मग कोणता दृष्टीकोन योग्य हो कोणी ठरवायचं?
समोरची गोष्ट कोणत्या डोळ्याने दिसते हे कसं सांगायचं?


कधीही न संपणार्या विचारांच्या रात्रीला कधी सकाळ होईल का?
मी अडकलेल्या चक्रव्युहातुन मला सुटका मिळेल का?


या विचारांचा गुंता सोडवण्यासाठी मी अजुन विचार करतो,
तेव्हा सुटलेला गुंता मला एकच गोष्ट सांगतो.


या सगळ्याचा विचार न करणं यातच याचं उत्तर आहे,
....
मृत्युनंतर नसतील विचार, एक अबाधित सत्य सांगतं
.....
या अबाधित सत्यात तरी तथ्य असेल का? मन लगेच विचारतं ......................
अमोल पळशीकर
०८।०७।२०००

विसंवाद

सुट्टीचा दिवस, सकाळची वेळ, एकंदरीत सगळं काही "निवांत" असतं. मी उशीरा उठुन चहा पिऊन बाहेरच्या खोलीत येतो. तिथे माझा भाऊपेपर वाचत बसलेला असतो. मी थोडा वेळ टंगळमंगळ करतो, शेवटी न राहवुन बोलतो
मी- काय वाचतो आहेस एवढा वेळ?
तो- तुला काय करायचं आहे? (पुण्याला येउन १० वर्ष झाली आहेत तशी त्याला, प्रश्नाचं उत्तर प्रश्नानेच
द्यायला शिकला आहे तो)
मी- मला पेपर वाचायचा आहे. ("काही" लोकांचा विश्वास असो अथवा नसो, मी रोज पेपर वाचतो हे
त्रिकालाबाधित सत्य आहे)
तो- (माझ्या या वाक्यावर तो नुसतंच विकट का काय ते म्हणतात तसं हसतो)
मी- दात काढायला काय झालं रे !! घशात घालू का सगळे?
तो- सकाळी सकाळी कोणी दुसरं मिळालं नाही का रे कावळ्या, म्हणे पेपर वाचायचा आहे, तुझ्या चोचीला
सेलाटेप लावतो, म्हणजे तुझी बडबड बंद होइल.

(स्वयंपाकघरातुन ओट्यावर भांडी आपटल्याचा आवाज येतो. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. "कावळा" हा शब्द उच्चारला गेला असतो. शिंग फुंकलं गेलं असतं. आता रणभूमीतुन माघार घेणं माझ्या "मानी" स्वभावाला "मानवत" नाही.)

मी- कावळा कोणाला म्हणतो रे घुबडा? तुझी मान पिळुन दोर्याने बांधुन ठेवीन.
तो- ए वटवाघळा, पंख्याला उलटा टांगु का तुला.

(पक्षीसृष्टी अपुरी पडायला लागल्यामुळे मी जलचरांकडे धाव घेतो)

मी- अरे जा रे, पाणगेंडा कुठला, तुझ्या त्या मोठ्या नाकपुड्यांना भोंगे लावुन ठेवीन, म्हणजे तू घोरायला
लागलास ना की ते वाजतील.

(पाणगेंडा हा जलचर नसतो एवढा विज्ञानाचा भाग वगळला तर पाणगेंड्याच्या नाकपुड्यांना भोंगे लावण्याची माझी कल्पना तुम्हाला कशी वाटली? माझ्या भावाला ही कल्पना ऐकुन उत्स्फुर्तपणे आलेलं हसु दाबण्यासाठी त्याचा चालू असलेला प्रयत्न आणि माझ्या या जोरदार वाराला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याची उडालेली धांदल माझ्या चाणाक्ष नजरेतुन सुटत नाही. तो पेपर खाली ठेवतो. त्याचं पक्षीसृष्टीचं ज्ञानही माझ्याइतकंच दिव्य असल्याने तो पण उभयचरांवर उतरतो.)

