"आपल्याला कधीही न मिळणारी गोष्ट ही आपल्याला नेहमी हवीहवीशी वाटते" हा साधा मनुष्यस्वभाव आहे. आणि तसंच "आपल्याला हवीहवीशी वाटणारी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही" हा निसर्गाचा साधा नियम आहे. ह्या दोन गोष्टींची जेव्हा बेरीज होते तेव्हा त्या गणिताचं उत्तर म्हणजे एका कमनशीबी जीवाची होणारी फरफट!
लहानपणी मी रामायण, महाभारत यासारख्या मालिकांमधे किंवा राजे-महाराजे असणार्या सिनेमांमधे बघायचो, की एखादी वाईट अथवा गंभीर बातमी मिळाल्यावर ते राजे बातमी देणार्या व्यक्तिकडे पाठ फिरवुन, कॉंग्रेसचा प्रचार केल्यासारखा आपल्या हाताचा पंजा बाजुला करुन "एकांत !" असं म्हणायचे. आणि मग तिथले सगळे लोक पटापट बाहेर निघुन जायचे. मला त्या "एकांत" ह्या संकल्पनेबद्दल तेव्हापासुन कुतुहल होतं. आणि तो कधीही अनुभवलेला नसल्यामुळे तो हवाहवासा वाटायला लागला. एकदा मी लहानपणीच घरात "एकांत !" असं जोरात ओरडुन तो मिळतो का ते पाहिलं. पण डोक्यावर एक टप्पल आणि दोन आठवडे टीव्ही न पाहण्याची शिक्षा यापलिकडे पदरात काही पडलं नाही!
कोणाला वाटेल त्यात काय एवढं? एकांत मिळवणं असं कितीसं अवघड आहे? मलाही तसंच वाटत होतं. थोडा मोठा झाल्यावर अजुन काही सिनेमांमधे "कुछ देर के लिये मुझे अकेला छो़ड दो!" असा एक संवाद ऐकला. विशेषतः नायक अथवा नायिका असं वाक्य बोलुन मोठ्या जिन्यानी वर जाऊन आपल्या खोलीचं दार धाडकन आपटतात असं ते दृश्य असायचं. आमचं घर तेव्हा मुळात एक बेडरुमचं होतं. त्यातुन तळमजल्यावर. त्यामुळे जीना आणि आपटायला दार या दोन्ही गोष्टींचा अभाव! तरी एकदा उगीच आपलं प्रयोग म्हणुन मी ते वाक्यं फेकलं आणि बेडरुमचं दार आपटायला म्हणुन ओढलं. दारांच्या मागची जागा ही आपल्या मध्यमवर्गीय घरांत पसारा लपवायचा एक छुपा कप्पाच असतो. त्यामुळे वर्षानुवर्षं कधीही बंद न केलेल्या दाराला मी हिसका देताच त्याच्या मागचा खिळ्याला टांगलेल्या पिशव्या, त्यातल्या नानाविधं गोष्टी, कपडे वाळत घालायच्या काठ्या, जुने कुंचे यांचा डोलारा मोठा आवाज करुन कोसळला. आणि मग बराच वेळ आईची बोलणी खाण्यात आणि तो पसारा आवरण्यातच गेला. ही तर झाली लहानपणची कथा. आता मोठा होऊन लग्न वगैरे झाल्यावर मी एकदा ते वाक्य बोललो तर "भरल्या घरात कसे असे दळभद्री विचार सुचतात? कसले हे भिकेचे डोहाळे? कशाला हवा आहे डोंबल्याचा एकांत? घरातली माणसं इतकी नकोशी झाली आहेत का? तसं असेल तर सांग, आम्ही जातो सगळे घर सोडुन. मग बस घरात भुतासारखा एकटा आढ्याकडे बघत!" इत्यादी वाक्य कानी पडली. मी "कुछ देर के लिये" एकांत मागतोय म्हणजे संसाराश्रम सोडुन सन्यासाश्रमात पदार्पण करायचीच परवानगी मागतो आहे अशी घरच्यांची धारणा झाली.
