Sunday, February 05, 2006

आलिया भोगासी - भाग २

(पूर्वार्ध)

आता याऐवजी जर तुम्ही "कांन-नाक-घसा" तज्ञ अशी पाटी असलेल्या खोलित शिरलात तर तिथं तिसरच काहीतरी चालु असतं. इशंही अपल्या नशिबातुन टॉर्च सुटत नाहीच. हे डॉक्टर सगळ्यात आधी आपल्या नाकाचा शेंडा पकडुन वर करतात. म्हणजे साधारणपणे वराह जातिच्या प्राण्याप्रमाणे आपलं नाक केल्यावर मग त्यात टॉर्च मारतात. नंतर मग घसा पहायच्या निमित्ताने ते जीभ बाहेर काढुन आपल्याला "आ" वासायला सांगतात.
"मोठा करा आ ... अजुन मोठा ... जीभ काढा अजुन बाहेर"
आपण जीभ अगदी मुळापासुन निघायच्या बेताला येईबर्यंत बाहेर काढली की मग परत टॉर्च मारतात. त्यांच्या एका डोळ्यावर आरसासदृश गोष्टही असते. अगदी त्यांचा डोळा आपल्या तोंडात जाईपर्यंत जवळ येउन काहीतरी निरीक्षण करतात. मग एक लोखंडाची लांब पट्टी आपल्या घशापर्यंत आत घालुन जीभ अजुन खाली दाबतात. या अनपेक्षित प्रकाराने आपण "ऑक-व्यॅक" असले काहीतरी आवाज काढले की त्यांचं समाधान होतं. मग लगेच "झालं झालं" असं आपलं सांत्वन करतात.

एकदा मी दुपारी "अगदी ओ येईपर्यंत" म्हणतात तसं जेवण केल्यावर या ENT कडे गेलो होतो. नेहमाचे सोपस्कार सुरु झाले. आधीच माझ्या खुप घशाशी येत होतं. त्यातुन तो डॉक्टर माझ्या अगदी समोर बसुन या कसल्या कसल्या लोखंडी पट्ट्या माझ्या घशात घालंत होता. खरं तर त्यावेळी त्याचे सगळे दात त्याच्याच घशात घालायची इतकी तीव्र इच्छा झाली होती की काय सांगु. या सगळ्या गोंधळात माझ्या घशातल्या अन्नावरचा ताबा सुटला असता म्हणजे!!?? पण नाही ! त्याला माझ्या पडजीभेची काळजी "पडलेली"! माझी पडजीभ मनसोक्त पाहुन होईपर्यंत त्याने काही मला सोडलं नाही. बाका प्रसंग थोडक्यात निभावला म्हणायचं.

यानंतर उरतो कान, तिकडे यांचा मोर्चा वळतो. त्याचं पण टॉर्चनी निरीक्षण करुन झालं की त्यात काय काय द्रव्य ओततात, का? तर म्हणे कान साफ करायला. एकदा तर एका पेशंटचा कान साफ करायत्या बहाण्याने त्या डॉक्टरनी एक छोटाशी पिचकारी घेउन चक्क कानात पाण्याचा फवाराच मारला! उगाच काहीतरी क्लिष्ट नाव असलं तरी ती मुळात होती पिचकारीच. अरे माणसाच्या कानाचे अंतरंग म्हणजे काय रंगपंचमी खेळायची जागा आहे का?!

एखाद्याच्या खाजगी बाबतीत इतरांनी लक्ष घालु नये असा साघा सर्वमान्य शिष्टाचार आहे. माणसाचे कान-नाक-घशाचे अंतर्गत ही किती खाजगी गोष्ट आहे. पण हे लोक अगदी टॉर्च मारुन मारुन त्यात बघतात. इतकं "उच्च" शिक्षण घेउनही यांना इतके साधे शिष्टाचार माहित नसावेत ही फार लज्जस्पद गोष्ट आहे.

देव न करो पण कधी तुम्हाला दंतवैद्यक शास्त्राचं शिक्षण घेतलेल्या व्यक्तिकडे जायची वेळ आलीच तर तयारी असावी म्हणुन सांगतो. तिथे गेल्यावर आपल्याला एक मोठ्ठी आरामखुर्चीसारखी खु्र्ची दिसते. आपल्याला वाटतं "व्वा! आपल्या आरामाची केवढी सोय!" पण प्रत्यक्षात ती खु्र्ची म्हणजे आपल्याला अडकवण्यासाठी रचलेला एक सुंदर सापळा असतो. त्यावर आपण बसलो रे बसलो की वरुन एक मोठ्ठा प्रकाशाचा झोत आपल्या तोंडावर पडतो. मग चहोबाजुंनी असख्य ट्रे बाहेर येतात. त्यावर हातोडी(!), पक्कड (!?), ड्रिल (!!!) अशी वाट्टेल ती अवजारं (आणि हत्यारं) असतात. दात काढायचा असेल तर एक माणूस आपलं डोकं पकडुन ठेवणार आणि डॉक्टर भिंतितुन खिळा उपटावा तसा पक्कडिने आपला दात उपटणार असलं महाभयंकर दृश्य बघायला मिळते. दर दोन मिनिटांनी कसल्याशा पिचकारीने तोंडात पाणि मारुन आपल्याला चुळ भरायला सांगतात. इथे प्रसग काय, हे सांगतात काय, काही विचारू नका. दातातल्या फटी बुजवायला ते ज्या कौशल्याने सिमेंट भरतात की त्याची तुलना एखाद्या गवंड्याशीच होऊ शकते. फरक एवढाच की सिमेंट सरळ बसले आहे की नाही ते बघायला हे आपल्या तोंडात कोळंबा सोडत नाहीत.