तो- ए बेडका, जास्त छाती फुगवू नको, तुझे बाहेर आलेले डोळे एकमेकांकडे वळवुन तुला zoo मधे ठेवीन,
मग चकणा बेडुक कसा दिसतो ते बघायला लोक येतील तिथे.

(माझ्या वाराला तोडीस तोड प्रत्युत्तराची अपेक्षा नसल्याने मी थोडा बावचळतो. स्वयंपाकघरातला आवाज थोडा वाढल्यासारखं वाटतं. भांड्यांच्या आवाजाबरोबरच काही मंत्रोच्चार पुटपुटल्यासारखा आवाजही येत असतो पण आमचं तिकडे लक्ष नसतं. आता भूचर विशेषणांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही हे कळतं, आणि जास्त वजन पडावं म्हणुम एकाच वंळी अनेक भूचर विशेषणांचा वापर करायला सुद्धा मी मागेपुढे बघत नाही. अशावेळी माझ्याकडचे प्राणी आधी "संपण्याची" शक्यता असते. पण तेवढी calculated risk मी घेतो.)

मी- तू हत्तीचं पोट आणि उंदराचं डोकं असलेला रानगवा आहेस. कोणीपण दिसलं की मारायला धावतोस.
चाबकाचे फटके लावले पाहिजेत तुला, त्याशिवाय ऐकणार नाहीस तू! (टाळ्या)
तो- तू उंटाची मान आणि शहामृगाचे पाय असलेलं लाल तोंडाचं माक़ड आहेस, तुला माणसांच्या जवळ
फिरकु द्यायला नको, उलटं टांगुन मिरच्यांची धुरी दिली पाहिजे.

(माझ्या भावाला सारखं मला उलटं टांगायची ईच्छा का होत होती काय माहीत. स्वयंपाकघरातुन येणार्या मंत्रोच्चार जोर वाढला असतो, भांड्यांचा आवाज असतोच. त्यातुन आमचा आवाजही नकळत वाढलेला असतो. त्यातुन निर्माण झालेला सामुहीक आवाज हा शेअरमार्केट मधल्या गोंगाटाला लाजवेल असा असतो. आता हातघाईची लढाई सुरू झाली असते, "ठेवणीतली" खास शस्त्र वापरायती वेळ आली असते, आता नस्त लांबण लावायचं नसतं, फक्त एकेक ईरसाल भूचर विशेषणाचा बाण भात्यातुन काढायचा आणि फेकायचा असतो.)

मी- बैल!
तो- घोडा!
मी- एकशिंगी गेंडा!
तो- गाढव!
मी- डुक्कर!!!!!!!!!!!!!!!!

हा शब्द उच्चालल्यावर जादुची कांडा फिरवल्यासारखी सगळीकडे एकदम शांतता पसरते, सगळे आवाज बंद झालेले असतात, खोलीच्या दारात आई उभी असते. तिच्या चेहर्याकडे पाहुन तिच्या मनात आमच्या बाबतित काय विध्वंसक विचार येताहेत ते स्वच्छ दिसत असतं. या डुकराने काय घोडं मारलं आहे कुणास ठाउक (हाहाहा!) पण आमच्यापैकी कोणीही हे संबोधन वापरलं की तिचा पारा चढतो. आईच्या चेहर्याकडे पाहुन तिच्या मनातले आपण वाचलेले विचार बरोबर आहेत का नाही याची परीक्षा घेण्याइतके आम्ही नतद्रष्ट नाही. क्षणाचाही विलंब न लावता भाऊ परत पेपरात डोकं घालुन "आजचं भविष्य" वाचायला लागतो. मी देखील पापणी लवायच्य़ा आत त्या खोलीतुन नाहीसा होतो. मगाजचे मंत्रोच्चार परत सुरू होतात. आता बाकी सगळं शांत असल्याने ते नीट ऐकू येत असतात. "एवढी वयं वाढली तरी अकला येत नाहीत, एकतर सारखं लोळत पडायचं TV समोर नाहीतर मुर्खासारखे वाद घालुन मला त्रास द्यायचा. घरात एक काडी इकडची तिकडे करायची नाही...." असं परिचयाचंच स्तोत्र कानावर पडतं. हा आख्खा अध्याय मला पाठ असल्याने पुढचं मी ऐकत नाही. "पुन्हा अशी वेळ आली तर?" या विचाराने मी नवीन प्राणीविशेषण शस्त्रांना धार लावायला सुरुवात करतो. माझा आणि माझ्या भावाचा (वि)संवाद नेहेमीप्रमाणेच सुरू झालेला असतो आणि नेहेमीप्रमाणेच संपतो.
Originally posted on 8/30/2005

