आपल्या महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटुंबामधे घर घेताना अथवा बांधताना ; "घरातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली?" या विषयावर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तोडीस तोड दर्जाचे मतभेद आणि वादविवाद असतात. पण कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला माहिती असेलच, की अशा वादांमधे तर्क , मुद्दे असल्या गोष्टींना काहीही स्थान नसुन घरातल्या मुख्य स्त्रीचं काय म्हणणं आहे त्यालाच महत्व असतं. आणि अशा वेळी स्त्रीवर्गाकडुन ज्या दोन गोष्टी सर्वप्रथम पाहिल्या जातात त्या म्हणजे स्वयंपाक घरातल्या ओट्याची लांबी किती आहे आणि त्या घरात किती माळे आहेत. घरातल्या खोल्याच्या आकारापेक्षा कपाटासाठी भिंतीत एखादी खाच असेल तर ती खोली जास्त आवडते. बाल्कनी मधुन दिसणार्या देखाव्यापेक्षा कुंड्या ठेवण्यासाठी कठड्यावर असणारी जागा जास्त महत्वाची असते. आणि खिडक्यांमधुन प्रकाश आणि वारा येतो का नाही यापेक्षा मांजर आत येऊ शकत नाही ना य़ाची काळजी जास्त असते.
तर अशा बुचकळ्यात पाडणार्या अनेक गोष्टींमधे घरातत्या माळ्यांबद्दलची आत्मियता मला सगळ्यात चमत्कारीक वाटते. तसं पाहिलं तर दाराच्या अथवा खिडकीच्या वर, छपरापासुन दीड हात जागा सोडुन, भरपुर वजन पेलू शकेल अशा ताकदीची विटांची रचना याव्यतिरीक्त त्या माळ्यात वर्णन करण्यासारखं काहीही नाही. त्यात कोणताही सौंदर्यभाव अथवा वास्तुशास्त्राचं कौशल्य देखील नाही.
जसं जसं घर लागायला लागतं आणि सामान वाढायला लागतं, तसे हळुहळ् हे माळे आपलं महत्व पटवायला लागतात. रोजच्या वापरात न लागणार्या, जून्या झालेल्या, बोजड, फेकुन द्यायच्या लायकीच्या असु कोणत्याही गोष्टीबद्दल "काय करु याचं?" असा प्रश्न विचारला असता तात्काळ "माळ्यावर टाक" असं उत्तर मिळतं. रद्दी, गाद्या, जुने कपडे, जास्तीची स्टीलची भांडी, धान्याचे डबे, चौरंग, पाट ... एक ना दोन, शेकडो गोष्टींची रवानगी माळ्यावर होते. त्या क्षणी त्या गोष्टी लवकरात लवकर नजरेआड करायच्या घाईपोटी काहीही विचार न करता आपण जमेल तशा गोष्टी माळ्यावर नुसत्या फेकत जातो.
अर्थातच अशामुळे त्या माळ्यांवरची झालेली अडगळ नजरेला फार काही सुखावणारी नसते. मग त्याची लाज वाटायला लागुन, आलेल्या पाहुण्यांपासुन ते दृश्य लपवण्याची आपली धडपड सुरू होते. मग माळ्यांना दारं करुन घेणं परवडत असेल तर ते, ते नाही जमलं तर घरातले जुने पडदे उंचीला कमी करुन लावणे आणि तेही शक्य नसल्यास जुन्या चादरी टाकुन तो पसारा झाकणे असे अनेक मार्ग अवलंबले जातात.
या सगळ्या प्रकारात सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे "माळ्यावरची जागा संपली" असं कधी होतच नाही. कसंही आणि कितीही सामान भरलं तरी अजुन एखादी गोष्ट ठेवायला एखादा कोपरा, दोन ट्रंकांच्या मधे, कपड्यांची गाठोडी थोडी आत दाबुन अशा कुठुन तरी ती जागा निर्माण होते. लहानपणी विज्ञानात "कृष्णविवर" नावाची गोष्ट शिकल्याचं मला आठवतंय. सूर्यकिरणांसकट कोणतीही गोष्ट शोषुन घेणारं, कितीही वस्तुमान सामावुन घेण्याची क्षमता असणारं असं हे कृष्णविवर. माळ्यांकडे बघुन मला त्यांची तुलना या कृष्णविवराशी कराविशी वाटते. पण कृष्णविवरात लुप्त झालेली गोष्ट पुन्हा बाहेर येणं ही महाकठीण गोष्ट. तसेच आपले हे माळे. माळे भरतांना केलेल्या घाईची आणि धसमुसळेपणाची सगळी शिक्षा त्यातुन गोष्टी परत बाहेर काढतांना आपल्याला मिळते.
एरवी कधीही न लागणारी एखादी गोष्ट एक दिवस एकदम महत्वाची होऊन जाते. ती मग इतक्या तत्परतेने हवी असते की हातातली सगळी कामं सोडुन (आणि त्याहुन वाईट म्हणजे कधी कधी सुटीच्या दिवशीचा आराम सोडुन) आपल्याला माळे धुंडाळायची वेळ येते. ही "महत्वाची" गोष्ट म्हणजे काहीही असु शकतं. कधी पाहुणे येणार या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करण्यासाठी कोणत तरी जुन्या घाटाचं पितळ्याचं पातेलंच काय हवं असतं. आधी वजन वाढल्यामुळे लहान झालेल्या कपड्यांमधला एखादा आवडता ड्रेस आता आपण परत कसे बारीक झालो आहोत हे इतरांना दाखवण्यासाठी त्या दिवशी तोच हवा असतो. तर कधी रेडीओ मधे बिघाड झाल्यावर जुन्या कागदपरत्रांच्या अनेक पिशव्यांमधुन त्या रेडीओच्या वारंटीचा छोटासा कागद हवा असतो. त्यातुनही माळे शोधण्याचं काम टाळण्यासाठी आपण आधी कपाटाच्या खालच्या कप्प्यात अथवा पलंगाखाली ती गोष्ट मिळते आहे का ते शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो ज्यातुन निराशेपलिकडे काहीही साध्य होत नाही.
