Friday, July 14, 2006

साम-दाम-दंड-भेद

पात्रपरीचय -
निकीता - माझी पुतणी, वय वर्षे २.५
मी - म्हणजे मीच, वय वर्षे २५

मिशन - निकीताला जेवायला घालणे. (ताटातलं सगळं जेवण संपलच पाहिजे अशी एक उपसुचना)
जेवण - वरण-भात
अडचण - निकीताला वरण-भात खायचा नसुन तिला जॅम किंवा तुप साखर किंवा चॉकलेट यापैकीच काहीतरी खायचं आहे.
वेळ - दुपारचे १२:३० वाजले आहेत. (मिशन १ वाजेपर्यंत संपवायचे आहे)

(मी बाहेरच्या खोलीत येतो. आतुन आवाज येत असतो)
आई - अरे ती फार त्रास देते जेवतांना, अजिबात ऐकत नाही.
मी - काही काळजी करु नका, मी बघतो बरोबर माझ्या पद्धतीने. तुम्हाला लहान मुलांची मानसिकता नीट कळत नाही.
आई - डोंबल्याची मानसिकता. एका रविवारी फक्त तिला सांभाळायची वेळ येते आहे म्हणुन हे सुचतय तुला. बघु आता काय दिवे लावताय.
मी - (घोर अपमान) १० मिनटात संपवेल ती सगळं.

(माझ्या ह्या कोणतीही पु्र्वकल्पना नसताना केलेल्या आगाऊ विधानाला मराठीत "फुशारक्या मारणे" किंवा "वल्गना करणे" हे अतिशय योग्य वाक्प्रचार आहेत. पण अशाच विधानांच्या बळावर मी एक दिवस मॅनेजर होऊ शकतो,काय ?!)

मी - निकीता, बाहेर ये बाळा, आपल्याला मंमं करायची ना?
निकीता - होSSS!!
मी - शहाणी मुलगी आहे ती, चला घास घ्या पटपट. (घास घेते)
मी - (मनात) अरे सोप्पं आहे एकदम, एवढी कशाला बोंबाबोंब होते हिच्या जेवणावरुन?
निकीता - (एक घास खाउन, तो तोंडात असताना) याया ऍ दसो, यायं लेवत आअं.
मी - काय? तोंडात घास असताना बोलू नये बाळा.

(निकीता आज्ञाधारकपणे तोंडातला घास परत ताटात काढुन ठेवते आणि परत तेच बोलते, यावेळी तोंडात घास नसल्याने तिचं बोलणं कळतं)

निकीता - मला हे नको, माझं जेवण झालं.
मी - (ओरडायची ईच्छा आवरत) बाळा, असं करु नये, तोंडातला घास असा काढायचा नसतो. चला परत घ्या घास.
निकीता - नाही
मी - शहाणी मुलगी ना तू?
निकीता - नाही.
मी - माझं ऐकणार ना?
निकीता - नाही.
मी - बघ, पटपट खा, नाहीतर खारुताई तुझं जेवण घेऊन जाईल.

(आता वास्तविक पाहत खारुताईचा इथे अर्थाअर्थी संबंध नाही. आणि त्या प्रामाणिक आणि कष्टाळू जीवावर उगाचच लहान मुलांचं जेवण चोरण्याचा भयंकर आरोप लावण्याचाही मला काहीही हक्क नाही. पण काय करणार, त्या वेळी मला याहुन चांगलं काही सुचलच नाही.)

निकीता - (जोरात) खारुताई ये, आणि वरण-भात घेउन जा.
मी - असं नाही करु, घे पटपट, एक घास चिऊचा आणि एक घास काऊचा. (काय उगाच चिऊ-काऊला ह्यात ओढायचं? पण सगळे म्हणतात म्हणुन मी पण म्हटलं)
निकीता - नको. (अरे वा! नाहीचं नको झालं, थोडी तरी प्रगती आहे.)
मी - असं काय करते, जेवायचं नाही का तुला?
निकीता - नाही (परत गाडी नाहीवर आली)
मी - मग काय करायचंय?
निकीता - आपण चित्र काढू हं?

(निकीता जेव्हा "आपण" चित्र काढू असं म्हणते तेव्हा खरंच आपण चित्र काढायचं असतं आणि ती बाजुला बसुन नुसती फर्माईश करते. माझी चित्रकला आधीच दिव्य ! पण मगाजची लहान मुलांच्या मानसिकतेबद्दलची विधानं आता अंगाशी आली)

मी - मी चित्र काढून दाखवल्यानंतर जेवशील?
निकीता - (नुसती होकारार्थी मान हलवुन चित्रांची वही आणायला आत पळते. ५ मिनीटं होऊन गेलेली असतात. निकीता वही घेऊन परत येते)
मी - काय काढायचं?
निकीता - वाघोबा
मी - (अरे बापरे!) वाघोबा नको, आपण फुगा काढू या.
निकीता - नको, हत्ती.
मी - (वाचवा!) पतंग चालेल का?
निकीता - पोपट
मी - (ठिक आहे, नाही जमलं तर नंतर आपलाच पोपट होणार आहे, पोपटावर तंटा मोडू) चालेल

(पुढची ५ मिनीटं महत्प्रयत्नांनी मी एक पक्षीसदृश चित्र काढलं. तोपर्यंत निकीता मनसोक्तपणे इकडे-तिकडे बागडत होती.)

मी - (तिला चित्र दाखवत कौतुकाच्या अपेक्षेने तिच्याकडे पाहतो) हे बघ !
निकीता - आSSहा , बदक!!
मी - (माझा खाली पडलेला चेहरा उचलण्याचा प्रयत्न करतो, आवाज थोडासा उंचावत) हिरव्या रंगाचं बदक पाहिलं आहेस का कधी, पोपट आहे तो, आणि चला आता जेवा पटपट.
(निकीता एक घास निमुटपणे खाते, दुसरा घास देतांना)

निकीता - बास, झालं, आता आपण हात धुवु हं?
मी - झालं कसलं इतक्यात? आ कर, चल.
निकीता - अंSSS नको ना, आपण गाणं म्हणुया ना
मी - नंतर गाणं म्हणायचं, आत्ता जेव
निकीता - नाही आत्ता
मी - (निकीताचं "आपण" गाणं म्हणू हे सुद्धा आपण चित्र काढू सारखंच असतं) ठिक आहे, मी गाणं म्हणतो, तू खा, कुठलं गाणं? नाच रे मोरा म्हणायचं का?
निकीता - नाही, कजरारे कजरारे म्हण
मी - (कार्टीचं टीव्ही पाहणं कमी केलं पाहीजे) ठिक आहे, म्हणतो, तू घास घे.

(इतक्या वाटाघाटींनंतर महत्कष्टाने मिळवलेला घास तिला भरवुन आणि देवाचं नाव घेउन मी एकदम तार सप्तकातला सुर लावला)

मी - हो कजरारे कजरारे तेरे काले काले नैना ...

(तेवढ्यात आतुन एकदम खुप भांडी पडल्याचा आवाज आला आणि थोड्याच वेळात वैतागलेल्या चेहर्याने आई बाहेर आली)

आई - काय झालं? कशाला ईतक्या मोठ्याने ओरडतो आहेस? किती दचकले मी, हातातलं सगळं विरझण सांडलं.
मी - (माझ्या जबड्यात सर्व ३२ दात शिल्लक आहेत याचा पुरावा देणारं हास्य करत) निकीताने सांगितलं म्हणुन गाणं म्हणत होतो.
आई - ती काय वाट्टेल ते सांगेल, तुला नाही का अक्कल? पटपट भरव तिला (आत जाता जाता) म्हणे मुलांची मानसिकता कळत नाही.

मी - (आईला आत जातांना बघत, निकीताला उद्देशुन) निकीता, संपला का घास, good girl, चला पुढचा घास घ्या

(निकीताकडुन काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मी वळुन पाहीलं तर ती तिथे नव्हतीच. आजुबाजुला पाहिल्यवर निकीता खिडकीत चढुन गजाला लटकते आहे असं दृश्य मला दिसलं)

मी -(ओरडुन) निकीता!!! काय करते आहेस?
निकीता - (ओरडण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन) मी सुपरमॅन आहे.

(मी उठुन मांजराच्या पिल्लाला उचलुन आणतात तसं तिला पकडुन आणलं)

मी - (कडक आवाजात) चला बसा आता इथे गुपचुप, नाहीतर बागुलबुवा येतो (बागुलबुवा, थॅंक्यु रे बाबा!)
निकीता - अंSSS नको ना मला
मी - (आत ऐकु जाणार नाही याची काळजी घेत) हे बघ, तू नीट जेवण केलंस तर नंतर तुला चॉकलेट देईन.
(निकीताचा चेहरा एकदम खुलतो, आणि त्या आनंदात ती एक घास घेते. मला वाटतं सुटलो, पण लगेचंच निकीताच्या कोर्टात जेवणाच्या खटल्याला स्थगिती मिळते आणि प्रकरण पुन्हा जैसे थे)

निकीता - बास, आता पाणी प्यायचं आणि मग चॉकलेट खायचं.

(माझा संयम आता संपत आलेला असतो. २० मिनीटे जाउन ताटातला ऐवज फक्त ३-४ घासांनी कमी झालेला असतो)

मी - (अजुन जोरात ओरडुन) आता वेडेपणा पुरे, नाहीतर फटका मिळेल, चल खा
निकीता - नाही.
मी - मार खायचाय, घे पटकन
निकीता - नाही
(आपण एखाद्याच्या कपड्याना लागलेला भिंतीचा चुना जसा लांबुव झटकतो, तसा मी तिच्या पाठीत उगाच फटका मारल्याचं नाटक केलं. आता ती भोकाड कधी पसरणार याची वाट बघत होतो)

निकीता - आSSS आपण मारामारी करु या (??!!) आता मी तुला मारु?

(असं म्हणुन माझ्या उत्तराची वाट न बघता तिने तिच्या हातातली बॅट जोरात माझ्या डोक्यात मारली. मी पुर्णपणे हतबल होउन तिला पकडायला उठलो.)

निकीता - मला पकड, मला पकड, मी पळते
(सुसाट वेगाने ती आत पळत गेली. जाता जाता जोरजोरात "अमोल मला चॉकलेट देणार" असं ओरडत ती थेट आई बसली होती त्या खोलीत जाउन धडकली. मी मागोमाग तिथे पोचलोच. आईने माझ्याकडे एक अर्थपुर्ण आणि प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. लाच देणार्या लोकांना anti corruption ऑफिसरनी रंगे हाथ पकडल्यावर त्यांच्या चेहर्यावर काय भाव येत असतिल
ते मला कळलं. मी पुन्हा एकदा माझ्या दंतपंक्तींचे प्रदर्शन मांडलं.)

आई - काय, झाली का नाही तुमची १० मिनीटं?
मी - झालंच आहे, २ घास राहीलेत फक्त.

(आईच्या पुढच्या टोमण्याची वाट न पाहता मी निकीताला उचललं आणि बाहेर आलो. येता येता एका ताटात तुप-साखर-पोळी आणली. निकीताने तुप साखर पोळी भरभर संपवली, वरण-भात मी न चावता भराभर गिळला. जेवण संपेपर्यंत एकच गोष्ट तिला पढवत होतो.)

मी - पोट भरलं बाळा?
निकीता -होSS
मी - जर कोणी विचारलं काय जेवली तर काय सांगायचं
निकीता - (थोडा विचार करुन) वरण-भात
मी - Good Girl (हुश्श!)

(येनकेनप्रकारेण मिशन पूर्ण झालं. तात्पर्य काय, तर तिच्या दसपट वयाचा असुन तिच्यापुढे माझं काही चाललं नाही.
मला वाटतं,

ना हर्ष मदतीस येतो, ना उपयोगाचा काही खेद,
बालहट्टापुढे तर हरती साम-दाम-दंड अन् भेद)

Monday, July 03, 2006

पिठाच्या गिरणीतला पट्टा

पुन्हा एकदा दिवा लागला. आदल्या दिवशी बजावुन सांगितल्याप्रमाणे ठरल्या वेळी कोंबडा आरवला. झुरळ आपल्या अंधार्या ड्रॉवरमधुन डोळे मिचकावत बाहेर आलं. रोजच्याप्रमाणे पुन्हा एकदा त्याला उडण्याची तीव्र ईच्छा झाली. पण पंखातलं बळंच गेल्यासारखं झालं होतं. तो विचार मनातुन झटकुन टाकत ते परत रांगायला लागलं. आजुबाजुला त्याच्यासारखे बरेच होते. कालच घोड्याकडुन आणलेली उसनी झापडं त्याने डोळ्यावर चढवली, मग समोर दिसत होती फक्त एकच वाट. रोज दिसायला वेगळी असणारी, पण सुरवातही तीच आणि शेवटही तोच, कधी वाळवंटातुन जायची तर कधी समुद्रातुन. आज फार धुकं होत, आणि त्या धुक्यात बाकी सर्व अंधुक! पायाखाली काय असेल याची पर्वा न करता ते निघालं. आजचं आपलं रंगांचं नशीब काय म्हणतय? एवढाच त्या प्रवासातला फरक.

आज तरी ही वाट दुसरीकडे घेऊन जाईल का? पुन्हा वेडी आशा, पण थोड्या वेळानं उकीरडा आलाच. खिशातुन आणलेली गेंड्याची कातडी त्याने अंगावर चढवली. ओळखीची काड्यापेटी दिसताच ते पटकन आत जाउन बसलं. काळोख...शांतता...बाहेर चालू होतं घमासान युद्ध...आलं होतं घोंघावणारं वादळ...आत ते आपलं आगपेटीच्या काड्यांशी खेळत बसलेलं. सगळ्या एकसारख्याच! अगदी साध्या लाकडाच्या, पण थोडं कुठे घर्षण झालं की चटका देउन जाणार्या.

किती काळ गेला असेल कोणास ठाउक? त्याने हळुच काड्यापेटीतुन डोकं बाहेर काढलं. दिवा विझला होता. सहस्त्र सुर्यांच्या प्रकाशालाही न घाबरणारं, पण कोणी आपल्याला बघेल का बाहेर जाताना याचीच त्याला भिती. हळुच ते काड्यापेटीतुन बाहेर आलं, गेंड्याची कातडी परत घडी करुन खिशात ठेवली परत जायची वाट मात्र मखमली होती. त्याने उडण्याचा प्रयत्न केला, पण थोड्या उंचीवर जाउन ते खाली पडलं. पुन्हा रांगायला सुरुवात केली. झापडांसमोर जेव्हा अंधार दिसायला लागला, तेव्हा त्याने झापडं काढली, कोंबड्याला उद्याची वेळ सांगुन ते पुन्हा ड्रॉवरच्या अंधारात दिसेनासं झालं.