असंच!

Ok, so without the self knowing what this tagging business is, Ajit has "tagged" me which probably means writing some stuff on your blog. If thats that, thats that, what!! I mean, if your friend asks you to write something, you write. Besides, since it is about books, I dont mind writing about it.

Number of books I own:
Easily 150+ and if you want to include technical books also, add another 100 or so.

The Last Book I Read (and Bought) :
The last one I bought, but not read yet is "Pigs have Wings - P.G Wodehouse".
The last one I read is:
A pelican at Blandings - P. G. Wodehouse - A fantastic blandings story with Lords Emsworth at his best.


Books That Mean A Lot to Me :

असा मी असा मी, बटाट्याची चाळ, हसवणुक इ. इ. - पु. ल. देशपांडे
सामन्य माणसाबद्दलचं असामान्य पुस्तकं. स्वतःवर कसं हसावं हे मी या पुस्तकांतुन शिकलो. इतरांना हसवण्याची इच्छा असेल तर स्वतःवर हसता येणं फार महत्वाचं असतं (हे कोणीही न वितारता पण सांगतो आहे, काय करणार, जित्याची खोड ... ).

महानायक - विश्वास पाटील
अतिशय प्रेरणादायी पुस्तक.

The Complete Collection of Sherlock Holmes - Sir Arther Conan Doyle
No doubt, a masterpiece. I can write a lot about this, but this is not the place, probably THIS has some more things.

Illusions - Richard Bach
I read this one because someone told me that one of my marathi plays at Puruhottam Karandak, "Limit" resembled this book. After reading it, I found out that this "someone" had neither understood t

विरोधाभास - The paradox

विनोद हा सर्वांना हसवण्यासाठी असतो हे खरं, पण दर्जेदार विनोदनिर्मितीसाठी खुप गांभीर्याने विचार करावा लागतो. म्हणुनच

"गंभीरपणे केलेला विनोद" हा मुळात जरी विनोद असला तरी गंभीरपणे विनोद करणे हा काही विनोदाचा भाग नाही.

केवढा हा विनोदाभास...अर्र!! हे आपलं ... विरोधाभास.
Originally posted on 6/24/2005

अनभिषिक्त

It is well known in the circles in which I move that Amol seldom praises a person (owing thishabit to the fantastic city in which he has been living for quite some time now). No sir,not so easy to make him like something. But when he likes someone, there is no limit tothe good words he has to say about him/her.
Hardly a day has passed in last few months without me reading a P G Wodehouse for at least an hour. I have liked it to the extent that on busy days, I have even sacrifised some of my otherwise essential "eight hours" to read what Jeeves/Bertie/Gally or Lords Emsworth are up to. I had tried to read PGW books a few years back but my limited knowledge of the language prevented me from proceeding beyond the preface.
We were arguing that day; me and my mind; about the later's habit of discouraging me anytime I think of an ambitious scheme. The dialogue went as follows

Me: I should make another attempt at the PGW books
Mind: Forgot about the last time's disaster so soon?
Me: Well, one fails but tries again
Mind: And fails again and again and again...especially if one's GRE score in verbal is 380/800.
Me: But I was good at Toefel
Mind: That was American, PGW is English, get a grip on yourself, you have to start from learning which thing is in which language.
Me: But I can just start, understanding the meanings of words by context or leaving them for the time being and later check the meaning in the Dictionary.
Mind: You have started talking like that brain of yours!! This is no software where you might leave something as TBD and come back later, Ha!!!