थोडक्यात काय, कोणत्यातरी "संयुक्तिक" कारणाशिवाय मला एकांत मिळायची चिन्हं दिसेना. म्हणुन अशा एखाद्या कारणाच्या शोधात मी होतो. एकदा कोणत्याश्या पुस्तकांच्या दुकानात "योगासने व प्राणायाम" शिकवणारी एक सीडी मला मिळाली. त्यात पाहतो तर काय! अतिशय शांत वातावरणात एकट्याने एकाग्रचित्ताने योगाभ्यास कसा करावा हे दाखवलं होतं. मला जवळजवळ हर्षवायुचा झटकाच आला. मी जोरात ओरडलो, "युरेका !". आजुबाजु्च्या कोणालाच अशा वर्तनाची अपेक्षा नसल्याने त्या आवाजाने सगळेच दचकले. माझी बायको तर माझ्याकडे "ही युरेका कोण?!" अशा संशयास्पद नजरेने पहायला लागली. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यामुळे मी तत्परतेने वे़ड्या ग्रीक शास्त्रज्ञाचा दाखला देऊन भविष्यातला संशयकलहं टाळला. आणि त्याचबरोबर माझ्या तब्येतीसाठी मी कसा योगाभ्यास केला पाहीजे आणि त्यासाठी एकांताची कशी गरज आहे हे सगळ्यांना पटवुन दररोज अर्ध्या तासाचं एकांतवासाचं लायसन्य मिळवुन सकाळची वाट पाहत मी झोपी गेलो.
दुसर्या दिवशी उठुन उत्साहाने मी एका खोलीत जाऊन बसलो आणि ओमकार म्हणायला सुरुवात केली. माझा प्रत्येक ओमकार चालू असताना बाहेरुन "कालचं सगळं दूध नासलं, असली कसली रे दुधं आणता तुम्ही?", "काल पेपरची पुरवणी का नाही रे टाकली?" , "कशी भांडी घासली आहेत? एवढे साबण आहेत, नीट लावा की जरा!" अशी वेगवेगळी तारस्वरातली वाक्या कानावर पडत होती. त्यामुळे तंत्र काही जमेना. मग मी उठुन मागील अनुभवातुन शहाणा होऊन दार हळुच लोटुन आत येऊन बसलो. तेवढ्यात आई काम करणार्या मावशींना घेऊन आत आली आणि तिला मी बसलेली जागा सोडुन बाकीची खोली झाडुन-पुसुन घ्यायला सांगितली. त्या मावशीपण सांगकामेपणाचा अतिरेक करत माझ्या चहु बाजुंनी जेमतेम दोन इंचाच्या अंतरावरुन कुंचे आणि फडकी फिरवायला लागल्या. भारतातुन प्रयाण करणार्या अलेक्झँडरला एका सन्यास्याने सांगितलेल्या "प्रत्येत माणसाच्या अधिकारात तेवढीच भुमी असते ज्यावर तो उभा असतो" या वचनाचा मला तंतोतंत प्रत्यय आला आणि तो नाद मी तिथेच सोडला.
सकाळची ही कटकट रोजचीच असल्यामुळे मी सुट्टीच्या दिवशी दुपारी प्रयत्न केला. मी बसल्यावर तिसाव्या सेकंदाला बेल वाजली. दार उघडुन बघतो तर एक गृहसुथ पोट साफ करण्यासाठी कसलेसे घरगुती काढे विकायला आले होते. त्यांनी अर्धा तास वेळ खाल्ला. त्यातुन कशीबशी सुटका करुन परत येऊन बसलो तेवढ्यात फोन वाजला. "तुम्ही आमच्या कंपनीचे विशेष ग्राहक असल्याने तुम्हाला न मागताच लोन मंजुर केलं आहे" अशा आशयाच्या फोनवरील व्यक्तिला मनातल्या मनात अर्वाच्य शिवीगाळ करुन मी परत आलो तर परत बेल वाजवुन कुरीयर आलं. ह्या आणि असल्या अनेक व्यत्ययांनंतर दुपारचा पर्याय पण बाद झाला. शेवटचा प्रयत्न म्हणुन ऑफिसातुन संध्याकाळी घरी आल्यावर बाल्कनीत जाऊन बसलो. माझ्या मागोमाग माझी दोन वर्षांची मुलगी पण आलीच. आपला बाबा काहीतरी वेगळंच करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती लगेच माझ्या बाजुला बसुन माझी नक्कल करायला लागली. थोडावेळ दुर्लक्ष केलं तर ती जाईल या वेड्या आशेने मी डोळे मिटले आणि प्राणायामाच्या नावाखाली उगाचंच वाफेच्या इंजीनासारखा फुस-फुस आवाज करत मोठमोठे श्वास घ्यायला लागलो. थोड्या वेळाने नाकाला गुदगुल्या झाल्यासारख्या वाटल्या म्हणुन डोळे उघडुन बघतो तर काय, माझी मुलगी कागदाच्या फाडलेल्या दोन पट्ट्या माझ्या नाकपुड्यांसमोर धरुन त्या कशा जोरजोराने उडतात याची चाचणी घेत होती. मी थांबलो तर "परत कर ना बाबा" म्हणुन हट्ट धरुन बसली. "भीक नको पण कुत्रं आवर" अशी माझी अवस्था झाली. पुर्वीच्या ऋषीमुनींच्या तपस्या भंग करायला अप्सरा वगैरे पाठवण्यापेक्षा माझ्या मुलीसारखे एक-दोन बालराक्षस पाठवले असते तर पटकन काम झालं असतं.