संदर्भासह स्पष्टीकरण:

(दिवा = सूर्य)उगवला होता. (झुरळ = मी) सकाळी उठलो (कोंबडा = गजराच्या) आवाजाने. (ड्रॉवर = माझी खोली) मधुन बाहेर आलो. (उडण्याची = आज तरी दांडी मारावी) तीव्र ईच्छा झाली. काम किती आहे ते आठवलं आणि मुकाट निघालो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, काही पण असो, तोच रस्ता. प्रदुषण फारच वाढलं होतं, पाउसही होता,पाण्याखाली किती आणि कसे खड्डे असतिल याची काही पर्वा नाही. आज कुठला (रंग = ट्राफीक सिग्नल) किती वेळ नशीबात आहे काय माहीत. थोड्या वेळाने (उकीरडा = हे मात्र बरोब्बर ओळखलत, ऑफिस) आलंच. (गेंड्याची कातडी = निगरगट्टपणाचा भाव) चेहर्यावर चढवुन मी माझ्या (काड्यापेटी = ऑफिसमधलं माझं क्युबिकल) मधे जाउन बसलो. असल्या शांत वातानुकुलित ऑफिसमधे असताना बाहेर कितीही गोंधळ झाला तरी काहीही कळत नाही. काम सुरु केलं, नेहमीचं, तेच तेच. फक्त एवढिशी कुठे चुक झाली की बोंबाबोंब सुरू. हे असं अनेक वर्ष चालू आहे. सू्र्य मावळला, तरी अजुन कोणी धरतं का काय याची भीती बाळगतच लपुनछपुन बाहेर पडायचं. परत जाताना कितीही ट्राफीक असला तरी त्याचं काही वाटत नाही. उद्या नक्की दांडी मारू असा होत आलेला निश्चय एका deadline च्या आठवणीने बारगळतो, घरी येउन, उद्याचा गजर लावुन मी परत झोपी जातो.

पिठाच्या गिरणीतला पट्टा = तसंच गोल गोल फिरत राहणारी माझी दिनच्रर्या

तर ही माझी सध्याची दिनचर्या. इतके दिवस ब्लॉग न लिहीण्याचं कारण म्हणजे नेहमीचंच, बुरसटलेलं आणि गंज चढलेलं- "ऑफिसात खुप काम आहे". पण "हापिसात काम करत राहणे ही काही जीवनाची इतिकर्तव्यता नाही" हे पुलंचं वाक्या स्मरुन पुन्हा लिहायला सुरुवात करतो आहे.

ता.क.- वरील वाक्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला संदर्भाशिवायच लागलं असेल तर माझ्यासारखीच तुम्हाला या दिनच्रर्येतुन सुटकेची नितांत आवश्यकता आहे हे समजुन ताबडतोब ऑफिसात रजेचा अर्ज टाकावा.

(स्फुर्ती: "त्याचे व्यवच्छेदक लक्षण"- नस्ती उठाठेव, "नानुचे आत्मचरीत्र"- असा मी असामी, पु. ल. देशपांडे... अजुन कोण ? :) )

Monday, February 20, 2006

आम्ही आहोत खवय्ये!

(माझ्यासारख्या खाद्यप्रेमींना प्रेमपुर्वक अर्पण)

आम्ही आहोत खवय्ये

चितळ्यांची ती वडी असो वा कोंडाजींचा चिवडा,
बेडेकरांची मिसळ असो वा जोश्यांचा तो वडा,
कधी कोल्हापुरचा रस्सा, कधी सातार्याचा पेढा,
कधी सात्विक ती खिचडी कधी तामसी कोंबडी-वडा,
पंक्तित लागता पैज वाजतो सनई अन् चौघडा
मग श्रिखंडाचा राग आळवुन गाणारे गवैय्ये, आम्ही आहोत खवय्ये

खाऊ जाउन गाडीवरचे पोहे शुभप्रभाती,
मध्यान्हीही चालेल झुणका-भाकर गडावरती,
सांजवेळी आठवे आम्हाला द्रोणामधली भेळ,
मध्यरात्री मग आमचा जमतो कुल्फीशीही मेळ,
खाण्याची साधना, नसे त्या स्थळ ना कुठली वेळ
आमच्या दादेसाठी झटती भले भले रसोईये, आम्ही आहोत खवय्ये

वजनाचा नको काटा, नको उदराचे त्या माप,
नको मधुमेहाची चिंता, नको व्यायामाचा ताप,
कशास भिवुनी कमी खाउनी तब्येतीला जपणे,
कशास अर्ध्या पोटी राहुन सडपातळ ते दिसणे,
नसे जगण्यासाठी खाणे, आमचे खाण्यासाठी जगणे
मेजवानीच्या रणांगणातील भरवशाचे लढवैय्ये, आम्ही आहोत खवय्ये

Sunday, February 05, 2006

आलिया भोगासी - भाग २

(पूर्वार्ध)

आता याऐवजी जर तुम्ही "कांन-नाक-घसा" तज्ञ अशी पाटी असलेल्या खोलित शिरलात तर तिथं तिसरच काहीतरी चालु असतं. इशंही अपल्या नशिबातुन टॉर्च सुटत नाहीच. हे डॉक्टर सगळ्यात आधी आपल्या नाकाचा शेंडा पकडुन वर करतात. म्हणजे साधारणपणे वराह जातिच्या प्राण्याप्रमाणे आपलं नाक केल्यावर मग त्यात टॉर्च मारतात. नंतर मग घसा पहायच्या निमित्ताने ते जीभ बाहेर काढुन आपल्याला "आ" वासायला सांगतात.
"मोठा करा आ ... अजुन मोठा ... जीभ काढा अजुन बाहेर"
आपण जीभ अगदी मुळापासुन निघायच्या बेताला येईबर्यंत बाहेर काढली की मग परत टॉर्च मारतात. त्यांच्या एका डोळ्यावर आरसासदृश गोष्टही असते. अगदी त्यांचा डोळा आपल्या तोंडात जाईपर्यंत जवळ येउन काहीतरी निरीक्षण करतात. मग एक लोखंडाची लांब पट्टी आपल्या घशापर्यंत आत घालुन जीभ अजुन खाली दाबतात. या अनपेक्षित प्रकाराने आपण "ऑक-व्यॅक" असले काहीतरी आवाज काढले की त्यांचं समाधान होतं. मग लगेच "झालं झालं" असं आपलं सांत्वन करतात.

एकदा मी दुपारी "अगदी ओ येईपर्यंत" म्हणतात तसं जेवण केल्यावर या ENT कडे गेलो होतो. नेहमाचे सोपस्कार सुरु झाले. आधीच माझ्या खुप घशाशी येत होतं. त्यातुन तो डॉक्टर माझ्या अगदी समोर बसुन या कसल्या कसल्या लोखंडी पट्ट्या माझ्या घशात घालंत होता. खरं तर त्यावेळी त्याचे सगळे दात त्याच्याच घशात घालायची इतकी तीव्र इच्छा झाली होती की काय सांगु. या सगळ्या गोंधळात माझ्या घशातल्या अन्नावरचा ताबा सुटला असता म्हणजे!!?? पण नाही ! त्याला माझ्या पडजीभेची काळजी "पडलेली"! माझी पडजीभ मनसोक्त पाहुन होईपर्यंत त्याने काही मला सोडलं नाही. बाका प्रसंग थोडक्यात निभावला म्हणायचं.

यानंतर उरतो कान, तिकडे यांचा मोर्चा वळतो. त्याचं पण टॉर्चनी निरीक्षण करुन झालं की त्यात काय काय द्रव्य ओततात, का? तर म्हणे कान साफ करायला. एकदा तर एका पेशंटचा कान साफ करायत्या बहाण्याने त्या डॉक्टरनी एक छोटाशी पिचकारी घेउन चक्क कानात पाण्याचा फवाराच मारला! उगाच काहीतरी क्लिष्ट नाव असलं तरी ती मुळात होती पिचकारीच. अरे माणसाच्या कानाचे अंतरंग म्हणजे काय रंगपंचमी खेळायची जागा आहे का?!

एखाद्याच्या खाजगी बाबतीत इतरांनी लक्ष घालु नये असा साघा सर्वमान्य शिष्टाचार आहे. माणसाचे कान-नाक-घशाचे अंतर्गत ही किती खाजगी गोष्ट आहे. पण हे लोक अगदी टॉर्च मारुन मारुन त्यात बघतात. इतकं "उच्च" शिक्षण घेउनही यांना इतके साधे शिष्टाचार माहित नसावेत ही फार लज्जस्पद गोष्ट आहे.

देव न करो पण कधी तुम्हाला दंतवैद्यक शास्त्राचं शिक्षण घेतलेल्या व्यक्तिकडे जायची वेळ आलीच तर तयारी असावी म्हणुन सांगतो. तिथे गेल्यावर आपल्याला एक मोठ्ठी आरामखुर्चीसारखी खु्र्ची दिसते. आपल्याला वाटतं "व्वा! आपल्या आरामाची केवढी सोय!" पण प्रत्यक्षात ती खु्र्ची म्हणजे आपल्याला अडकवण्यासाठी रचलेला एक सुंदर सापळा असतो. त्यावर आपण बसलो रे बसलो की वरुन एक मोठ्ठा प्रकाशाचा झोत आपल्या तोंडावर पडतो. मग चहोबाजुंनी असख्य ट्रे बाहेर येतात. त्यावर हातोडी(!), पक्कड (!?), ड्रिल (!!!) अशी वाट्टेल ती अवजारं (आणि हत्यारं) असतात. दात काढायचा असेल तर एक माणूस आपलं डोकं पकडुन ठेवणार आणि डॉक्टर भिंतितुन खिळा उपटावा तसा पक्कडिने आपला दात उपटणार असलं महाभयंकर दृश्य बघायला मिळते. दर दोन मिनिटांनी कसल्याशा पिचकारीने तोंडात पाणि मारुन आपल्याला चुळ भरायला सांगतात. इथे प्रसग काय, हे सांगतात काय, काही विचारू नका. दातातल्या फटी बुजवायला ते ज्या कौशल्याने सिमेंट भरतात की त्याची तुलना एखाद्या गवंड्याशीच होऊ शकते. फरक एवढाच की सिमेंट सरळ बसले आहे की नाही ते बघायला हे आपल्या तोंडात कोळंबा सोडत नाहीत.

या सगळ्याव्यतिरीक्त आजकाल एक नवीन प्रकार प्रचारात आहे, Overall Checkup, किंवा संपू्र्ण तपासणी. त्यात हजारेक प्रकारच्या चाचण्या असतात, आणि प्रत्येक चाचणासाठी हे लोक आपलं रक्त शोषतात, अक्षरशः !
त्या रक्तपिपासु लोकांचा तर कथाच निराळी. मी एकदा अशा चाचणीसाठी एका ठिकाणी गेलो होतो. तिथल्या माणसाने फार उत्साहाने एक इंजेक्शन माझ्या दंडाच्या खालच्या भागात खुपसलं. बराच वेळ त्यात काही येईचना.

तो - "काय हो, तुमच्या शरिरात रक्ताची फारच कमतरता दिसते! .. हॅ हॅ हॅ"

मी - "तुमच्यासारख्या ड्रॅक्युलाकडे सारखं जाउन दुसरं काय होणार? अजुन फार तर एक-दोन वेळा टिकेन, त्यानंतर भुसा भरुन प्राणिसंग्रहालयातच ठेवायची वेळ येणार आहे."

माझ्याकडुन अशा उत्तराची अपेक्षा नसल्याने तो थोडा वरमला. चौकशीअंती असं कळलं की तो डॉक्टर नविन होता आणि त्याला माझी नसंच सापडत नव्हती. ते ऐकल्यावर शेजारच्या सिनियर डॉक्टरनी त्याला शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या ह्या प्रयोगाचा गिनीपीग मीच! त्या गुरू-शिष्यांचा प्रेमळ संवाद चालु असेपर्य़ंत सुई साझ्या अंगात खुपसलेलीच होती. त्यानंतर, पलंगाखाली गेलेली गोष्ट काढायला त्याखाली हात घतल्यावर काहीही दिसत नसतांना आपण ज्या प्रकारे वाट्टेल तसा हात फिरवुन चाचपडुन बघतो, तसा तो त्या इंजेक्शनची सुई माझ्या अंगात इकडे तिकडे खुपसुन बघत होता. माझ्या नशीबाने ती नस एकदाची सापडली आणि माझं वजन थोडं कमी करुन तो निघुन गेला.

हे सगळे अनुभव घेतल्यावर तर हाडाचे, मेंदुचे, ह्रदयाचे मोठमोठे डॉक्टर काय करत असतिल याची कल्पनाही न केलेली बरी. या सगळ्यातुन तारुन न्यायला देवाने एकच गोष्ट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे संयम आणि कदाचित त्यामुळेच रुग्णाला इंग्रजीत पेशंट असं म्हणत असावेत. नुसती लक्षणं ऐकुन आणि नाडी तपासुन योग्य औषघ देणारे, हलक्या हाताने इंजेख्शन देणारे डॉक्टर पत्रिकेतच असाबे लागतात. हे भाग्य फार थोड्या पुण्यावानांना मिळतं. बाकी आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी संतांनी भविष्य जाणुन आधीच सोय करुन ठेवलेली आहे,

आलिया भोगासी, असावे सादर!

Sunday, January 29, 2006

आलिया भोगासी - भाग १

"जा आतं, डॉक्टरांनी बोलावलय."

अतिशय सुतकी अशा वातावरणाच्या डॉक्टरांच्या केबिनबाहेरच्या जागेत बसलेलं असताना आपल्याला हाक ऐकू येते. डॉक्टरांच्या केबिनबाहेरची जागा ही तिथे आलेल्या कोणत्याही व्यक्तिला चुकुनही प्रसन्न वाटू नये याची तंतोतंत काळजी घेऊन बनवलेली असते. तिथे नेहमी उदास-भकास असं वातावरण असतं. जागोजागी "शांतता राखा", "कृपया पादत्राणे येथे काढावी", "खुर्चीत बसण्याची योग्य पद्धत" असे कुठली ना कुठली शिस्त शिकवणारे फलक लावलेले असतात. उजेड, हवा असल्या गोष्टी तर निषिद्धच असतात. प्रकाशापेक्षा अंधाराची जाणिव करुन देणारे मंद असे दिवे असतात. वाचायला म्हणुन चार एक वर्षापूर्वीचे काही मासिकांचे अंक असतात. आपण जर १-२ वेळा आधी पण त्याच डॉक्टरकडे गेलो असलो तर ते सगळं आपलं आधिच वाचुन झालेलं असतं. त्याला कंटाळुन आपण इतरत्र भिंतीवर लावलेली पत्रकं जर वाचायला गेलो तर त्यावर कुठल्या कुठल्या महाभयंकर रोगांची "ठळक" लक्षणं लिहीलेली असतात. आजुबाजुच्या उदास वातावरणामुळे त्यातली काही लक्षणं आपल्याला झाली आहेत असं उगाचच आपल्याला वाटायला लागतं. अहो अशा ठिकाणी आजारी तर सोडाच, त्याला घेउन आलेल्या धडधाकट माणसालाही आपल्याला काहीतरी झालं आहे असं वाटायला लागतं. किंबहुना ही पत्रकं लावण्यामागे अजुन काही पेशंट मिळवण्याचं षङयंत्र असावं अशी माझी आपली एक शंका आहे. हे सगळं तर केबिनच्या बाहेर, केबिनच्या आत गेल्यावर कोणत्या दिव्यांतुन जावं लागेल हे मात्र आत कोणत्या प्रकारचा डॉक्टर आहे यावर अवलंबुन असतं.