सरतेशेवटी माळे शोधायच्या मोहीमेची आपल्याला तयारी करावी लागतेच. मोहीमेची सगळ्यात पहीली पायरी म्हणजे ती गोष्ट कुठल्या माळ्यावर, कोणत्या गाठोड्यात अथवा बॅगेत आहे हे आठवण्याचा प्रयत्न करणे. बहुतांशी ती गोष्ट कुठे ठेवली हे कोणालाच आठवत नसतं. तरीही माळ्यावरचं सामान चढवणारे आणि उतरवणारे मजुर आपणच असल्याने आपल्याच स्मरणशक्तीच्या कमतरतेबद्दल ताशेरे ओढले जातात. तो अपमान गिळुन आपण मोहीमेच्या पुढच्या पायरीची तयारी करायला लागतो, आणि ती म्हणजे माळ्यापर्यंत कस पोचायचं ते ठरवणे. कारण माळ्यावरच्या कोणत्याही कोपर्यापर्यंत हात पोचू शकेल इतपत उंचीची खुर्ची, स्टुल अथवा शिडी घरात ठेवण्याची दुरदृष्टी आपल्यात नसतेच. मग चौरंगावर स्टुल ठेवणे अथवा खुर्चीच्या हातांवर उभे राहणे इत्यादी डोंबार्याचे खेळ सुरु होतात. एवढं करुनही हव्या त्या बॅगेपर्यंत हात पोचत नसल्यास कुंचा अथवा कपडे वाळत घालायची काठी हातात घेउन त्या बॅगेच्या हँडल मधे अडकवुन ती ओढण्याचा विफल प्रयत्न आपण करतो. इतक्यात आपल्या या नसत्या उपद्व्यापामळे माळ्यावर शांतपणे आपल्या दृष्टीआड वास्तव्य करत असलेले सरपटणारे प्राणी बाहेर येतात. आणि मग "अगंबाई पाल!" असे उद्गार कानावर पडुन आपल्या पायाखालचा डुगडुगणारा डोलारा सांभाळणारे हात आपल्याला अक्षरशः ताटकळत (किंवा कधी कधी माळ्याला लोंबकळत ठेवुन ) नाहीसे झाले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. कधी भांडीच काय डोक्यात पडतात, कधी आपणच डोक्यावर खाली पडतो असा विलक्षण मनोरंजक कार्यक्रम चालु असतो. त्यातुन माळ्यावरची गोष्ट शोधायला निघालेला माणुस हा नशिबासाठी विनोद करण्याची सुवर्णसंधीच असते. आपल्याला हवी असलेली गोष्ट ही नेहमी शेवटच्या माळ्यावरच्या शेवटच्या गाठोड्यातच असते.
तर असा हा माळा वर्षानुवर्ष कोणाच्या अध्यात मध्यात न करता, सगळ्यांच्या नजरेआड, "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" अशी कोणतीही तक्रार न करता ओझं घेउन उभा असतो. कधीतरी नको ते सामान फेकुन देण्याच्या उद्देशाने तो आवरण्यासाठी खाली काढला जातो आणि "हे राहुदे, लागेल कधीतरी" असं करत काहीही न फेकता सगळं सामान परत तसंच वर टाकलं जातं.
आणि अशाच माळा आवरण्याच्या एखाद्या प्रसंगी हाच अडगळीचा माळा जादुची कांडी फिरवावी तसा खजिना होउन जातो. कधी लोखंडी ट्रंकेत जपुन ठेवलेली, वाळवी लागुन खराब झालेली, शाळेला मॅच जिंकवुन देताना वापरलेली बॅट सापडते. कधी लहानपणी तबला शिकतांना बोल लिहीण्यासाठी वापरलेली वही, तिच्या पानात जपुन ठेवलेली पिंपळाच्या पानाची जाळी किंवा एक रुपयाची नोट सापडते. कधी आजीचा जुन फोटो तर कधी लहानपणच्या विसरुन गेलेल्या एखाद्या मित्राचं पत्र सापडतं. आई-बाबांच्या कडेवर बसुन असलेला फोटो आपण बर्याच दिवसात त्यांच्याबरोबर म्हणावा तसा वेळ घालवला नाहीये याची आठवण करुन देतो. घरातल्या माळ्याबरोबर आपल्या मनातला पण असाच एक माळा पण उघडला जातो, जिथे अडगळ समजुन कोंबलेल्या जुन्या आठवणी, "नंतर केव्हातरी.. वेळ मिळेल तेव्हा" अशी पुढे ढकललेली स्वप्न आपण झाकुन ठेवलेली असतात. आणि अशा वेळी क्षणार्धात घरात आणि मनात माळ्याचं महत्व काय आहे हे कोणीही न सांगता आपल्या लक्षात येतं.
असाच एक दिवस माळा आवरताना, कॉलेजात असताना केलेल्या लिखाणाची वही सापडते, कोणे काळी आपल्याला लिहीण्याची आवड होती याची आठवण होते आणि तब्बल साडे तीन वर्षांनंतर मी असा एखादा ब्लॉग लिहायला बसतो.