व्यायामाच्या नावाखाली एका प्रयत्नाची ही अवस्था. तसे अनेक प्रयत्न फसले. अगदी साधं अंघोळीला जाऊन पाच मिनीटं शॉवरखाली जास्त थांबावं म्हंटलं तर जोरजोरात दार वाजवुन "चला आटपा पटपट, गरम पोहे केले आहेत ते गिळा. एवढं गरम करुन वाढते आहे तर कष्टांची काही किंमतच नाही, तासतासभर अंघोळच करत बसायची" अशी आज्ञा होते. चुकुन आमच्या एका अतिउत्साहूी काकांना ही गोष्ट सांगितली तर त्यांनी "अरे मुर्ख आहेस तू! माणुस हा सोशल प्राणी आहे. अगदी आदिमानव पण घोळक्यानेच गुहांमधे रहायचे ... " इथुन सुरुवात करुन थेट अष्मयुगापासुन कलियुगापर्यंतचा मनुष्याच्या सामाजिक जीवनाच्या उत्क्रांतीचा वृतांत मला सांगुन माझ्या आयुष्यातले अनेक मोलाचे क्षण खाल्ले. त्यांच्या बोलण्याचा रोख असा काही होता की जणु एकांत हवा असेल तर मी मनुष्याप्राणीच नाही अशी कबुलीच मला द्यावी लागेल.
या सगळ्यानंतर एकांत मिळण्याची अपेक्षा मी जवळजवळ सोडलीच होती. पण त्यातल्या त्यात गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळत होतो. पण कसलं काय. एका दिवशी जवळच कुठेशी जत्रा भरली होती. झक मारत सगळ्यांना त्या जत्रेला घेउन जावं लागलं. सगळे आपापल्या धुंदीत फिरत होते. प्रचंड गर्दी होती. मी वैतागुन आकाशपाळण्यात (Giant Wheel) बसायला म्हणुन गेलो. मी बसायला लागल्यावर माझी एकंदरीत रुंदी आणि आकारमान बघुन, त्या पाळण्याची आणि तो फिरवणार्या यंत्रणेची क्षमता लक्षात घेउन तिथल्या माणसाने कुत्सितपणे मला "साहब आप अकेले ही बैठो, एकदम आरामसे" असं म्हणुन पाठवलं. मी बसलो आणि ते चक्र फिरायला लागलं. एक-दोन वेळा फिरलं असावं. मी माझ्याच विचारात होतो. मी बसलेला पाळणा अगदी वरती गेला असतांना मोठा आवाज होउन ते फिरायचं थांबलं. मी ओरडुन विचारलं "क्या हुआ?" खालुन अंधारातुन आवाज आला "कुछ नही साहब, छोटा प्रॉब्लम है, पांच मिनट मे ठिक करता हूँ" . मी वैतागुन कपाळाला हात लावला. आणि तेवढ्यात वीज चमकावी तसा माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला ! त्या भर मनुष्यामेळाव्याच्या मधोमध, कोणताही प्रयत्न न करता आणि कोणतीही पूर्वकल्पना नसतांना मी शोधत असलेला एकांत मला मिळाला होता. मी कृतज्ञतेने आकाशाकडे पाहिलं, आणि डोळे मिटुन घेतले. किती वेळ गेला, तेव्ही मी काय विचार केला हे मला आता नीटसं स्मरत नाही. पण थोड्या वेळाने ते चक्र परत फिराला लागलं आणि काही वेळातच माझे पाय परत "जमिनीला" टेकले. काही वेळासाठी मिळालेल्या त्या एकांताच्या अनुभवाचं आणि आठवणीचं गाठोडं मी मनात सांभाळुन ठेवलं आणि एक निःश्वास टाकुन समोरच्या गर्दीत पुन्हा जाऊन मिसळलो!