आपण जर "जनरल फिजिशीयन" असं संबोधल्या जाणार्या व्यक्तिकडे गेलो तर त्यांचं वर्तन एखाद्या सरावलेल्या भटजीसारखं असतं. ठरलेले सोपस्कार पार पडल्याशिवाय ते मुख्य गोष्टीकडे वळतंच नाहीत. भटजी जसे कोणतंही कार्य असलं तरी चौरंग, तांब्या, नारळ, सुपारी, विड्याची पानं याची मनासारखी रचना केल्याशिवाय मुख्या कार्याकडे वळत नाहीत तसेच हे डॉक्टर. त्यांच्याकडे जाउन आपण सांगितलं की "डॉक्टर, जरा गुडघा दुखतो आहे."
आपल्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन त्यांचं सुरु होतं ...
"बसा. जीभ बघु (!!). मोठ्ठा आ करा थोडा अजुन. हं .. डोळे पाहू."
"अहो पण तो गुडघा .." आपण क्षीण आवाजात अजुन एकदा प्रयत्न केला तरी डॉक्टरांना ते ऐकू जात नाही कारण तोपर्यंत त्यांनी कानात स्टथोस्कोप घातलेला असतो. तो स्टथोस्कोप आपल्या पोटावर लावुन "श्वास घ्या....सोडा...परत घ्या.....मोठ्याने घ्या जरा" असे प्राणायामाचे धडे आपल्याला दिले जातात. पोटाने त्यांचं समाधान झालं नाही तर पाठीवर पुन्हा तेच. मग एक हात आपल्या पोटावर ठेवुन दुसर्या हाताने त्यावर गुद्दा मारुन काहीतरी ऐकल्यासारखं करतात. असं २-३ ठिकाणी करतात. या क्रियेतुन काय साध्य होतं ते मला आजतागायत कळलेलं नाही. त्यानंतर मग दोन्ही हातांनी आपलं पोट दाबुन घुसळल्यासारखं करतात "इथं दुखतंय ? ... इथं ?" असं विचारतात. पूर्वी एवढ्यावर सुटका व्हायची. आजकाल बी.पी. मोजायची पण फॅशन आहे. हे सगळं मनासारखं करुन झालं की मग विचारतात,
"हं, काय होतंय तुम्हाला?"

हे सुसह्यच म्हणावं लागेल, कारण हे डॉक्टर फक्त हात आणि स्टथोस्कोप या दोनच अवजारांचा वापर करतात. याउलट आपण जर डोळ्याच्या डॉक्टर कडे गेलो तर ते बाकी काहीही संभाषण न करता आधी आपल्या डोळ्यावर टॉर्च मारतात. आता मला सांगा, कोणाच्या डोळ्यावर टॉर्च मारणे हे किती असभ्य वर्तन मानलं जातं? पण इथे असं करण्यासाठीच आपण त्यांना पैसे देतो ! त्यानंतर औषधाच्या नावाखाली आपल्या डोळ्यात २-३ गार पाण्याचे थेंब टाकुन आपल्याला डोळे बंद करुन बसायला सांगतात. त्याने म्हणे डोळे स्वच्छ होतात. मला तर वाटतं, आपल्याला डोळे बंद करायला सांगुन ते हळुच चहा वगैरे पिउन येत असावेत. डोळे उघडल्यावर ते आपल्याला एका मोठ्या मशीनसमोर बसवुन, एक कसलासा स्टॅंड आणुन आपल्याला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसायला सांगतात. मला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसलेला माणुस आणि शिरच्छेदाची शिक्षा झाल्यावर गिलोटीन का काय त्यात मान अडकवुन बसलेला माणुस यात खुप साधर्म्य वाटतं. त्यांचं छोट्या टॉर्चनी समाधान झालेलं नसतं म्हणुन ते मशीन आपल्या डोळ्याजवळ आणुन त्यातुन असुन प्रखर टॉर्च डोळ्यावर मारतात. मग खुप वेळ बघत बसतात, अधुन मधुन "डाविकडे बघा ... उजवीकडे बघा" असं म्हणुन आपण काहीतरी करतो आहे असं भासवतात. "हलु नका, स्थिर रहा .. मान सरळ ठेवा .. डोळे नका मिटू" असलंही काहीतरी बोलत असतात. अरे हलू कसलं नका ? काय फोटोसेशन चालू आहे? आणि उठसूट डोळ्यावर असे वेगवेगळे टॉर्च मारले तर चांगले डोळे असलेला माणुसही पुढच्या वेळी आंधळा होउन येइल. हाच त्याचा प्लॅन असणार. मला वाटतं लहानपणी ज्या मुलांना इतरांच्या डोळ्यावर टॉर्च मारुन विकृत आनंद मिळतो तिच मुलं पुढे जाउन डोळ्याचे डॉक्टर होत असतिल. स्वतःच्या छंदाचाच प्रोफेशन म्हणुन वापर करण्याचं याहुन चांगलं उदाहरण शोधुन सापडणार नाही.

क्रमशः

Tuesday, January 17, 2006

ती ५ मिनीटं !

"हो!! उठतोय, फक्त ५ मिनीट झोपू दे"

हे माझं रोज झोपेतुन उठतानाचं पेटंट वाक्यं. अगदी लहानपणापासुनचं. त्या शेवटच्या ५ मिनीटांच्या झोपेसाठी मी खुप पुर्वीपासुन झगडत आलो आहे. खरं तर या ५ मिनीटांच्या झोपेवरुनच तुमची झोप पूर्ण होते का नाही ते ठरत असतं. आदल्या रात्री तुम्ही किती वेळ झोपता याशी त्याचा काही संबंध नाही. तुम्ही ४ तास झोपा नाहीतर १०, झोप पूर्ण की अपूर्ण ते या ५ मिनीटानी ठरतं. ही ५ मिनीटांची झोप पुरणपोळीवर घेतलेल्या तुपासारखी असते, पुरणपोळी कितीही चांगली झाली तरी त्याची चव तुपाशिवाय अपूर्णच, किंबहुनी तुपाशिवाय खाल्ली तर पोळी बाधतेच.

ही ५ मिनीटं तुम्हाला मिळाली तर त्या दिवसा सारखा शुभदिवस कुठला नाही. दिवसभर तुमचा मुड प्रसन्न राहतो, सारखं एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं, सगळ्यांशी (हो! बॉसशी सुद्धा) चांगलं बोलावं आणि वागावसं वाटतं, रस्त्यावरुन जातांना तो ओलांडू पाहणार्या आजींना मदत केली जाते, अहो एवढंच कशाला ? चालता चालता गुणगुणत असलेल्या गाण्यावर एखादी मस्त dance step आपल्याला कधी जमुन जाते हे कळत पण नाही. थोडक्यात म्हणजे एखाद्या "super fresh" टुथपेस्टच्या जाहिरातितल्या व्यक्तिसारखा आपला दिवस जातो. आता अशा दिवसांचे फायदे किती आहेत बघा. आपला मुड चांगला असल्यामुळे खाणं-पिणं छान असतं,त्यामुळे तब्येत चांगली राहते... अगदी बी.पी. का काय म्हणतात ते पण नॉर्मल राहतं, गुणगुणण्यामुळे गाण्याचा रियाज होतो. बॉसशी चांगलं वागल्यामुळे promotion चे चान्सेस वाढतात. आजींना मदत केल्याबद्दल थोडं पुण्य पदरात पडतं. थोडक्यात प्रगतिच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते.

याविरुद्ध जर ही ५ मिनीटं आपल्याला मिळाली नाही तर आपण दिवसभर चिडचिड करत असतो. रस्त्यावरुन जाताना कोणी मधे आलं तर त्याच्या अंगावर खेकसतो आणि त्याचे शिव्याशाप पदरात पाडुन घेतो. ऑफिसात बॉसशी भांडण करुन आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेतो. अशा दिवशी साधा ताकभात खाल्ला तरी तो घशाशी येउन acidity होते.

आता हे पाहिल्यावर प्रगतिचा मूलमंत्र का काय तो सापडला असं तुम्हाला वाटेल. पण हे सगळं इतकं सोपं असतं तर ना!
कुठलीही चांगली गोष्ट सांगितली की त्याचे विरोधक तयारच असतात. लोकांचं (विशेषतः आयांचं) या ५ मिनीटांशी इतकं वाकडं का असतं काय माहित. काही लोक त्याला उगाचच मनोनिग्रहाचे मापदंड लावतात. "५ वाजता ठरलं म्हणजे ५ वाजताच उठायचं, ५ वाजुन ५ मिनीटांनी नाही" असले काहीतरी अघोरी विचार असतात त्यांचे. आणि ५ ला म्हणजे ५ लाच उठुन हे करतात काय? तर कुठे टेकड्याच चढ. नाहीतर सगळे एका ठिकाणी जमुन वेगवेगळ्या स्वरात हसतंच बस वगैरे वगैरे. अरे छान अजुन थोडा वेळ लोळावं, घरी दात न घासता पण चहा मिळत असेल तर तो प्यावा, सकाळचा एखादा (इतरांनी गायलेला) राग ऐकावा. कशाला जीवाला एवढे कष्ट?

आयांचं वेगळंच काहीतरी असतं. त्यांनी मारलेल्या पहिल्या हाकेत आपण उठलो नाही तर तो त्यांना त्यांचा नैतिक पराभव वाटतो. मग चिडुन त्या आपल्याला उठवतातच. सुटीच्या दिवशी "आत्ता उठ, नंतर दुपारी हवा तेवढा वेळ झोप" असलं काहीतरी बिनबुडाचं विधान करतात. अरे! दुपारी कसलं झोप? "जो बुंद से गयी हौद से नही आती! " अशी म्हण मला फेकाविशी वाटते. पण तो पहिला "जोSS" म्हणताना मला मोठ्ठी जांभई येते आणि त्याचा फायदा घेउन आई तिथुन निघुन जाते. कसं आहे, ५ मिनिटांची किंमत काय आहे हे ती ५ मिनीटं कधीची आहेत यावर अवलंबुन असतं. कडकडुन भुक लागलेली असतांना जेवण मिळण्यासाठी लागलेली ५ मिनीट आणि आवडीचं पोटभर जेवण झाल्यावर थोडीशी पण हालचाल न करता जाणारी ५ मिनीट यात काही फरक आहे का नाही?

असो! कधी ही ५ मिनीटं मिळतात तर कधी नाही. त्यांच्यासाठी रोजचा होणारा झगडा ही पण त्यातलीच मजा. कधी आपण झोपावं आणि कधी आईला आपल्याला उठवल्याचं समाधान मिळू द्यावं ... तिनं केलेली दुधीभोपळ्याची भाजी आवडत नसतांनाही आपण खातो कारण उरलेल्या अर्ध्या भोपळ्याचा उद्या ती हलवा करणार असते ... तसं.

Thursday, January 12, 2006

मी सिरीयस होतो!

प्रत्येक गोष्टीत कसली रे चेष्टा - हिचा नेहमीचा सूर असतो.
पुढची बोलणी टाळायला म्हणुन ... मी आपला सिरीयस होतो.

सकाळी मस्तपणे लोळायचं सोडुन ,
हातापायांच्या गाठी मारत योगासनं करतो.
उगाचच दमेकर्यासारखे मोठे श्वास घेउन,
त्याला प्राणायामाचं गोड नाव देतो.
या सगळ्यातला छुपा कंटाळा,
मला रोज वाकोल्या दाखवुन हिणावतो.
व्यायाम हा काय गमतीचा विषय आहे?
लगेच परिचित प्रश्न कानावर पडतो
आलेलं हसु आवंढ्याबरोबर गिळुन,
मी मात्र सिरीयस होतो

हापिसात दिवसभर मिटींगच्या नावाखाली,
मॅनेजर भरमसाठ काम देत बसतो.
जबाबदारीच्या नावाखाली उद्यापर्यंत,
सगळं काम करुन तो आणायला सांगतो.
अतिशयोक्ती अलंकाराचा इतका सुंदर वापर,
मला खुप गुदगुल्या करायला लागतो.
हापिसाच्या शिष्टाचारात हसणं बसत नाही,
पुर्वी वाचलेला नियम एकदम आठवतो
हास्याच्या सुरकुत्यांवर मख्खपणाची इस्त्री फिरवुन,
मी प्रामाणिकपणे सिरीयस होतो.


पोळ्यांना तेल लावतात - फुलकेच खावेत,
फुलक्यांवर तुप घेणार्यांचा सल्ला येतो.
कंटाळा आल्यामुळे कच्च्या भाज्यांचाच,
सॅलडच्या बहाण्याने ताटात ढिग असतो.
जेवणाच्या ताटातली विसंगती पाहुन,
हसायचा मोह अनावर होतो.
ताटातल्या अन्नाला हसायचं नसतं,
लहानपणचा संस्कार हळुच कानात सांगतो.
हास्याची तहान मौनाने भागवुन,
मी पुन्हा एकदा सिरीयस होतो.

सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेपर्यंत,
मोकळ्याने हसायला जागा शोधत असतो.
तेही नाही जमलं तर झोपल्यानंतर,
स्वप्नात तरी मनसोक्त हसुन घ्यावं म्हणतो.
मनातल्या हास्याला वाट करुन द्यायला,
एखाद दिवस कविताच लिहायला बसतो.

पणं हाय दैवा .......

कविता लिहीणं म्हणजे विनोद वाटला का?
एक साहित्यिक विचार लगेच मला दटावतो
त्यामुळे कविता लिहिण्यापुरता का होईना,
मी अपशब्द पुटपुटत सिरीयस होतो.

Monday, January 09, 2006

Oh no... not again

Just after my "Dear Readers" post below, after posting "तेथे पाहिजे जातिचे", my blogger account again refused to post any more stuff. I have been trying this for last 2 weeks now, and had to re-create the entire blog again (yes, re-create and again :(). This time, I am not only creating a new blog, I have also created a new account (so my profile may have changed) to see if that was not an account problem.

This has tested my patience enough. One more such problem with my blog and I am moving to another blog host, in which case, this url (palshikar.blogspot.com) will no longer hold my blogs, instead I will try to convey the new url for my blog on this page.

Regards
Amol

तेथे पाहिजे जातिचे

माSSSज!!

माझ्या कोणत्याही वक्तव्यावर अथवा वर्तनावर माझ्या मित्रांची ही ठरलेली प्रतिक्रीया असते. किंबहुना त्यांना आता इतकी सवय झाली आहे की मला शिंकं आली तरी "माSSSज!!" असं ओरडायला ते मागे पुढे पाहत नाहीत. मी काही बोललो तर त्यात माज असतो, मी काही नाही बोललो तरी तो माजच असतो. थोडक्यात अभिषेकीबुवांच्या "काटा रुते कुणाला" या गाण्यातल्या "माझे अबोलणेही विपरीत होत आहे" या वाक्यासारखी माझी अवस्था झाली आहे."खाउन माजा पण टाकुन माजू नका" या म्हणीमधल्या पहिल्या प्रकारात मी मोडतो असंही काही आचरट लोकांचं म्हणणं आहे. पण त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हरकत नाही.

यावरुन मला असं लक्षात येतं की जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांना माज असतो आणि दुसरे ज्यांना माज म्हणजे काय ते कळत नाही. स्वतःला माज असल्याशिवाय माज म्हणजे काय हे पण कळत नाही. म्हणुन मग अशा माणसांमधे "माज" या गोष्टीविषयी अनेक गैरसमज असतात. ते वाट्टेल त्या वर्तनाला माज समजतात, "माज करायला तुमच्यात काहीतरी विशेष असावं लागतं" असलं काहीतरी त्यांना वाटत असतं. तर हे आणि यासारखे इतर काही गैरसमज दुर करण्याचा दस्तुरखुद्दांचा (म्हणजे माझा) विचार आहे.

कधीकधी आपल्या ऐकण्यात येतं, काही जण म्हणत असतात "अरे असं एकदा होऊ दे रे, मग आपण पण असा माज करु ना की सगळे बघत राहतील." मला अशा लोकांची कीव येते. कारण माज ही "करायची" गोष्ट नसुन, माज हा "असावा" लागतो - ही मुलभूत गोष्टच त्यांना माहिती नसते.