Most disturbing, as you would agree. But we Palshikars are men of strong will. As the mind started dominating the discussion, I decided to show the iron hand in the velvet glove; if you know what I mean. I said the words which rescue me eveytime I am losing a verbal battle. I kept the upper lip stiff and said
"I am going to do it no matter what you or othersthink".
"Very good", the Mind said,
"Right Ho then!!" continued I.
People close to me might disagree, but being headstrong has its advantages,as it is visible in the case at hand.The count of PGW books I have bought and read has become two digits long back. The whole thing is very easy. You take a PGW in your hands, you read it, you laugh, you love it, you finish it, you buy another PGW and you jump back to the beginning of this sentence.
In the little kingdom of humour which lies in my heart, there are many places for knights and soldiers but very few (yes, more than one) for kings. PGW is an undisputed(अनभिषिक्त) king ..if undisputed in the word I want .. in there. Everytime I finish a PGW... eager to know when I can start another one, "Sir P G Wodehouse" I say to myself "You stand alone".
Originally posted on 6/14/2005

असंबद्ध- The Irrelevant

दुपारचे १२ वाजले आहेत. मा खुप दिवसांना ब्लॉग लिहितो आहे. एका दिवसात २४ तास असतात आणि तेवढ्या वेळात पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. मी मंदिरात गेल्यावर देवाभोवती प्रदक्षिणा घालतो पण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यात का पॉइंट आहे? पॉइंट म्हणजे लांबी-रुंदी-खोली नसलेली गोष्ट. त्याला मराठीत बिंदू असे म्हणतात. बिंदू हे एका चित्रपट अभिनेत्रीचे नाव आहे. "नावात काय आहे" असं शेक्सपिअर नावाचा इंग्रजी लेखक म्हणुन गेला आहे. पण तो म्हणला म्हणुन लगेच ते खरं मानायची गरज नाही. अशा स्वभावाला मराठीत अहंकार असं म्हणतात. सारखं ओम्-ओम् केल्यास त्याला जसं ओंकार म्हणतात तसंच सारखं अहम्-अहम् (म्हणजे मी-मी) केल्यास त्याला अहंकार म्हणतात. अहंकारला यमक जुळवायला टुकार, भिकार, चुकार, आकार, विकार, चिक्कार, धिक्कार हे शब्द वापरता येतील. उदाहरणार्थ,
लेखक आहेस तू चुकार,
तुझी शब्दनिवड किती टुकार,
शुद्धलेखन त्याहुन भिकार,
कवितेला ना कोणताच आकार,
आणि म्हणे प्रसिद्धी हवी चिक्कार,
किती हा अहंकार,
हा आहे एक मानसिक विकार,
लेखका तुझा असो धिक्कार!!
यालाच शीघ्रकाव्य असे म्हणतात. शीघ्र म्हणजे पटकन. अरे! किती पटकन १२:३० वाजले. आता मला भुक लागली आहे. मी जेवायला जातो. माझा मित्र जेवायला बोलावतो आहे, म्हणे "लवकर चल, नाहितर नंतर माझ्या कामाचे तीन तेरा वाजतील. " कामाचा आणि जेवणाचा काय संबंध? किती असंबद्ध बोलतात काही लोक!!!
Originally posted on 3/14/2005

परफेक्ट!!