या सगळ्याव्यतिरीक्त आजकाल एक नवीन प्रकार प्रचारात आहे, Overall Checkup, किंवा संपू्र्ण तपासणी. त्यात हजारेक प्रकारच्या चाचण्या असतात, आणि प्रत्येक चाचणासाठी हे लोक आपलं रक्त शोषतात, अक्षरशः !
त्या रक्तपिपासु लोकांचा तर कथाच निराळी. मी एकदा अशा चाचणीसाठी एका ठिकाणी गेलो होतो. तिथल्या माणसाने फार उत्साहाने एक इंजेक्शन माझ्या दंडाच्या खालच्या भागात खुपसलं. बराच वेळ त्यात काही येईचना.

तो - "काय हो, तुमच्या शरिरात रक्ताची फारच कमतरता दिसते! .. हॅ हॅ हॅ"

मी - "तुमच्यासारख्या ड्रॅक्युलाकडे सारखं जाउन दुसरं काय होणार? अजुन फार तर एक-दोन वेळा टिकेन, त्यानंतर भुसा भरुन प्राणिसंग्रहालयातच ठेवायची वेळ येणार आहे."

माझ्याकडुन अशा उत्तराची अपेक्षा नसल्याने तो थोडा वरमला. चौकशीअंती असं कळलं की तो डॉक्टर नविन होता आणि त्याला माझी नसंच सापडत नव्हती. ते ऐकल्यावर शेजारच्या सिनियर डॉक्टरनी त्याला शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या ह्या प्रयोगाचा गिनीपीग मीच! त्या गुरू-शिष्यांचा प्रेमळ संवाद चालु असेपर्य़ंत सुई साझ्या अंगात खुपसलेलीच होती. त्यानंतर, पलंगाखाली गेलेली गोष्ट काढायला त्याखाली हात घतल्यावर काहीही दिसत नसतांना आपण ज्या प्रकारे वाट्टेल तसा हात फिरवुन चाचपडुन बघतो, तसा तो त्या इंजेक्शनची सुई माझ्या अंगात इकडे तिकडे खुपसुन बघत होता. माझ्या नशीबाने ती नस एकदाची सापडली आणि माझं वजन थोडं कमी करुन तो निघुन गेला.

हे सगळे अनुभव घेतल्यावर तर हाडाचे, मेंदुचे, ह्रदयाचे मोठमोठे डॉक्टर काय करत असतिल याची कल्पनाही न केलेली बरी. या सगळ्यातुन तारुन न्यायला देवाने एकच गोष्ट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे संयम आणि कदाचित त्यामुळेच रुग्णाला इंग्रजीत पेशंट असं म्हणत असावेत. नुसती लक्षणं ऐकुन आणि नाडी तपासुन योग्य औषघ देणारे, हलक्या हाताने इंजेख्शन देणारे डॉक्टर पत्रिकेतच असाबे लागतात. हे भाग्य फार थोड्या पुण्यावानांना मिळतं. बाकी आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी संतांनी भविष्य जाणुन आधीच सोय करुन ठेवलेली आहे,

आलिया भोगासी, असावे सादर!

8 comments:

Anonymous said...

सहीSSS!!!
यावरून एक सिद्ध होतं की ठिकाण कुठलं ही असो, यांचे छळायचे मार्ग मात्र universal आहेत! तुला पुण्यात हे सर्व जे अनुभव आलेत, आगदी तंतोतंत तसेच मला औरंगाबादेत आले! अरे एकदा एका का-ना-घ च्या डॉक्टरने कमालच केली! मला डी.एन.एस.चा त्रास आहे आणि म्हणून सारखी सर्दी होत असते. तर या महाशयांनी चक्क माझ्या नाकात तूप आणि कापूर घातला!! कसल्या झिणझिण्या आल्या असतील, तुम्ही (फक्त) कल्पना करू शकता!

Ajit said...

आणि एवढे सगळे उपचार कमी की काय म्हणून नंतर आठवडाभर सतत "गोळी"बार चालू असतो तो असतोच.

उत्तम!

Anonymous said...

दंतचिकित्सेचे वर्णन फारच मार्मिक केलेय. कुठलाही वीर त्या खुर्चीवर बसतांना एक यःकश्चित मानव होऊनच जातो.
सुरेख लेख.

Nandan said...

छान लेख.

Satyajeet said...

i hope you get a good publisher.

Anonymous said...

Uttam lekh! Varnan atishay chaan kele aahe. Dhanyawad!
Anoop

Anonymous said...

I have a question about all writers. Do you really remember all those details? Or when you think of writing, you go and visit all these ppl again?
Khoop chan aahe lekh

मयुरेश राजकारणे said...

जमलं रे बॊस.............