आधी माज म्हणजे तरी काय हे इथे सांगितलं पाहिजे. तर मुख्य गोष्ट म्हणजे माज ही कोणत्याही प्रकारची भावना नसुन ती मनाची एक अवस्था आहे. पण तरीही "राग" या भावनेला जशी संताप, चीड, तणतण अशी वेगवेगळी अंगं आहेत तशीच ती माजालाही आहेत. त्यातील काही प्रामुख्याने आढळणारी अंगं आपण पाहु यात. या सगळ्या अंगांतील फरक दर्शवणारी रेघ अगदी बारीक पण ठळक आहे.

१. मी लै भारी
या प्रकारात मोडणार्या व्यक्ती "आपणच या विश्वाचा केंद्रबिंदू आहोत" या पद्धतीने वावरत असतात. असं वागण्यामागे किमान एखाद्या गोष्टीत तरी त्यांना काही विशेष नैपुण्य असतं असं काही नाही. तरीही खगोलशास्त्रापासुन अर्थशास्त्रापर्य़ंत कोणत्याही शास्त्राचं आपल्याइतकं ज्ञान कोणालाही नाही, विणकामापासुन पाककलेपर्यंतच्या सर्व कला आपल्याइतक्या कोणालाही अवगत नाहीत आणि हुतुतु पासुन बिलियर्ड पर्यंत कोणत्याही खेळात आपला हात धरणारा कोणी नाही असा त्यांचा एक समज असतो. पण असं प्रत्येकाला पटवुन देण्याचा त्यांचा काही अट्टाहास नसतो. आपापल्या जगात ते खुश असतात. काही अज्ञानी लोक याला अहंकार समजतात.

२. माझी मर्जी
या प्रकारात मोडणारी माणसं "आपण कोणीतरी आहोत" याऐवजी "आपण कोणी असो अथवा नसो, जसे आहोत तसे पण आपल्या मर्जीने वागणार" या पद्धतीने वावरत असतात. ते आपल्याला वाटेल तसंच वागतात, इतरांना पटो अथवा नाही. त्यामुळे अशा लोकाची निर्णयक्षमता चांगली असते, त्यात अनिश्चितपणा नसतो. याला इतर लोक हट्टीपणा किंवा दुराग्रह समजतात.

३. "तु कोण?" किवा "का म्हणुन?"
माजाबाबत जे अनेक गैरसमज आहेत त्यात - "माज हा नेहमी स्वतःबद्दलच्या काहीतरी समजातुनच असतो" - असाही एक प्रसिद्ध गैरसमज आहे. त्याला या प्रकारात मोडणारी माणसे खोटं ठरवतात.
या लोकांची ओळख म्हणजे त्याना "अमुक अमुक कर" असं सांगितलं तर "तु कोण मला सांगणारा?" किंवा "का म्हणुन मी असं करु?" असं उत्तर मिळतं. त्यांचं वर्तन "मी म्हणजे कोण!" किंवा "मला असं वाटतं" याऐवजी "तो मला सांगणारा कोण? मी का असं करायचं" या विचारांनी प्रेरित असतं. अशा वागण्याला अनेकदा तुसडेपणा किंवा खडुसपणा म्हटलं जातं.

तर प्रामुख्याने हे आणि अजुनही बरेच प्रकार असतात. काही लोकांमधे एकापेक्षा जास्त प्रकारच्या माजाच्या छटा पहायला मिळतात. जिथे हे सगळे प्रकार एकत्र येतात तिथे अजुन वरच्या पातळीचा माज तयार होतो. त्याला आपण अत्युच्च माज म्हणुया. या पातळीचा माज असणार्यांची संख्या फार कमी असते. कारण या पातळीचा माज करायला अतिशय खंबीर स्वभाव असावा लागतो. षडरिपूंवरही विजय मिळवावा लागतो.

त्याच्याही पुढच्या पातळीवर गेलेल्या माणसांमधे recursive माज असतो. म्हणजे आपल्याला माज आहे याचा पण त्यांना
माज असतो. असं करत करत तो माज वाढतच असतो. त्याला आपण परमोच्च माज म्हणुया. या पातळीवर फार म्हणजे फारच कमी जण पोचतात.

आणि याच्याही वरच्या पातळीवर गेलं असता, आपल्याला माज नसुन माजाची निर्मिती आपल्यातुनच होते आहे अशा निर्णयास माणुस पोचतो. आपल्यातुनच माज निर्माण होत असेल तर आपल्यालाच माज कसा असेल? याला आपण सर्वोच्च माज म्हणुया. सर्वोच्च माजाची अवस्था आणि मोक्षाची अवस्था यात फारसा फरक नाही. या पातळीवर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं असतात.

तात्पर्य म्हणजे मोक्षाची अवस्था गाठायला माजाचा रस्त्या सुद्धा आहे.

एक लक्षात ठेवा, तुम्हाला माज असेल तर तो आपोआप होतो, तो कधीही "करावा" लागत नाही. एखादी गोष्ट करणार म्हटलं
तर कोणत्याही परिस्थितीत ती करायची जिद्द लागते आणि एखादी गोष्ट नाही करणार म्हटलं तर कोणत्याही मोहाला बळी न पडता त्यापासुन अलिप्त रहायचा निग्रह लागतो. थोडक्यात एखाद्या वैराग्याला लागणारेच गुण असावे लागतात म्हणा ना. कदाचित म्हणुनच या दोन्ही मार्गांनी मोक्षप्राप्ती होऊ शकते. माज निभावुन नेणे हा पोरखेळ नाही,

"तेथे पाहिजे जातीचे, हे काम नोहे येरागाबाळाचे!"

Dear Readers

Dear Readers,

Due to some problem with my blogger account, I was unable to add any new posts to the blog. I tried to solve this issue in many ways by deleting the old blog and creating new ones to finally figure out that my last post (पहिलं वहिलं) seems too big for comsumption by the blogger servers and once that post is published, I can not perform any more activity on that blog.
So I had to delete the old blog and create a new one with the same URL as this URL is being reffered to from some places. I have tried to recover all my old posts with their original post dates printed at the end of each post, I will also try to recover the comments soon. It seems that the last post can not be recovered as it will again cause this blog to fail. I am really sorry for any inconvinience caused to you by this blog changing business.

पु.ल. म्हणतात तसं ....
कळावे ... नुसतंच कळावे नाही तर "कळावे, लोभ असावा" ही नम्र विनंती.

अमोल
Originally posted on 23/12/2005

पहिलं वहीलं

"लिमिट" हे मी पुरुषोत्तम साठी लिहिलेलं आणि बसवलेलं पहिलं नाटक. त्याआधी मी फरोदिया साठी "तो मी नव्हेच" लिहिलं होतं आणि लिमिटच्या आधी पुरुषोत्तम साठी "कुलुप" नावाचं एक सस्पेन्स असलेलं नाटक लिहिलं होतं. पण ते मी मित्रांना वाचुन दाखवल्यावर त्यानी मला"इतकं चांगलं नाटक लोकांना कळू न देता त्याबद्दल सस्पेन्सच ठेवलेला बरा" असं सांगुन ते नाटक मला "कुलुपात" बंद करुन ठेवायला सांगितलं.चेहर्यावरुन वाटत असलो तरी या सल्ल्यामागचा खवचटपणा न कळण्याइतका मी बावळट नाही. त्यामुळे हार न मानता मी लिमिट लिहिलंच.

तर सांगायची गोष्ट अशी की का कोण जाणे पण लिमिटचा पहिला draft लिहितांना त्यातला शेवटचा सीन म्हणजे नाटकातलं मुख्य पात्रएका स्पॉटमधे उभं राहुन नाटकाचं सार सांगणारी कविता वाचुन दाखवतं असा असावा अशी एक "प्रायोगिक" कल्पना मला सुचली. जर आधीच्यासीन्स मधे आपल्या अभिनयातुन आपले विचार मांडण्यात आपण कुठे कमी पडलो असलो तर शेवटी किमान नाटकाचं सार तरी प्रेक्षकांना पाजावंएवढाच या कवितेमागचा उदात्त हेतू होता. तुम्ही जर कधी पुरुषोत्तम केलं असेल तर ही भीषण संकल्पना अंमलात आणल्यास भरतच्या स्टेजवरकाय हैदोस होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. पण हे वाचुन माझ्यावर "यडछाप" असा छाप मारण्यापुर्वी मीआधी म्हटल्याप्रमाणे हे माझं पुरुषोत्तमच पहिलं नाटक होतं हे जाणकारांनी लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.

त्यामुळे script लिहीतांना भावनेच्या आणि उत्साहाच्या भरात मी एक मोठ्ठीच्या मोठ्ठी कविता लिहुन काढली. पण प्रेक्षकांच्या आणिविशेषतः माझ्या सुदैवाने आपल्यासारख्याच काही जाणकारांनी वेळीच हा डाव हाणुन पाडला. मी script चे अजुन काही draft लिहिले(कविता नसलेले). नाटक झालं. आम्हाला एकाच वेळी सर्वोत्कृष्ठ नाटकाचा पुरुषोत्तम करंडक, सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक नाटकाचा जयराम हार्डीकरकरंडक, मला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा गणपतराव बोडस करंडक आणि अभिनयाचे बापुसाहेब ओक पारितोषिक मिळालं. एकाच नाटकाला पुरुषोत्तमआणि जयराम हार्डीकर हे यापुर्वी स्पर्धेत फक्त एकदाच झालं होतं. सगळं काही चांगलं झालं आणि नंतर पहिल्या draft मधल्या कविता हाफक्त चेष्टेचा विषय बनुन राहिल्या.

मी काही कवी नाही (आयला, यमक जुळलं की, मी काही ... कवी नाही). पण आज जेव्हा मी त्या कवितेकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जे काही थोडंफार लिहिलं आहे त्यात ही आपली पहिली कविता आहे. ती कविता आज इथे लिहायचा विचार आहे. कविता खुप मोठी आहे. आता ५० पानांच्या नाटकाचं सार सांगायला ५ पानांची तरी कविता पाहिजेच ..... काय? आता मी ती कविती वाचली तर त्यात बर्याचगोष्टी बदलता येतील हे कळतं ... पण त्या बदलाव्याशा वाटत नाही. त्याचं कसं आहे, अनेकदा आपण एखादी गोष्ट,कला वगैरे शिकतजातो. शिकता शिकता त्यातल्या चुका सुधारत जातो. पण आपण केलेली पहिली गोष्ट, कलाकृती ही त्यातल्या सौंदर्यापेक्षा त्यातल्यात्रुटींसाठीच आपल्याला जास्त प्रिय असते. कारण नंतर आपण मनात आणलं तरी तशा त्रुटी, चुका आपण करु शकत नाही.

तुम्हाला अशा कविता वाचण्यात रस नसेल तर खरंच पुढचं वाचु नका. " फिर ये ना कहना के मैने वार्निंग नही दी थी". कविता तशी "गद्यमय पद्य" या प्रकारात मोडणारी आहे, काही ठिकाणी यमक बळंबळंच जुळवले आहे. बर्याच ठिकाणी तोच-तो पणाआहे असंही वाटू शकतं. विषय देखील थोडा "सिरीयस" प्रकारात मोडणाराच आहे. पण कशी का असेना, माझ्यासाठी ती माझी पहिली कविता आहे.


मी एवढं घाबरवल्यावर पण पुढे वाचण्याचा तुमचा अट्टाहासच असेल तर वाचकहो .. प्रस्तुत आहे .... खरं तर कविता जेव्ही लिहिलीतेव्हा ती नाटकासाठी असल्याने त्याला काही नाव वगैरे दिलं नव्हतं ... आता काहीतरी ठेवतो .... तर वाचकहो, प्रस्तुत आहे


अबाधित

कधीतरी ऐकलं होतं, की दृष्टीआडही एक सृष्टी असते,
पण त्या सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला नसते.


निर्विवाद सत्यांच्या एका सृष्टीत आपण जगतो,
कारण त्या सत्यांची सत्यता आपल्याला पडताळता येत नसते.


विश्रांतीसाठी झोप घेणं हा एकच उपाय आपल्यला ठाउक आहे,
कारण झोपेत आपले अस्तित्व आपल्यालाच जाणवत नसते.


झोपेत काय घडतं हे आपल्याला आठवच नाही,
आणि आपण काय विसरलो हे आठवण्याचा प्रयत्नही आपण करत नाही.


झोप ही विश्रांती आहे असं आपण मानतो,
तिला दुसर्या दृष्टीकोनातुन पाहण्याचा प्रयत्न करत नाही.


पण एकदा वाटलं झोप म्हणजे विसावा नसेल तर काय?
झोपेपर्यंत विश्रांती आहे, झोपेत कष्ट असतील तर काय?


झोप हा जर दरवाजा असेल, स्वप्नातुन सत्यात जाण्याचा,
मग तोच का नसेल एकमेव रस्ता, या प्रवासाच्या परतीचा?


पण मग सत्याची आणि स्वप्नाची परिभाषा काय?
या दोन जगांना विभागणारी रेषा काय?


मी खरा की माझं प्रतिबिंब हे मला कसं कळणार?
आरशाच्या आतुन बाहेरच्या स्वतःला मी कसं ओळखणार?


माझी सत्यातली ईच्छा मी स्वप्नात पूर्ण करतो,
सत्यात ज्याची भिती वाटते ते पण स्वप्नातच बघतो.


ईच्छापूर्ती जर स्वप्न असेल तर ईच्छाभंग का नसेल?
स्वप्नातलेच स्वप्न म्हणजे सत्य का नसेल?


म्हणजे ईच्छा हेच मुळ आहे का जगण्याचं?
तेच आहे का प्रतिक प्रवासातल्या दीपस्तंभाचं?


ईच्छेचा पत्ता शोधत राहणं हेच माझं काम आहे का?
त्या पत्त्याकडे जाणारा रस्ता मला माहिती आहे का?


पण ईच्छा पूर्ण झाल्यावर तरी माझा प्रवास थांबतो?
का परत एक नवीन पत्ता माझी वाट बघत असतो?


म्हणजे ईच्छापूर्ती हाही थांबा नाही का?
माझ्या प्रवासात कुठेच विसावा नाही का?


काळाला आव्हान देणं मला शक्य आहे का?
त्याच्या प्रवाहाविरुद्ध जाणं माझ्या हातात आहे का?


काळाचे दुत त्याच्या प्रवाहात अडथळा येउ देत नाहीत,
मी केलेला विरोध त्याला अपवाद असेल का?


आहे का अशी कुठली जागा जिथे काळही विसावा घेतो,
सदैव सगळ्यांना घेउन वाहणारा प्रवाहही क्षणभर थबकतो?


पण तो क्षण देखील काळाशिवाय कसा मोजणार?
काळाशिवाय क्षणाचा विचार तरी कसा करणार?


विचार .. विचार हेच मुळ आहे प्रत्येक प्रश्नाचं.
विचार हेच कारण आहे प्रत्येक उत्तराचं.


विचारांचा प्रवाह काळाशी जिंकण्याचा प्रयत्न करतो,
पण काळापुढे जाण्याचा प्रयत्न विफळ असतो.


स्वप्न आणि सत्य, दोन्हीकडे विचार आहे,
म्हणुनच त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे.


विचार नसला तर प्रश्न नसतील,
आणि त्यांचा विचार करायला लावणारी उत्तरही नसतील.