३१ डिसेंबरची संध्याकाळ, ६-१५ वाजता निघायचं ठरवुन नेहमीच्या सवयी प्रमाणे आम्ही (म्हणजे "espians" -- SP कॉलेज मधल्या मित्रांचा ग्रुप) ७-१५ ला निघालो. नेहमीप्रमाणे सुरवातीचा थोडा वेळ उशीर नक्की कोणामुळे झाला यावर वाद घालण्यात गेला. साधारणतः ८ च्या सुमारास आम्ही पानशेत जवळच्या "शांतिवन" नावाच्या ठिकाणी पोचलो. नावाप्रमाणे इथे सगळं शांतच होतं. नाही म्हणायला त्या कार्यालयात एक माणुस आणि एक वॉचमन भुतासारखे बसले होते. आम्ही आल्यावर तिथल्या माणसाने " काय कटकट आहे" असे भाव आणुन आमचं बुकींग बघुन २ खोल्यांच्या किल्ल्या दिल्या. अंधार असल्यामुळे आजुबाजुचा परिसर कसा आहे याचा काही अंदाज येत नव्हता. आमच्या खोल्या झोपडीवजा आकाराच्या, समोर छोटीशी ओसरी असलेल्या अशा होत्या. सामान आत ठेवुन आम्ही थोडा वेळ हिंडायला गेलो. परत आल्यावर आमच्या खोल्यांच्या मागच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या खाटांवर गप्पा मारत बसलो. खोल्यांच्या मागच्या बाजुलाच शांतिवनचा "विज्ञान कक्ष" देखिल होता. तिथे अनेक "विज्ञानसंबंधित" गोष्टी होत्या. त्यामधे एक सायकलवर बसलेला हाडांचा सापळा होता (माणसाचा). त्या सापळ्याचं प्रयोजन मला शेवटपर्यंत कळलं नाही. काही वर्षांपुर्वी मी बारीक असण्याच्या बाबतीत त्या सापळ्याला competition देऊ शकलो असतो, पण आता ते शक्य नाही.... असा एक विचार माझ्या मनात डोकावुन गेला.
नंतर वर दिसणार्या निरभ्र आकाशाकडे बघुन प्रत्येकाने आपलं "आकाश निरीक्षणाचं" ज्ञान पाजळायला सुरुवात केली. "व्याध कुठला आणि ध्रुव कुठला .... सप्तर्षी कसे ओळखायचे ... मृग नक्षत्र कधी दिसतं" अशा अतिशय मुलभूत प्रश्नांवर वाद चालू होते. मला आकाशात फक्त चंद्र आणि सूर्य एवढ्याच गोष्टी ओळखता येत असल्यामुळे मी त्या वादात फारसा पडलो नाही.
थोड्या वेळाने वादाची तीव्रता कमी झाल्यावर "वा! किती छान शांत वाटतं आहे" असं आम्ही म्हणायला ... आणि थोड्या वेळापूर्वी तिथे आलेल्या एका ग्रुपने त्यांनी आणलेल्या एका महाकाय music system वर कर्णकर्कश्य आवाजात "कसा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला" हे गाणं लावायला एकच गाठ पडली. आम्ही एरवी तावातावाने त्यांच्याशी भांडलो असतो पण तिथं जाऊन पाहिलं तर काही आमच्या वयाची आणि काही आमच्यापेक्षा वयाने बरीच मोठी माणसं, लहान मुलांच्या वाढदिवसाला घालतात तशा कोनाच्या आकाराच्या टोप्या डोक्यावर घालुन नाचत होती. आम्ही हताश होउन आपल्या जागेवर परतलो.
भूक वाढायला लागली होती पण तिथली माणसं काही सांगितलेल्या वेळी जेवण द्यायला तयार नव्हती. आमच्या संयमाची पुरेपुर परीक्षा घेउन झाल्यावर त्यांनी आम्हाला जेवण दिलं. तेच जेवण मी आत्ता जेवलो तर मला ते आवडेल का? हे मला सांगता येणार नाही. जेवण आवडायला नुसती अन्नाची चवच नाही तर आजुबाजुची परिस्थिती पण तितकीच आवश्यक असते. न थांबता एका दमात सिंहगड चढुन गेलेल्या माणसाला विचारावं की पिठलं भाकरी कशी लागते .... पण एखाद्या मित्राला engineering च्या परिक्षेच्या आदल्या दिवशी जेवताना "श्रीखंड कसं झालंय?" हा प्रश्न कोणीही विचारु नये.... थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या दिवशी जोरदार भुकेमुळे, छान गार हवेमुळे, (बाजुला चालु असलेल्या "मेरे पिया गये रंगुन" च्या REMIX मुळे) आणि मुख्य म्हणजे जवळच्या मित्रांच्या संगतीमुळे असं काही छान जेवण झालं ... की जवाब नही!!!
पोटभर जेवणानंतर छान filter coffee प्यायलो आणि आम्ही वख्खई खेळायला बसलो. त्या दुसर्या ग्रुपची गाण्याची अभिरुची फारच चमत्कारीक होती. रिमिक्स नंतर "शोला जो भडके" वगैरे जुनी हिंदी गाणी आणि मग मराठी भक्तीसंगीतावर गाडी घसरली होती. त्यामुळे त्याच्या मानसिक आणि बौद्धिक संतुलनाबद्दल आमच्या मनातला संशय अजुनच गाढ झाला हे वेगळं सांगायला नको.
पत्त्यांचा डाव आणि गप्पा छान रंगल्या होत्या. बघता बघता पहाटेचे ४ कधी वाजले आणि गप्पा मारत आम्ही झोपलो कधी ते कळलं पण नाही. सकाळी उठल्यावर कळलं की भोवतालचा परिसर फारच सुंदर होता. मग थोडा वेळ फोटोग्राफीमधे गेला, परत भूक लागली. न्याहारीला झकासपैकी पोहे-कांदाभजी आणि चहा वा!! , गार हवेत या पदार्थांची मजा काय असते हे कोणाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही.
भरल्या पोटाने आणि उतु जाणार्या आनंदानं मी तिथुन निघालो. या सगळ्याचं एका शब्दात वर्णन करायला माझं मराठीचं ज्ञान तोकडं पडतं. या नविन वर्षाची सुरवात शांततेतही नव्हती, दंग्यात पण नव्हती, नाट्यमय नव्हती, निरुत्साही पण नव्हती, भव्य-दिव्य नव्हती, यःकश्चितही पण नव्हती , ती होती ...... परफेक्ट!!
Originally posted on 1/19/2005