मग अशा अबाधित सत्यालाच तडा गेला तर?
विचारांची देणगी म्हणजे शाप असला तर?


आयुष्याच्या वर्तुळावर जीवनाच्या शेवटी मृत्यू दिसतो,
मृत्युच्या आधीपर्यंत जीवन असाही दृष्टीकोन असु शकतो.


मग कोणता दृष्टीकोन योग्य हो कोणी ठरवायचं?
समोरची गोष्ट कोणत्या डोळ्याने दिसते हे कसं सांगायचं?


कधीही न संपणार्या विचारांच्या रात्रीला कधी सकाळ होईल का?
मी अडकलेल्या चक्रव्युहातुन मला सुटका मिळेल का?


या विचारांचा गुंता सोडवण्यासाठी मी अजुन विचार करतो,
तेव्हा सुटलेला गुंता मला एकच गोष्ट सांगतो.


या सगळ्याचा विचार न करणं यातच याचं उत्तर आहे,
....
मृत्युनंतर नसतील विचार, एक अबाधित सत्य सांगतं
.....
या अबाधित सत्यात तरी तथ्य असेल का? मन लगेच विचारतं ......................
अमोल पळशीकर
०८।०७।२०००

विसंवाद

सुट्टीचा दिवस, सकाळची वेळ, एकंदरीत सगळं काही "निवांत" असतं. मी उशीरा उठुन चहा पिऊन बाहेरच्या खोलीत येतो. तिथे माझा भाऊपेपर वाचत बसलेला असतो. मी थोडा वेळ टंगळमंगळ करतो, शेवटी न राहवुन बोलतो
मी- काय वाचतो आहेस एवढा वेळ?
तो- तुला काय करायचं आहे? (पुण्याला येउन १० वर्ष झाली आहेत तशी त्याला, प्रश्नाचं उत्तर प्रश्नानेच
द्यायला शिकला आहे तो)
मी- मला पेपर वाचायचा आहे. ("काही" लोकांचा विश्वास असो अथवा नसो, मी रोज पेपर वाचतो हे
त्रिकालाबाधित सत्य आहे)
तो- (माझ्या या वाक्यावर तो नुसतंच विकट का काय ते म्हणतात तसं हसतो)
मी- दात काढायला काय झालं रे !! घशात घालू का सगळे?
तो- सकाळी सकाळी कोणी दुसरं मिळालं नाही का रे कावळ्या, म्हणे पेपर वाचायचा आहे, तुझ्या चोचीला
सेलाटेप लावतो, म्हणजे तुझी बडबड बंद होइल.

(स्वयंपाकघरातुन ओट्यावर भांडी आपटल्याचा आवाज येतो. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. "कावळा" हा शब्द उच्चारला गेला असतो. शिंग फुंकलं गेलं असतं. आता रणभूमीतुन माघार घेणं माझ्या "मानी" स्वभावाला "मानवत" नाही.)

मी- कावळा कोणाला म्हणतो रे घुबडा? तुझी मान पिळुन दोर्याने बांधुन ठेवीन.
तो- ए वटवाघळा, पंख्याला उलटा टांगु का तुला.

(पक्षीसृष्टी अपुरी पडायला लागल्यामुळे मी जलचरांकडे धाव घेतो)

मी- अरे जा रे, पाणगेंडा कुठला, तुझ्या त्या मोठ्या नाकपुड्यांना भोंगे लावुन ठेवीन, म्हणजे तू घोरायला
लागलास ना की ते वाजतील.

(पाणगेंडा हा जलचर नसतो एवढा विज्ञानाचा भाग वगळला तर पाणगेंड्याच्या नाकपुड्यांना भोंगे लावण्याची माझी कल्पना तुम्हाला कशी वाटली? माझ्या भावाला ही कल्पना ऐकुन उत्स्फुर्तपणे आलेलं हसु दाबण्यासाठी त्याचा चालू असलेला प्रयत्न आणि माझ्या या जोरदार वाराला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याची उडालेली धांदल माझ्या चाणाक्ष नजरेतुन सुटत नाही. तो पेपर खाली ठेवतो. त्याचं पक्षीसृष्टीचं ज्ञानही माझ्याइतकंच दिव्य असल्याने तो पण उभयचरांवर उतरतो.)

तो- ए बेडका, जास्त छाती फुगवू नको, तुझे बाहेर आलेले डोळे एकमेकांकडे वळवुन तुला zoo मधे ठेवीन,
मग चकणा बेडुक कसा दिसतो ते बघायला लोक येतील तिथे.

(माझ्या वाराला तोडीस तोड प्रत्युत्तराची अपेक्षा नसल्याने मी थोडा बावचळतो. स्वयंपाकघरातला आवाज थोडा वाढल्यासारखं वाटतं. भांड्यांच्या आवाजाबरोबरच काही मंत्रोच्चार पुटपुटल्यासारखा आवाजही येत असतो पण आमचं तिकडे लक्ष नसतं. आता भूचर विशेषणांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही हे कळतं, आणि जास्त वजन पडावं म्हणुम एकाच वंळी अनेक भूचर विशेषणांचा वापर करायला सुद्धा मी मागेपुढे बघत नाही. अशावेळी माझ्याकडचे प्राणी आधी "संपण्याची" शक्यता असते. पण तेवढी calculated risk मी घेतो.)

मी- तू हत्तीचं पोट आणि उंदराचं डोकं असलेला रानगवा आहेस. कोणीपण दिसलं की मारायला धावतोस.
चाबकाचे फटके लावले पाहिजेत तुला, त्याशिवाय ऐकणार नाहीस तू! (टाळ्या)
तो- तू उंटाची मान आणि शहामृगाचे पाय असलेलं लाल तोंडाचं माक़ड आहेस, तुला माणसांच्या जवळ
फिरकु द्यायला नको, उलटं टांगुन मिरच्यांची धुरी दिली पाहिजे.

(माझ्या भावाला सारखं मला उलटं टांगायची ईच्छा का होत होती काय माहीत. स्वयंपाकघरातुन येणार्या मंत्रोच्चार जोर वाढला असतो, भांड्यांचा आवाज असतोच. त्यातुन आमचा आवाजही नकळत वाढलेला असतो. त्यातुन निर्माण झालेला सामुहीक आवाज हा शेअरमार्केट मधल्या गोंगाटाला लाजवेल असा असतो. आता हातघाईची लढाई सुरू झाली असते, "ठेवणीतली" खास शस्त्र वापरायती वेळ आली असते, आता नस्त लांबण लावायचं नसतं, फक्त एकेक ईरसाल भूचर विशेषणाचा बाण भात्यातुन काढायचा आणि फेकायचा असतो.)

मी- बैल!
तो- घोडा!
मी- एकशिंगी गेंडा!
तो- गाढव!
मी- डुक्कर!!!!!!!!!!!!!!!!

हा शब्द उच्चालल्यावर जादुची कांडा फिरवल्यासारखी सगळीकडे एकदम शांतता पसरते, सगळे आवाज बंद झालेले असतात, खोलीच्या दारात आई उभी असते. तिच्या चेहर्याकडे पाहुन तिच्या मनात आमच्या बाबतित काय विध्वंसक विचार येताहेत ते स्वच्छ दिसत असतं. या डुकराने काय घोडं मारलं आहे कुणास ठाउक (हाहाहा!) पण आमच्यापैकी कोणीही हे संबोधन वापरलं की तिचा पारा चढतो. आईच्या चेहर्याकडे पाहुन तिच्या मनातले आपण वाचलेले विचार बरोबर आहेत का नाही याची परीक्षा घेण्याइतके आम्ही नतद्रष्ट नाही. क्षणाचाही विलंब न लावता भाऊ परत पेपरात डोकं घालुन "आजचं भविष्य" वाचायला लागतो. मी देखील पापणी लवायच्य़ा आत त्या खोलीतुन नाहीसा होतो. मगाजचे मंत्रोच्चार परत सुरू होतात. आता बाकी सगळं शांत असल्याने ते नीट ऐकू येत असतात. "एवढी वयं वाढली तरी अकला येत नाहीत, एकतर सारखं लोळत पडायचं TV समोर नाहीतर मुर्खासारखे वाद घालुन मला त्रास द्यायचा. घरात एक काडी इकडची तिकडे करायची नाही...." असं परिचयाचंच स्तोत्र कानावर पडतं. हा आख्खा अध्याय मला पाठ असल्याने पुढचं मी ऐकत नाही. "पुन्हा अशी वेळ आली तर?" या विचाराने मी नवीन प्राणीविशेषण शस्त्रांना धार लावायला सुरुवात करतो. माझा आणि माझ्या भावाचा (वि)संवाद नेहेमीप्रमाणेच सुरू झालेला असतो आणि नेहेमीप्रमाणेच संपतो.
Originally posted on 8/30/2005

असंच!

Ok, so without the self knowing what this tagging business is, Ajit has "tagged" me which probably means writing some stuff on your blog. If thats that, thats that, what!! I mean, if your friend asks you to write something, you write. Besides, since it is about books, I dont mind writing about it.

Number of books I own:
Easily 150+ and if you want to include technical books also, add another 100 or so.

The Last Book I Read (and Bought) :
The last one I bought, but not read yet is "Pigs have Wings - P.G Wodehouse".
The last one I read is:
A pelican at Blandings - P. G. Wodehouse - A fantastic blandings story with Lords Emsworth at his best.


Books That Mean A Lot to Me :

असा मी असा मी, बटाट्याची चाळ, हसवणुक इ. इ. - पु. ल. देशपांडे
सामन्य माणसाबद्दलचं असामान्य पुस्तकं. स्वतःवर कसं हसावं हे मी या पुस्तकांतुन शिकलो. इतरांना हसवण्याची इच्छा असेल तर स्वतःवर हसता येणं फार महत्वाचं असतं (हे कोणीही न वितारता पण सांगतो आहे, काय करणार, जित्याची खोड ... ).

महानायक - विश्वास पाटील
अतिशय प्रेरणादायी पुस्तक.

The Complete Collection of Sherlock Holmes - Sir Arther Conan Doyle
No doubt, a masterpiece. I can write a lot about this, but this is not the place, probably THIS has some more things.

Illusions - Richard Bach
I read this one because someone told me that one of my marathi plays at Puruhottam Karandak, "Limit" resembled this book. After reading it, I found out that this "someone" had neither understood t

विरोधाभास - The paradox

विनोद हा सर्वांना हसवण्यासाठी असतो हे खरं, पण दर्जेदार विनोदनिर्मितीसाठी खुप गांभीर्याने विचार करावा लागतो. म्हणुनच

"गंभीरपणे केलेला विनोद" हा मुळात जरी विनोद असला तरी गंभीरपणे विनोद करणे हा काही विनोदाचा भाग नाही.

केवढा हा विनोदाभास...अर्र!! हे आपलं ... विरोधाभास.
Originally posted on 6/24/2005

अनभिषिक्त

It is well known in the circles in which I move that Amol seldom praises a person (owing thishabit to the fantastic city in which he has been living for quite some time now). No sir,not so easy to make him like something. But when he likes someone, there is no limit tothe good words he has to say about him/her.
Hardly a day has passed in last few months without me reading a P G Wodehouse for at least an hour. I have liked it to the extent that on busy days, I have even sacrifised some of my otherwise essential "eight hours" to read what Jeeves/Bertie/Gally or Lords Emsworth are up to. I had tried to read PGW books a few years back but my limited knowledge of the language prevented me from proceeding beyond the preface.
We were arguing that day; me and my mind; about the later's habit of discouraging me anytime I think of an ambitious scheme. The dialogue went as follows

Me: I should make another attempt at the PGW books
Mind: Forgot about the last time's disaster so soon?
Me: Well, one fails but tries again
Mind: And fails again and again and again...especially if one's GRE score in verbal is 380/800.
Me: But I was good at Toefel
Mind: That was American, PGW is English, get a grip on yourself, you have to start from learning which thing is in which language.
Me: But I can just start, understanding the meanings of words by context or leaving them for the time being and later check the meaning in the Dictionary.
Mind: You have started talking like that brain of yours!! This is no software where you might leave something as TBD and come back later, Ha!!!

Most disturbing, as you would agree. But we Palshikars are men of strong will. As the mind started dominating the discussion, I decided to show the iron hand in the velvet glove; if you know what I mean. I said the words which rescue me eveytime I am losing a verbal battle. I kept the upper lip stiff and said
"I am going to do it no matter what you or othersthink".
"Very good", the Mind said,
"Right Ho then!!" continued I.
People close to me might disagree, but being headstrong has its advantages,as it is visible in the case at hand.The count of PGW books I have bought and read has become two digits long back. The whole thing is very easy. You take a PGW in your hands, you read it, you laugh, you love it, you finish it, you buy another PGW and you jump back to the beginning of this sentence.
In the little kingdom of humour which lies in my heart, there are many places for knights and soldiers but very few (yes, more than one) for kings. PGW is an undisputed(अनभिषिक्त) king ..if undisputed in the word I want .. in there. Everytime I finish a PGW... eager to know when I can start another one, "Sir P G Wodehouse" I say to myself "You stand alone".
Originally posted on 6/14/2005

असंबद्ध- The Irrelevant

दुपारचे १२ वाजले आहेत. मा खुप दिवसांना ब्लॉग लिहितो आहे. एका दिवसात २४ तास असतात आणि तेवढ्या वेळात पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. मी मंदिरात गेल्यावर देवाभोवती प्रदक्षिणा घालतो पण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यात का पॉइंट आहे? पॉइंट म्हणजे लांबी-रुंदी-खोली नसलेली गोष्ट. त्याला मराठीत बिंदू असे म्हणतात. बिंदू हे एका चित्रपट अभिनेत्रीचे नाव आहे. "नावात काय आहे" असं शेक्सपिअर नावाचा इंग्रजी लेखक म्हणुन गेला आहे. पण तो म्हणला म्हणुन लगेच ते खरं मानायची गरज नाही. अशा स्वभावाला मराठीत अहंकार असं म्हणतात. सारखं ओम्-ओम् केल्यास त्याला जसं ओंकार म्हणतात तसंच सारखं अहम्-अहम् (म्हणजे मी-मी) केल्यास त्याला अहंकार म्हणतात. अहंकारला यमक जुळवायला टुकार, भिकार, चुकार, आकार, विकार, चिक्कार, धिक्कार हे शब्द वापरता येतील. उदाहरणार्थ,
लेखक आहेस तू चुकार,
तुझी शब्दनिवड किती टुकार,
शुद्धलेखन त्याहुन भिकार,
कवितेला ना कोणताच आकार,
आणि म्हणे प्रसिद्धी हवी चिक्कार,
किती हा अहंकार,
हा आहे एक मानसिक विकार,
लेखका तुझा असो धिक्कार!!
यालाच शीघ्रकाव्य असे म्हणतात. शीघ्र म्हणजे पटकन. अरे! किती पटकन १२:३० वाजले. आता मला भुक लागली आहे. मी जेवायला जातो. माझा मित्र जेवायला बोलावतो आहे, म्हणे "लवकर चल, नाहितर नंतर माझ्या कामाचे तीन तेरा वाजतील. " कामाचा आणि जेवणाचा काय संबंध? किती असंबद्ध बोलतात काही लोक!!!
Originally posted on 3/14/2005

परफेक्ट!!