The game is afoot!!There is no character that has fascinated me more than that of Sherlock Holmes. Hats off to Sir Arthur Conan Doyle. The character is now so well defined in my head that like many others, I would also like to beleive in a thought that he actually existed :). Characteristically, he is defined to be "Unpredictable" and yet, none of his extraordinary actions like the ones in "Adventure of the Dying Detective" look out of place. Many authers write "unjustifiable" things for characters which are defined to be unpredictable, but the actions of Shcerlock Holmes, though being extra-ordinary..are "consistent" with his character. Showing a very extraordinary yet consistent behaviour of a unpredictable character is a real difficult thing, and thats the beauty of Sherlock Holmes misteries that attract me the most.
I tried getting a similar costume on my Yahoo Avtar but it dint work out that well :D:D:D
I wish that I will be able to go to london at least once to visit 221 Baker street and sit in his armchair smoking a (empty :D) pipe wearing the same costume as the great detective himself and do the same thing as they describe
"A ring comes at the bell; a step is heard upon the stair. The drooping eyelids lift, and the nostrils quiver with the thrill of the chase: "Come, Watson come, the game is afoot!"
Originally posted on 12/2/2004

काही नवे वाहतुकीचे नियम

आपल्याला Learning Liscence काढताना वाहतुकीच्या चिन्हांबद्दल जे काही प्रश्न विचारले जातात ना त्या यादी मधे नसलेले पण पुण्यात गाडी चालवायला अतिशय आवश्यक असे काही वाहतुकीचे नियम इथे लिहायचा विचार आहे. या नियमांसाठी आवश्यक चिन्हे नेहेमिप्रमाणे लाल-पांढर्या रंगाच्या फलकावर न दिसता आजुबाजुच्या रहदारीतच त्यांची "लक्षणं" दिसतील हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.

नियमाचे नाव - Landing Gears
लक्षण - साडी नेसलेल्या काकू Kinetic Honda, Honda Activa यासारख्या एखाद्या वाहनावरुन तुमच्या पासुन १० फुटाच्या पट्ट्यात चालल्या आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि त्या काकू अद्रुश्य होइपर्यंत जागचे हलु नका.
विशेष दंडपात्र गुन्हा - काकुंना overtake करण्याचा प्रयत्न करणे, त्याना side मागण्यासाठी horn वाजवणे इ.
संदर्भासह स्पष्टीकरण - विमान land होताना त्याचे Landing Gears जसे बाहेर येतात तसे गाडी चालवताना काकुंचे दोन्ही पाय गाडीच्या बाजुला येउन जमीनीला घासत असतात, आणि तशाच अवस्थेत त्या ४०-५० कि.मी. प्रति तास या वेगाने त्या गाडी चालवत असतात. जवळपास एखादा चौक असल्यास त्यांनी केलेल्या हातवार्यांवरुन त्या ज्या दिशेला जातील असं वाटत असेल त्या दिशेला त्या जातीलंच असं नाही. मी एकदा दुपारी एका रिकाम्या रस्त्यावरुन जात असताना अशाच एका काकुंनी चौकात आल्यावर डाविकडला indicator दिला, उजवीकडे हात दाखवला आणि त्या सरळ निघुन गेल्या !!!!!!!!!!
त्यांना overtake करायला तुम्ही speed वाढवायला आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या हातगाडीवरची भाजी बघुन "अय्या! किती छान रताळी" असं म्हणत मागचा-पुढचा (विशेषतः मागचा) काहीही विचार न करता त्यांनी ब्रेक दाबायला एकच वेळ असू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्यांना side मागायला horn वगैरे वाजवलात तर त्या आवाजाने दचकुन त्या आपल्याच गाडिवर पडतात. "kinetic वरच्या काकू" यापेक्षा धोकादायक गोष्ट पुण्याच्या रस्त्यावर शोधुन सापडणार नाही (नाही... मोटारसायकल वरील मुलगी देखील नाही)

नियमाचे नाव - Godzilla
लक्षण - एखादी मुलगी Indigo, Esteem, Scorpio (!!) यासारख्या एखाद्या मोठ्या वाहनातुन तुमच्या पासुन १०० फुटाच्या पट्ट्यात चालली आहे.
नियम - Godzilla अथवा King Kong यासारख्या सिनेमात त्या महाकाय प्राण्याला पाहिल्यावर लोक जसे पळत सुटतात तसा आपला जीव मुठीत धरुन वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटा. (पळताना माफक प्रमाणात आरडा-ओरडा केलात तरी चालेल.) ती गाडी कधी, कशी, कोणाच्या अंगावर येइल काही सांगता येत नाही.
विशेष दंडपात्र गुन्हा - ती मुलगी जर आपल्या वाहनाच्या मागे असेल आणि horn वगैरे वाजवत असेल तर ताबडतोब side द्या आणि "आज आपल्याला शिर सलामत तो पगडी पचास किंवा जान बची तो लाखो पाये... अशा म्हणींचा प्रत्यय आला" अशी मनाची समजुत घालुन घ्या.

नियमाचे नाव - आजोबा crossing
लक्षण - ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आजोबा तुमच्या समोर रस्ता cross करत आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि एखाद्या सुजाण नागरिकाप्रमाणे आपल्या मागुन येणार्या लोकांना देखिल ओरडुन ... नाहितर वेड्यासारखे हातवारे करुन संभाव्य धोक्याची जाणिव करुन द्या. कारण आजोबांना जर रस्ता cross करायची लहर आली तर ते " मला आता रस्ता cross करायचा आहे आणि तो मी करणारच" या दृढनिश्चयाने ते आपले दोन्ही हात उंचावुन रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या वाहनांना " थांबा" असा इशारा करुन बाकी कसलिही पर्वा न करता चालायला लागतात .. मग त्या निश्चयापुढे आपल्यासारख्या " आज दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा/क़ॉफी प्यायची नाही" असला साधा निश्चय पाळता न येणार्या पामरांची काय कथा?
विशेष दंडपात्र गुन्हा -गाडी आजोबांच्या फार जवळ नेऊन थांबवणे. असे केल्यास किमान अर्धा तास रस्त्याच्या कडेला रणरणत्या उन्हात उभे राहुन " आजच्या पिढीचं काय चुकतं" या विषयावरिल व्याख्यान ऐकण्याची तयारी ठेवा.