३१ डिसेंबरची संध्याकाळ, ६-१५ वाजता निघायचं ठरवुन नेहमीच्या सवयी प्रमाणे आम्ही (म्हणजे "espians" -- SP कॉलेज मधल्या मित्रांचा ग्रुप) ७-१५ ला निघालो. नेहमीप्रमाणे सुरवातीचा थोडा वेळ उशीर नक्की कोणामुळे झाला यावर वाद घालण्यात गेला. साधारणतः ८ च्या सुमारास आम्ही पानशेत जवळच्या "शांतिवन" नावाच्या ठिकाणी पोचलो. नावाप्रमाणे इथे सगळं शांतच होतं. नाही म्हणायला त्या कार्यालयात एक माणुस आणि एक वॉचमन भुतासारखे बसले होते. आम्ही आल्यावर तिथल्या माणसाने " काय कटकट आहे" असे भाव आणुन आमचं बुकींग बघुन २ खोल्यांच्या किल्ल्या दिल्या. अंधार असल्यामुळे आजुबाजुचा परिसर कसा आहे याचा काही अंदाज येत नव्हता. आमच्या खोल्या झोपडीवजा आकाराच्या, समोर छोटीशी ओसरी असलेल्या अशा होत्या. सामान आत ठेवुन आम्ही थोडा वेळ हिंडायला गेलो. परत आल्यावर आमच्या खोल्यांच्या मागच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या खाटांवर गप्पा मारत बसलो. खोल्यांच्या मागच्या बाजुलाच शांतिवनचा "विज्ञान कक्ष" देखिल होता. तिथे अनेक "विज्ञानसंबंधित" गोष्टी होत्या. त्यामधे एक सायकलवर बसलेला हाडांचा सापळा होता (माणसाचा). त्या सापळ्याचं प्रयोजन मला शेवटपर्यंत कळलं नाही. काही वर्षांपुर्वी मी बारीक असण्याच्या बाबतीत त्या सापळ्याला competition देऊ शकलो असतो, पण आता ते शक्य नाही.... असा एक विचार माझ्या मनात डोकावुन गेला.
नंतर वर दिसणार्या निरभ्र आकाशाकडे बघुन प्रत्येकाने आपलं "आकाश निरीक्षणाचं" ज्ञान पाजळायला सुरुवात केली. "व्याध कुठला आणि ध्रुव कुठला .... सप्तर्षी कसे ओळखायचे ... मृग नक्षत्र कधी दिसतं" अशा अतिशय मुलभूत प्रश्नांवर वाद चालू होते. मला आकाशात फक्त चंद्र आणि सूर्य एवढ्याच गोष्टी ओळखता येत असल्यामुळे मी त्या वादात फारसा पडलो नाही.
थोड्या वेळाने वादाची तीव्रता कमी झाल्यावर "वा! किती छान शांत वाटतं आहे" असं आम्ही म्हणायला ... आणि थोड्या वेळापूर्वी तिथे आलेल्या एका ग्रुपने त्यांनी आणलेल्या एका महाकाय music system वर कर्णकर्कश्य आवाजात "कसा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला" हे गाणं लावायला एकच गाठ पडली. आम्ही एरवी तावातावाने त्यांच्याशी भांडलो असतो पण तिथं जाऊन पाहिलं तर काही आमच्या वयाची आणि काही आमच्यापेक्षा वयाने बरीच मोठी माणसं, लहान मुलांच्या वाढदिवसाला घालतात तशा कोनाच्या आकाराच्या टोप्या डोक्यावर घालुन नाचत होती. आम्ही हताश होउन आपल्या जागेवर परतलो.
भूक वाढायला लागली होती पण तिथली माणसं काही सांगितलेल्या वेळी जेवण द्यायला तयार नव्हती. आमच्या संयमाची पुरेपुर परीक्षा घेउन झाल्यावर त्यांनी आम्हाला जेवण दिलं. तेच जेवण मी आत्ता जेवलो तर मला ते आवडेल का? हे मला सांगता येणार नाही. जेवण आवडायला नुसती अन्नाची चवच नाही तर आजुबाजुची परिस्थिती पण तितकीच आवश्यक असते. न थांबता एका दमात सिंहगड चढुन गेलेल्या माणसाला विचारावं की पिठलं भाकरी कशी लागते .... पण एखाद्या मित्राला engineering च्या परिक्षेच्या आदल्या दिवशी जेवताना "श्रीखंड कसं झालंय?" हा प्रश्न कोणीही विचारु नये.... थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या दिवशी जोरदार भुकेमुळे, छान गार हवेमुळे, (बाजुला चालु असलेल्या "मेरे पिया गये रंगुन" च्या REMIX मुळे) आणि मुख्य म्हणजे जवळच्या मित्रांच्या संगतीमुळे असं काही छान जेवण झालं ... की जवाब नही!!!
पोटभर जेवणानंतर छान filter coffee प्यायलो आणि आम्ही वख्खई खेळायला बसलो. त्या दुसर्या ग्रुपची गाण्याची अभिरुची फारच चमत्कारीक होती. रिमिक्स नंतर "शोला जो भडके" वगैरे जुनी हिंदी गाणी आणि मग मराठी भक्तीसंगीतावर गाडी घसरली होती. त्यामुळे त्याच्या मानसिक आणि बौद्धिक संतुलनाबद्दल आमच्या मनातला संशय अजुनच गाढ झाला हे वेगळं सांगायला नको.
पत्त्यांचा डाव आणि गप्पा छान रंगल्या होत्या. बघता बघता पहाटेचे ४ कधी वाजले आणि गप्पा मारत आम्ही झोपलो कधी ते कळलं पण नाही. सकाळी उठल्यावर कळलं की भोवतालचा परिसर फारच सुंदर होता. मग थोडा वेळ फोटोग्राफीमधे गेला, परत भूक लागली. न्याहारीला झकासपैकी पोहे-कांदाभजी आणि चहा वा!! , गार हवेत या पदार्थांची मजा काय असते हे कोणाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही.
भरल्या पोटाने आणि उतु जाणार्या आनंदानं मी तिथुन निघालो. या सगळ्याचं एका शब्दात वर्णन करायला माझं मराठीचं ज्ञान तोकडं पडतं. या नविन वर्षाची सुरवात शांततेतही नव्हती, दंग्यात पण नव्हती, नाट्यमय नव्हती, निरुत्साही पण नव्हती, भव्य-दिव्य नव्हती, यःकश्चितही पण नव्हती , ती होती ...... परफेक्ट!!
Originally posted on 1/19/2005

The game is afoot!!



There is no character that has fascinated me more than that of Sherlock Holmes. Hats off to Sir Arthur Conan Doyle. The character is now so well defined in my head that like many others, I would also like to beleive in a thought that he actually existed :). Characteristically, he is defined to be "Unpredictable" and yet, none of his extraordinary actions like the ones in "Adventure of the Dying Detective" look out of place. Many authers write "unjustifiable" things for characters which are defined to be unpredictable, but the actions of Shcerlock Holmes, though being extra-ordinary..are "consistent" with his character. Showing a very extraordinary yet consistent behaviour of a unpredictable character is a real difficult thing, and thats the beauty of Sherlock Holmes misteries that attract me the most.
I tried getting a similar costume on my Yahoo Avtar but it dint work out that well :D:D:D
I wish that I will be able to go to london at least once to visit 221 Baker street and sit in his armchair smoking a (empty :D) pipe wearing the same costume as the great detective himself and do the same thing as they describe
"A ring comes at the bell; a step is heard upon the stair. The drooping eyelids lift, and the nostrils quiver with the thrill of the chase: "Come, Watson come, the game is afoot!"
Originally posted on 12/2/2004

काही नवे वाहतुकीचे नियम

आपल्याला Learning Liscence काढताना वाहतुकीच्या चिन्हांबद्दल जे काही प्रश्न विचारले जातात ना त्या यादी मधे नसलेले पण पुण्यात गाडी चालवायला अतिशय आवश्यक असे काही वाहतुकीचे नियम इथे लिहायचा विचार आहे. या नियमांसाठी आवश्यक चिन्हे नेहेमिप्रमाणे लाल-पांढर्या रंगाच्या फलकावर न दिसता आजुबाजुच्या रहदारीतच त्यांची "लक्षणं" दिसतील हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.

नियमाचे नाव - Landing Gears
लक्षण - साडी नेसलेल्या काकू Kinetic Honda, Honda Activa यासारख्या एखाद्या वाहनावरुन तुमच्या पासुन १० फुटाच्या पट्ट्यात चालल्या आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि त्या काकू अद्रुश्य होइपर्यंत जागचे हलु नका.
विशेष दंडपात्र गुन्हा - काकुंना overtake करण्याचा प्रयत्न करणे, त्याना side मागण्यासाठी horn वाजवणे इ.
संदर्भासह स्पष्टीकरण - विमान land होताना त्याचे Landing Gears जसे बाहेर येतात तसे गाडी चालवताना काकुंचे दोन्ही पाय गाडीच्या बाजुला येउन जमीनीला घासत असतात, आणि तशाच अवस्थेत त्या ४०-५० कि.मी. प्रति तास या वेगाने त्या गाडी चालवत असतात. जवळपास एखादा चौक असल्यास त्यांनी केलेल्या हातवार्यांवरुन त्या ज्या दिशेला जातील असं वाटत असेल त्या दिशेला त्या जातीलंच असं नाही. मी एकदा दुपारी एका रिकाम्या रस्त्यावरुन जात असताना अशाच एका काकुंनी चौकात आल्यावर डाविकडला indicator दिला, उजवीकडे हात दाखवला आणि त्या सरळ निघुन गेल्या !!!!!!!!!!
त्यांना overtake करायला तुम्ही speed वाढवायला आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या हातगाडीवरची भाजी बघुन "अय्या! किती छान रताळी" असं म्हणत मागचा-पुढचा (विशेषतः मागचा) काहीही विचार न करता त्यांनी ब्रेक दाबायला एकच वेळ असू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्यांना side मागायला horn वगैरे वाजवलात तर त्या आवाजाने दचकुन त्या आपल्याच गाडिवर पडतात. "kinetic वरच्या काकू" यापेक्षा धोकादायक गोष्ट पुण्याच्या रस्त्यावर शोधुन सापडणार नाही (नाही... मोटारसायकल वरील मुलगी देखील नाही)

नियमाचे नाव - Godzilla
लक्षण - एखादी मुलगी Indigo, Esteem, Scorpio (!!) यासारख्या एखाद्या मोठ्या वाहनातुन तुमच्या पासुन १०० फुटाच्या पट्ट्यात चालली आहे.
नियम - Godzilla अथवा King Kong यासारख्या सिनेमात त्या महाकाय प्राण्याला पाहिल्यावर लोक जसे पळत सुटतात तसा आपला जीव मुठीत धरुन वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटा. (पळताना माफक प्रमाणात आरडा-ओरडा केलात तरी चालेल.) ती गाडी कधी, कशी, कोणाच्या अंगावर येइल काही सांगता येत नाही.
विशेष दंडपात्र गुन्हा - ती मुलगी जर आपल्या वाहनाच्या मागे असेल आणि horn वगैरे वाजवत असेल तर ताबडतोब side द्या आणि "आज आपल्याला शिर सलामत तो पगडी पचास किंवा जान बची तो लाखो पाये... अशा म्हणींचा प्रत्यय आला" अशी मनाची समजुत घालुन घ्या.

नियमाचे नाव - आजोबा crossing
लक्षण - ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आजोबा तुमच्या समोर रस्ता cross करत आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि एखाद्या सुजाण नागरिकाप्रमाणे आपल्या मागुन येणार्या लोकांना देखिल ओरडुन ... नाहितर वेड्यासारखे हातवारे करुन संभाव्य धोक्याची जाणिव करुन द्या. कारण आजोबांना जर रस्ता cross करायची लहर आली तर ते " मला आता रस्ता cross करायचा आहे आणि तो मी करणारच" या दृढनिश्चयाने ते आपले दोन्ही हात उंचावुन रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या वाहनांना " थांबा" असा इशारा करुन बाकी कसलिही पर्वा न करता चालायला लागतात .. मग त्या निश्चयापुढे आपल्यासारख्या " आज दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा/क़ॉफी प्यायची नाही" असला साधा निश्चय पाळता न येणार्या पामरांची काय कथा?
विशेष दंडपात्र गुन्हा -गाडी आजोबांच्या फार जवळ नेऊन थांबवणे. असे केल्यास किमान अर्धा तास रस्त्याच्या कडेला रणरणत्या उन्हात उभे राहुन " आजच्या पिढीचं काय चुकतं" या विषयावरिल व्याख्यान ऐकण्याची तयारी ठेवा.

सध्या एवढ्या नियमांचे नीट पालन करा. दुरदर्शन वर सांगतात ते लक्षात ठेवा ..... " मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" , " गाडी नीट चालवा, घरी कोणितरी तुमची वाट पाहत आहे" " दुर्घटनासे देर भली" इत्यादी.

आपलाच एक शुभचिंतक (आणि समदुःखी वाहनचालक)
Originally posted on 12/10/2004

नावात काय आहे?

परवा संध्याकाळी फोन वाजला, मी उचलल्यावर तिकडुन प्रश्न आला "क्यान आय स्पिक टू मिस्टर अमौवल पलशानका ? " मला २ सेकंद काही सुधरेच ना! मग माझ्या लक्षात आलं की हे माझ्याच नावाचं अजुन एक "विलायती" रुप आहे (Palshikar मधला शेवटचा r silent समजुन) . तसे माझ्या नावाचे अनेक अपभ्रंश मला आता ठाउक आहेत. पण हे काहीतरी नविनच प्रकरण होतं.
आता मला सांगा, माझं "अमोल पळशीकर (spelled as: Amol Palshikar)" हे नाव उच्चारायला खरंच इतकं अवघड आहे का? त्यात एकपण जोडाक्षर सुद्धा नाहिये. पण त्या फोनवरची बाई ते उच्चारताना, आपल्याला दातांच्या डॉक्टरने जबड्यात किंवा जिभेला भुलेचं इंजेक्शन दिलेलं असताना बोलायला जितका त्रास होतो, तितका त्रास झाल्यासारखं बोलत होती. पण तिने खास विलायती ऍक्सेंट न वापरता माझं नाव नीट उच्चारलं असतं तर मला कळलं नसतं का, की तीचं शिक्षण भारतातच झालं आहे, मग तिचा तो केवढा अपमान झाला असता !!! या ऍक्सेंटच्या नादात इंग्रजी भाषेत उच्चारशास्त्र हादेखील एक महत्वाचा भाग आहे हे विसरुन जाणारे अनेक लोक आहेत.
आता तिला एकटीलाच काय दोष द्यायचा. माझ्या नावाचा सर्वात भयंकर अपभ्रंश करण्याच्या स्पर्धेत धोबी, किराणामालाच्या दुकानातले मारवाडी दुकानदार, दवाखान्यातले रिसेप्शनिस्ट हे देखिल मोठ्या हिरीरीने भाग घेतात. काही उदाहरणे खालिलप्रमाणे (अपभ्रंशपातळीच्या चढत्या क्रमाने),
१) पळसकर
२) पळसेकर
३) पालिशकर (कशाला पालिश करायचं काय माहित?)
४) पलसुलकर (!!!)
५) पेलसेकर
६) पालसवार (???)