सध्या एवढ्या नियमांचे नीट पालन करा. दुरदर्शन वर सांगतात ते लक्षात ठेवा ..... " मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" , " गाडी नीट चालवा, घरी कोणितरी तुमची वाट पाहत आहे" " दुर्घटनासे देर भली" इत्यादी.

आपलाच एक शुभचिंतक (आणि समदुःखी वाहनचालक)
Originally posted on 12/10/2004

नावात काय आहे?

परवा संध्याकाळी फोन वाजला, मी उचलल्यावर तिकडुन प्रश्न आला "क्यान आय स्पिक टू मिस्टर अमौवल पलशानका ? " मला २ सेकंद काही सुधरेच ना! मग माझ्या लक्षात आलं की हे माझ्याच नावाचं अजुन एक "विलायती" रुप आहे (Palshikar मधला शेवटचा r silent समजुन) . तसे माझ्या नावाचे अनेक अपभ्रंश मला आता ठाउक आहेत. पण हे काहीतरी नविनच प्रकरण होतं.
आता मला सांगा, माझं "अमोल पळशीकर (spelled as: Amol Palshikar)" हे नाव उच्चारायला खरंच इतकं अवघड आहे का? त्यात एकपण जोडाक्षर सुद्धा नाहिये. पण त्या फोनवरची बाई ते उच्चारताना, आपल्याला दातांच्या डॉक्टरने जबड्यात किंवा जिभेला भुलेचं इंजेक्शन दिलेलं असताना बोलायला जितका त्रास होतो, तितका त्रास झाल्यासारखं बोलत होती. पण तिने खास विलायती ऍक्सेंट न वापरता माझं नाव नीट उच्चारलं असतं तर मला कळलं नसतं का, की तीचं शिक्षण भारतातच झालं आहे, मग तिचा तो केवढा अपमान झाला असता !!! या ऍक्सेंटच्या नादात इंग्रजी भाषेत उच्चारशास्त्र हादेखील एक महत्वाचा भाग आहे हे विसरुन जाणारे अनेक लोक आहेत.
आता तिला एकटीलाच काय दोष द्यायचा. माझ्या नावाचा सर्वात भयंकर अपभ्रंश करण्याच्या स्पर्धेत धोबी, किराणामालाच्या दुकानातले मारवाडी दुकानदार, दवाखान्यातले रिसेप्शनिस्ट हे देखिल मोठ्या हिरीरीने भाग घेतात. काही उदाहरणे खालिलप्रमाणे (अपभ्रंशपातळीच्या चढत्या क्रमाने),
१) पळसकर
२) पळसेकर
३) पालिशकर (कशाला पालिश करायचं काय माहित?)
४) पलसुलकर (!!!)
५) पेलसेकर
६) पालसवार (???)

माझ्या भावाला याहुनही वेगळे अपभ्रंश माहित असतिल याची मला खात्री आहे.
कुणीतरी (नक्की कोणी ते मला माहित नाही :D) म्हंटलंच आहे, की "नावात काय आहे? (What's in the name)", त्या "कुणीतरी"चं मला माहित नाही, पण इतर फारसं काही कर्तृत्व नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला बाकी कशाने नाही तर फक्त नावाने लोक ओळखतात. म्हणुलच मला जर कोणी "नावात काय आहे?" हा प्रश्न विचारला तर माझं उत्तर असतं "या नावातच माझी ओळख आहे".
Originally posted on 10/15/2004