माझ्या भावाला याहुनही वेगळे अपभ्रंश माहित असतिल याची मला खात्री आहे.
कुणीतरी (नक्की कोणी ते मला माहित नाही :D) म्हंटलंच आहे, की "नावात काय आहे? (What's in the name)", त्या "कुणीतरी"चं मला माहित नाही, पण इतर फारसं काही कर्तृत्व नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला बाकी कशाने नाही तर फक्त नावाने लोक ओळखतात. म्हणुलच मला जर कोणी "नावात काय आहे?" हा प्रश्न विचारला तर माझं उत्तर असतं "या नावातच माझी ओळख आहे".
Originally posted on 10/15/2004

I feel the need .... the need for speed

Thats one Top Gun dialogue I can relate to, because every time I start my bike or step inside my car, I feel like racing. It really becomes a need to drive fast and stretch the vehicle to its maximum.
I know that it is dangerous and not worth it and other blah blah blah ... but unfortunately only people who themselves love speed can understand this need. I would have loved to become a racer ... either a motocross .. or normal bike racing .. or car racing or even F1 :) ... No NOT bicycle racing . I dont really enjoy watching races on TV though.
It is a great feeling when you are at the peak speed of your vehicle (unless its a small scooter having peak speed of say 40km/hr ) even if that feeling lasts for a few seconds, I enjoy it to the fullest. I have touched 110 Km/Hr with Caliber and 125 Km/Hr with Indigo, and yet I dont miss any chance (like getting an empty road all for myself) to match or even cross those.
There are very few reasons ... which can make me go out of Pune for some time .... Not having big and good enough roads for racing is one of them ;)
Originally posted on 11/23/2004

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

काल बोलता बोलता विषय निघाला आणि आमच्या बिल्डिंगमधल्या मुलांना आजपासुन दिवाळीची सुट्टी आहे असं कळलं. "दिवाळीची सुट्टी" ...... हे शब्द आणि मुख्यतः त्यांचा अर्थ मी विसरलो आहे असं माझ्या लक्षात आलं. दिवाळीसारख्या प्रसन्न सणाची कल्पना आता आपल्या लेखी " ऑफिसला ४ दिवसांची सुट्टी" इतकी क्षुद्र झाली आहे हे पाहुन मला माझाच राग आला आणि त्याबद्दल विचार करताना खालचे शब्द सुचले .....

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नळाखाली हात धरुनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत..तिखट-मीठ लावलेल्या
चिंचा-बोरं-पेरू-काकडी सगळं खायचय,
सायकलच्या चाकाला स्टंप धरुन
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करुन
सायकलची रेस लावुनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधुन निघुन बाहेर पळायचय,
ती पळुन जायची मजा अनुभवायला ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय,
आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असू दे.. जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझं पाठिवर वागवायचय,
कितीही उकडत असू दे.. वातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडुन बसायचय,
कितीही तुटका असू दे... ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय,
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
Originally posted on 10/29/2004

हसू नका बरे !

याआधिच्या शून्य ह्या blog च्या comments मधे अजितला सांगितल्याप्रमाणे माझ्या "पूर्णमिदं पूर्णमदः" या नाटकातलं दुसरं गाणं लिहितो आहे. लहानपणी एका वर्तमानपत्रात (कुठल्या ते आठवत नाही) "हसु नका बरे" नावाचं एक सदर होतं. त्यात काही विनोद असायचे. पण माझ्या या blog साठी मात्र वाचकांनी शीर्षकाचा शब्दशः अर्थ घ्यावा ही नम्र विनंती. कधीकधी अतिउत्साहाच्या भरात माणुस ज्याप्रमाणे काहितरी बोलुन जातो तसंच अतिउत्साहाच्या भरात मी काहितरी लिहिलं आहे असं समजा.
तर या गाण्याची पार्श्वभुमी अशी आहे की शून्य आणि अनंत (infinity) एका माणसाला त्यांच्यात श्रेष्ठ कोण ते ठरवायला सांगतात आणि त्याला शेवटी कळतं की ते दोघंही "पूर्ण" (complete) आहेत. हे गाणं ३ पात्रांच्या तोंडी आहे.

नायक:

मीच का?
मला सांगा मीच का?
या कुटप्रश्नांची उत्तरं द्यायला मीच का?
मला सांगा मीच का?
शून्य श्रेष्ठ की अनंत सांगायला मीच का?
मागे पडले महाभाग दोन,
सांगा ह्यातील श्रेष्ठ कोण.

शून्य:

माझ्यातच सुरवात सगळ्याची,
माझ्यातच निर्मिती विश्वाची,
मजपासुन किंमत सर्वांची,
मीच साखळी अस्तित्वांची.

सुईच्या टोकाची लांबीही जास्त,
मातीच्या कणाची रुंदीही जास्त,
शून्यत्वापेक्षा तर सांगतो,
हवेतील अणूचे वजनही जास्त.

(तिसरं कडवं मला आत्ता आठवत नाहिये, आठवलं की लिहेन :D)

अनंत:

माझ्यातुन हे शून्य जन्मले,
माझ्यातुन हे विश्व निर्मिले,
माझ्यातच व्याख्या आत्म्याची,
माझ्यातच हे ब्रह्म साचले.

सागराच्या पाण्याचे थेंबही कमी,
वाळवंटाच्या वाळुचे कणही कमी,
माझी किंमत जाणुन घ्यायला,
मानवाच्या कल्पनेची झेपही कमी.

मजपासुन प्रवास विश्वांचा,
मजकडेच रस्ता अंताचा,
या वाटेतिल मुसाफिरा,
तू ठरव विजेता या वादाचा.

Chorus:

ऊँ पूर्णमिदं पूर्णमदः, पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते

नायक:
(श्लोकाचा अर्थ)
हेही पूर्ण, तेही पूर्ण,
पूर्णाचे निर्माते पूर्ण,
पूर्णातुन हे पूर्ण काढिले,
तरीही उरते हेच पूर्ण.

किमती तुमच्या भिन्नभिन्न,
तरी व्याख्या कशीकाय समान ही ?
पूर्णत्वाच्या व्याख्येने,
बांधली पुलाची कमान ही.

टोकाच्या जरी तुमच्या किमती,
कल्पना एकच आहे तुमची,
दोघांना ना काही व्याख्या,
प्रतिबिंबे तुम्ही परस्परांची.

जशा एकाच नाण्याच्या बाजू दोन,
कसंकाय सांगू श्रेष्ठ कोण ?
Originally posted on 10/14/2004

शून्य!

काल पुलंचं "एक शून्य मी" नावाचं पुस्तक वाचत होतो. तेव्हा माझ्या TE मधल्या फिरोदिया करंडकाच्या नाटकात मी लिहीलेलं शून्यावरचं गाणं आठवलं, तेच इथं लिहितो आहे.

हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ?
हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ?

संख्येमध्ये शून्य मिळविता फरक न पडतो संख्येत,
संख्येमधुनी शून्य काढिता बदल न घडतो संख्येत,
मग शून्य म्हणजे आहे नक्की काय,
हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ?

संख्येला शून्याने गुणता उत्तर येती शून्यच ते,
स्वतःमधुनी "स्वत्व" वगळता शेष राहती शून्यच ते,
शून्यामध्ये शून्यचं मिळवा,
शून्यामधुनी शून्यचं वगळा,
नष्ट न होती शून्य हे !

अनेक अस्तित्वांच्या या गुंत्याची नक्की ओळख काय,
नसण्याचे असणे देणार्या ह्या शून्याची किंमत काय,
अस्तित्वही नाही,
नास्तित्वही नाही,
दोघांचे मिश्रण नाही,
दोघांचा अभावही नाही,
हेही आहे..तेही आहे...हेही नाही...तेही नाही,
मग शून्य म्हणजे नक्की काय,
हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ???!!!
Originally posted on 10/14/2004

मिरवणुक, फसवणुक, हसवणुक की करमणुक

दरवर्षी अनंत चतुर्दशीला कुठेही न जाता मी घरीच असतो. माझ्या घराच्या अगदी जवळ नदी असल्यामुळे समोरच्या रस्त्यावरुन बरीच "मंडळं" विसर्जनासाठी जातात. तो "कार्यक्रम" माझ्या खोलीच्या खिडकितुन बघत बसण्यात माझा वेळ छान जातो.
यावर्षीचा देखावा काय वर्णावा !! एक तर माझ्या खिडकिच्या अगदी समोर एकमेकांपासुन २० फुटांच्या अंतरावर २ वेगवेगळ्या "सामाजिक कार्यकर्त्यांनी" उभारलेले २ "स्वागत कक्ष" होते. या स्वागत कक्षांपाशी थांबुन प्रत्येक मंडळाच्या एका प्रतिनिधीने एक नारळ फोडुन पुढे जावं अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. (चिकित्सक वाचकांसाठी - ते नारळ स्वागत कक्षांतले प्रतिनिधीच मंडळांना पुरवत होते.)
त्यापैकी एका स्वागत कक्षात एक व्यक्ती सकाळपासुन ग्रामोफोनच्या अडकलेल्या रेकॉर्डसारखा "आगतम् स्वागतम् सुस्वागतम् .... आगतम् स्वागतम् सुस्वागतम्" एवढंच म्हणत होता. पण मी काही कामासाठी २ मिनिटं आत गेलो असताना एकदम "आगतम् स्वागतम् सुस्वागतम् .. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत सर्व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत" असं जोरदार वाक्य ऐकल्यावर त्या अडकलेल्या रेकॉर्डला पुढे ढकलण्याच्या ताकदीचे कोण "गणेशभक्त" आले आहेत हे पाहण्यासाठी उत्सुकतनं मी हातातली कामं टाकुन अक्षरशः धावतच खिडकित आलो. रस्त्यावर एक "रथाचा" देखावा असलेली गाडी होती. त्या देखाव्यात रथ ओढुन न्यायला मोर आणि हंस या दोन्हीचा भास व्हावा अशा कोण्या पक्ष्याचे चित्र होते. दोन्ही बाजुच्या पक्ष्याच्या चोचींच्या मधे अनेक स्पिकर होते. त्या "रथाच्या" आत "सारथी" "बघं बघं अगं सखे कसं बुगु बुगु वाजतंय" हे "सुप्रसिद्ध लोकगीत" (म्हणजे popular folk song :P) वाजवत होता. त्या रथासमोर ८-१० वर्षे वयोगटातील काही मुले आणि त्यांच्यापेक्षा थोडी मोठी दिसणारी पण बौद्धिक वय त्याच वयोगटातले असेल अशी शंका येणारी काही माणसे नाचत होती. आणि त्या रथाच्या "टपावर" "बालशिवाजी"च्या पोशाखात एक मुलगा आपल्या तलवारीने त्या गाण्यावर ताल धरत होता. गणेशभक्तांच्या त्या "आगळ्यावेगळ्या" दर्शनाने मला अगदी भरुन आलं.
तेवढ्यात बाजुच्या स्वागत कक्षाच्या मंचावरुन धाड! असा सुतळी बॉंम्ब फुटल्यासारखा आवाज आला. मी चमकुन त्या दिशेला पाहिलं. त्या लोकांनी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी वापरलेली युक्ती बघुन तर मी निपचितच पडलो. तिथे एक कसलिशी छोटी तोफच होती. बाजुला झेंडुची फुले होती (आचार्य अत्र्यांची नाही ... खरिखुरी फुलं). त्या झेंडुची फुलांच्या पाकळ्या तोफेच्या "तोंडी देउन" ते येणार्या प्रत्येक मंडळाला तोफेची सलामी देत होते. मी (मनात) म्हटलं छान!!! पण त्या तोफेचा नुसता आवाजच जास्त होता. बत्ती दिल्यावर त्यातल्या पाकळ्या फार तर १० फुटांपर्यंतच पोहोचत होत्या. त्या पाकळ्यांची उधळण गणेशाच्या मुर्तीवर व्हावी यासाठी ते प्रत्येक वाहनचालकाची/सारथ्याची गाडी वेगवेगळ्या पद्धतीने पार्क करण्याची जणू परिक्षाच घेत होते. त्या भाउगर्दीत एक उत्साही चालक आपल्या ट्रॅक्टरबरोबर तो स्वागत कक्षाचा मंच पण ओढुन घेउन जाता जाता थोडक्यात राहिला !!! नंतर त्यांच्याकडल्या पाकळ्या संपल्या. मग ते रस्त्यावर पडलेल्या अर्धवट जळालेल्या पाकळ्या गोळा करुन त्याच recycle करायला लागले!!!!!

ढोल-ताशांच्या ठेक्यात ज्ञानप्रबोधिनी सारख्या मंडळांचा कार्यक्रम मला आवडतो. पण यावेळी लग्नाचे बॅंड आणि speaker system चाच जास्त सुळसुळाट होता. ती खरंच विसर्जनाची मिरवणुक होती, गणरायाची काही लोकांनी केलेली फसवणुक होती का काही लोकांनी स्वतःचीच करुन घेतलेली हसवणुक होती ते मला ठाउक नाही .... पण या सगळ्यानी माझी मनसोक्त करमणुक झाली हे नक्की!!
Originally posted on 10/1/2004

पुरुषोत्तम कोणाचा !!!

परवा "पुरुषोत्तम करंडक" स्पर्धेच्या बक्षिस समारंभाला गेलो होतो. करंडकाच्या नाटकाचा प्रयोग चालू होता. नाटक बघताना हळुहळु मी भुतकाळात हरवायला लागलो. मी भाग घेतलेली पुरुषोत्तमची ४ आणि फरोदियाची ३ नाटकं झरझर माझ्या डोळ्यापुढुन सरकायला लागली. कॉलेजची ३ वर्षे अनुभवलेल्या निखळ आनंदाच्या एक सहस्त्रांश का होईना, "तोच" आनंद या गोष्टीच्या नुसत्या आठनणीनं मला दिला आणि तेवढ्यानं सुद्धा माझ्या डोक्यातली अनेक दिवस साचलेली tensions आणि frustrations क्षणार्धात नाहिशी झाली.
केवळ ह्या एवढ्या एका गोष्टीसाठी मी दरवर्षी पुरुषोत्तम आणि फरोदियाला जाण्याचा प्रयत्न करतो. नाटकाच्या मागे असणार्या माणसाला नाटक"वेडा" म्हणतात ते एवढ्यासाठीच. ते एक वेडच असतं. मी स्वतः तरी कधी नाटक नुसतं "आवडणारी" माणसं पाहीली नाहित. एक तर ती नाटक न आवडणारी माणसं असतात नाहितर नाटकवेडी.
विचार करत असताना नाटक संपलं, बक्षिसांचा वाटप सुरू झाला. ढोल-ताशांचा आवाज वाढायला लागला .... मी परत भुतकाळात हरवायला लागलो ...... पुरुषोत्तम करंडक २००० ...... Limit ....... तो करंडक मी पण हातात धरला होता ...... त्या ढोल-ताशांच्या वाढत्या लयीत मी पण बेभान होउन नाचलो होतो ...... असं वाटलं की पुन्हा त्या काळात जावं ..... पुन्हा एकदा नाटक करावं ...... पुन्हा एकदा घसा फाटेपर्यंत ओरडावं ........ पुरुषोत्तम कोणाचा !!!!!!!
Originally posted on 9/22/2004

Riddle me this, riddle me that..Who's afraid of becoming very FAT !

Well, the so called "braniy" software job has taken its toll on my body and i have put on as much as 15-18kg in last 1-1.5 years. It is not only creating physical problems for me, financial problems are following as well because all of my clothes have become useless for me :D
इतके दिवस वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांच्या बाबतीत माझ्या मनात असलेल्या "आदर" या भावनेची जागा आता "समदुःखीपणा" या भावनेने घेतली आहे. वजन कमी करण्यासाठी कुठलेही प्रयत्न सुरू करताना मला पुलंच्या "बटाट्याती चाळ" मधल्या "उपास" या लेखाची आठवण होते. त्या लेखात शेवटी पुलंनी एक सुंदर कोटी केली आहे ... "छे!... वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच "काट्या"तुन जातो"..... पण हा भलताच मार्ग कुठला हे शोधुन काढायच्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर "काटा" आला आहे त्याचं काय!!!
Originally posted on 9/15/2004

परवा तिथं गेलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं !

परवा काही कामासाठी फर्ग्युसन रोडला गेलो होतो. तो भाग आजकाल फार परका वाटतो अशी मला जाणीव झाली, त्यानंतर डोक्यात आलेले काही विचार इथे लिहीतो आहे.

परवा तिथं गेलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं,
अनोळखी जागेच्या व्युहात एकदम गुंतल्यासारखं वाटलं

ङांबर तर तेच होतं, सुरुवातही तीच
शेवटही तोच होता, वळणेही तशीच
पण "रस्ता तोच आहे" म्हणायचं मनाने नाकारलं
परवा तिथं गेलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं

रस्त्याला आस्तित्व असतं, सजीव असतो रस्ता
त्यालाही एक ओळख असते, नसतो नुसता पत्ता
गावच्या भाषेत सांगायचं तर....
पत्ता तोच असुनही सगळं "हुकल्यासारखं" वाटलं
परवा तिथं गेलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं

अमृततुल्याऐवजी होती Barista ची कॉफी,
Pizza, Burger घेत होते वडापावाची फिरकी
नाही म्हणायला कॉलेज जुनी ओळख देऊन हसलं
परवा तिथं गेलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं

पूर्वी वृक्षांची शीतल छाया, मला अगत्याने बोलवायची
आता तिथली रहदारी फक्त श्वास रोखुन टाळायची
कामाशिवाय तिथे यायच्या विचाराला वैतागाने ग्रासलं
परवा तिथं गेलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं

ज्या गावचा रस्ता तिथली भाषा गावची राहिली नाही,
गतकाळाची आठवण तेवढी सदा आनंद देत राही
या गोष्टींचं कुसळ डोळ्यात खुपल्यासारखं वाटलं
परवा तिथं गेलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं....
Originally posted on 9/15/2004

मी "आकारमान" नच मानितो ...

परवा चपला घेण्यासाठी मी एका "सेल" मधे गेलो होतो. पुलंनी लिहीलेल्या ... "सेल मधे आपल्याला आवङलेल्या चपला असतात पण आपला पाय त्या मापाचा नसतो"... या वाक्याचा मला प्रत्यय आला. त्या पूर्ण सेल मधे माझ्या मापाची ( साईझ: १०/११) एक पण चप्पल नव्हती !!! मला कल्पना आहे की माझ्या पायाचा आकार बदकांनाही लाजवेल इतका मोठा आहे, पण इतक्यावरच वोलणं थांबल असतं तर मला काहीच हरकत नव्हती. पण आमचं नशीब इतकं चांगलं कसं असणार? दुकानदारने सुरवात केली
दु : तुम्हाला ९ नंबर बसेल की
मी : नाही होत, मी नेहमी १० नंबर वापरतो.
दु : अहो प्रत्येक कंपनीचा साईझ वेगळा असतो, तुम्ही नंबरावर जाऊ नका...
मी : (मनात : काय वाट्टेल ते काय बोलता) प्रत्यक्ष : अहो पण मी याच ब्रॅंङच्या चपला वापरतो
दु : चपलेच्या "design" नुसार पण आकार बदलतो, तुम्ही घालुन बघाच
मी : (मनात : चायला !!)
पण प्रत्यक्ष मला त्या चपला घालुन मला त्या होत नाहीत हे सिद्घ करावं लागतं.

चपलांचं एकवेळ ठिक आहे, ते सुसह्य आहे .... पण कपङ्यांच्या दुकानात फार त्रास होतो. एकदा मी एक पॅंट घ्यायला कपङ्यांच्या दुकानात गेलो होतो.

मी : (आपण जाङ झालो असल्याचं दुःख लपवत) ३६ size ची पॅंट घ्यायची आहे.
दु : (माझ्या जखमेवर मीठ चोळत) साहेब तुम्हाला ३४ बसेल की
मी : (तोंङावर आलेल्या अर्वाच्य शिव्या आवंढयाबरोबर गिळुन) नाही होत, मी नेहमी ३६ नंबर वापरतो.
दु : अहो मी सांगतो ना, नक्की होईल, मला काय, मी ४० size पण देईन हो, पण उगाच मोठी पॅंट घेउन तुम्ही तरी काय करणार?
मी : (मनात : मोठ्या पॅंटचं कापङ फाङुन त्याचा टेबल क्लॉथ करेन... नाहितर ती पॅंट ङोक्याला फेटा म्हणुन गुंङाळेन, तुला काय करायचं आहे?) प्रत्यक्ष : (हताशपणे) द्या ३४, try करुन बघतो.

दुकानदारने विजयी मुद्रेने मला ती पॅंट दिली. मग मी "Trial Room" असं लिहिलेल्या दिङ X दिङ फुटाच्या ङब्यात जाउन महत् प्रयत्नांनी स्वतःला लहान अभ्र्यात उशी कोंबावी तसं त्या विजारीत कोंबलं आणि धापा टाकत बाहेर आलो.

दु : (निर्लज्जपणे) खरंच की, ३४ फारच घट्ट होते तुम्हाला !! (दुसर्या माणसाला) मामा, ३४ नाही होत त्यांना, ३६ च द्या.

मला " तळपायाची आग मस्तकात जाणे", " ङोक्यात तिङिक जाणे" या वाक्प्रचारांचा अर्थ झटकन लक्षात आला.

शिरीष कणेकरांच्या एका लेखात त्यांनी म्हटलं आहे की " आपल्यावर जर काही ऋण असेल तर आपण द्रव्याच्या रुपाने फेङू शकतो, पण आपल्या नशिबातले भोग हे आपल्याला भोगावेच लागतात." माझ्या नशिबातले हे भोग बहुतेक मला आयुष्यभर भोगावेच लागणार!!!

पण नंतर एका अंतर्वस्त्राच्या दुकानदाराने जेव्हा माझ्याशी हा वाद घालायला सुरुवात केली तेव्हा मात्र स्वतःचं म्हणणं त्याला पटवुन देण्याच्या फंदात न पङता मी तिथुन जो बाहेर पङलो तो आजतागायत ते दुकान असलेल्या रस्त्यावर देखील फिरकलेलो नाही ....
Originally posted on 9/1/2004

A Joke

I know blog is not the thing where you put jokes, but this one is nice.

On a Sunday night, a group of four friends went out for dinner. They had their mathematics test on the following day. They thought they would manage it, so they went out, got drunk and fell asleep. They missed their test the other day. The test was important and they had to pass it. So they went to the professor with an alibi saying that they had gone out of station and their car tyre was punctured so they could not attend the test.
The professor heard their story and called four of them on next monday for the test. When all of them came, he made every one sit in a different room and gave them the question paper. The first question, for 5 marks, was simple and all of them started writing their papers happily. On the second page, there was only on question for 95 marks ...... "Which Tyre?" :)) :)) :))
Originally posted on 8/30/2004

काही अनुत्तरीत प्रश्न

संध्याकाळचे ६-६:३० झाले असतील, दिवसभराच्या पावसामुळे सगळीकङे हिरवं(आणि)गार वातावरण होतं. युनिव्हर्सिटिच्या कँपसमधल्या एका ग्राउंङवर कोवळं गवत उगवलेलं होतं. ते "काळजीपूर्वक वाढवलेलं लॉन" नसुन स्वच्छंदी आणि बेधुंदपणे वाढलेलं जंगली गवत असल्यामुळेच कदाचित ते जास्त सुंदर दिसत होतं. त्या गवतात साधारणतः घोट्यापर्यंत पावलं बुङतिल इतपत पाणी सचलं होतं. पावसाची रिमझिम चालुच होती. सूर्यास्ताच्या थोङा वेळ आधिचे रंगकाम आकाशात चालु होतं. त्यात त्या गवतावरचे दवबिंदू लकाकत होते.
या सुंदर दृष्याकङे पाहून ताबङतोब अनवाणी पायांनी त्या गवतात जाऊन रिमझिम पावसात भिजायची तीव्र ईच्छा झाली .... पण त्याच्या पुढच्याच क्षणी माझ्या मनात आलले विचार खालिलप्रमाणे...

१) बुट कुठे काढुन ठेवायचे ?
२) माझा मोबाईल वॉटरप्रुफ असेल का?
३) ती जागा कोणाची खाजगी मालमत्ता तर नसेल?
४) पावसात भिजल्यामुळे जर मी आजारी पङलो तर घरच्यांची बोलणी कोण खाणार?
५) माझ्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने मला पावसात नाचतांना पाहिलं तर?

हे विचार "वैचारीक दारिद्र्यरेषेची किमान पातळी" ठरवण्यात नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दर्जाचे आहेत य़ाची मला पूर्ण कल्पना आहे.
लहान असतांना मी बिनदिक्कत या गोष्टी करू शकत होतो. मग एकाएकी असा काय बदल घलङा आहे माझ्यात? घरच्यांची बोलणी फक्त पावसात भिजल्यामुळेच मला बसतात अशातला काही भाग नाही, रोजच्या जेवणाबरोबर तोंङीलावणं म्हणुन मी ती खातच असतो. माझ्या ओळखीच्या लोकांना " हे जरा सर्कीट कॅरेक्टर आहे बरंका" या निष्कर्षाप्रत यायला मला पावसात नाचतांनाच पाहिलं पाहिजे अशीही काही अट नाही. मग या अशा सामाजिक प्रतिष्ठेच्या, योग्यायोग्यतेच्या, लहानमोठेपणाच्या नवीन कल्पनांना मी का बळी पङत होतो?
हे सगळं कळत असूनही काल घरी पोचलो तेव्हा मी "कोरङा"च होतो.
ज्या दिवशी मी अशा पावसात भिजू शकेन त्या दिवशी मला नेहमी पङणारे इतर अनेक प्रश्न सुटले असतील याची मला खात्री आहे.
Originally posted on 8/13/2004

The Easy Way

Its strange how we sometimes take a very difficult path to things that are very simple. Its just the prejudiced view in which we see that thing thinking that it is difficult and there is NO easy way of doing it.
I have heard a small story which is not exactly about the same thing, but still similar, which appealed to me, so thought of putting it here

One day, in a Philosophy class, the professor came in and announced that he is going to take a surprise test. He took his chair, put it on top of the table and said to the students "I want you to defy existence of this chair". That was the only question for the test.
People started writing pages after pages for the same, except for one person, who got up in one minute, gave back the answer paper and walked out.
Later on, when the results were out, the guy who left had topped the class. His answer paper consisted of only 2 words.................. "What Chair!!!".
Originally posted on 8/30/2004

माझी समाधिची जागा

शहर पुणे.... पावसाळ्यातली एक सकाळ ... वेळ ९:४५ ... "पाऊस नीट येत नाही" अशी तक्रार करणार्या पुणेकरांचा "सुङ उगवायचा" एवढ्या एकाच भावनेने वरुणराज "पेटलेले" आहेत ... नळ स्टॉपजवळ कर्वे रस्त्यात मधोमध एक PMT बंद पङलेली आहे ( वाहत्या रस्त्याच्या मधोमध बंद पङण्याची "कला" बस नाहीतर ट्रक अशा महाकाय वाहनांनाच का अवगत असे हे मला नं सुटलेलं एक कोङं आहे) ... PMT मधील काही उत्साही उतारू PMT ढकलण्याचा प्रयत्न करताहेत ... signal बंद पङलेला आहे ... काही आगाऊ (आणि रिकामटेकङे) दुकानदार आपले वाहतुक नियत्रणाचे कौशल्य आजमावताहेत ... रस्त्यावर महानगर पालिकेने केलेल्या नितांत सुंदर अशा ङांबराच्या "पॅचवर्क"ची पावसामुळे अशी काही धुळधाण उङाली आहे की PMT च्या बाजुने जाणं सध्याच्यातरी कोणत्याही वाहनाला शक्यं नाही ... काही रीक्षाचालक तिथल्यातिथेच U टर्न मारण्याचा निष्फळ प्रयत्न करताहेत ... शेजारी फुटपाथवर शिल्लक असलेल्या चिंचळ्या जागेतून पादचर्यांना न जुमावता पलिकङे जाण्याचा केविलवाणा प्रयत्न काही दुचाकी स्वारांनी चालवला आहे ... १० वाजता ऑफिसमधे महत्वाची मिटिंग आहे ... आणि ऑफिस औंध मधे आहे.
आहाहा!! समाधी लावायला याहुन योग्य जागा या भूतलावर शोधुन सापङणार नाही. विनाकारण आपापल्या गाङ्यांचे कर्णकर्कश्य हॉर्न वाजवणार्यांचा राग ... फुटपाथवरून आपल्या १० फूट पुढे गेलेल्यांचा मत्सर ... चिखल उङाल्यांमुळे खराब झालेल्या कपङ्यांबद्दल दुःख ... मिटिंगला वेळेवर न पोचल्यास भोगाव्या लागणार्या परिणामांची भिती ... यासारख्या अनेक भावनांवर विजय मिळवण्याचे हेच योग्य ठिकाण आहे असं माझं प्रामाणिक मत झालं आहे.
तुम्ही जर कधी दुर्दैवाने अशा ठिकाणी अङकलात तर स्वस्थपणे थांबुन रहा ... ज्याच्या कृपेने हे जग चालू आहे, केवळ तोच हा प्रश्न सोङवेल एवढी श्रद्धा ठेवा म्हणजे झालं !!!
Originally posted on 8/12/2004

श्रावणमासी.....

"श्रावणमासी हर्षमानसी ...." ही कविता लिहिणारे बालकवी बहुतेक शुद्ध शाकाहारी असावेत... कारण माझ्यासारख्या सामिष खाद्यभक्ताला (हा नविन शब्द आहे :P) हि दरवर्षी नियमितपणे भोगावी लागणारी शिक्शा आहे. "जेवण म्हणजे मानवी शरीराचे जैवयंत्र ( हा पण एक नविन शब्द) चालू ठेवण्यासाठी त्यात भरावयाचे केवळ एक इंधन आहे" असं मानणार्या काही लोकांचे "तेवढ्या कोंबङ्या तरी अजून महिनाभर जगतील" हे क्शूद्र दर्जाचे मत जाणकारांनी विचारातही घेऊ नये.
आणि या वर्षी तर माझ्यासाठी "दुष्काळात तेरावा..." च्या चालिवर " अधिकात श्रावण" असं म्हणायची वेळ आली आहे!!!
त्यामुळे माझ्यासारख्या सामिष खाद्यभक्तांचं या वर्षी एकच (रङ) गाणं असेल

श्रावणमासी वर्षोवर्षी सामिष भोजन बंद पङे,
अधिकातही श्रावण म्हणजे भरल्या पोटी उपवास घङे !!
Originally posted on 8/10/2004

Another subject in school!

I remember reading an article in the news papers in which a Police Officer said "जेव्हा सामान्य माणुस वाहतुकीचे नियम तोङायला लागतो तेव्हा शहरात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं असतं"... which means that when a common man starts breaking normal traffic rules, you can say that the number of crimes in the city are increasing.
And today, when I saw school children breaking traffic rules, I just thought what would this statement mean for such a situation.
May be these two are not related at all, but if this is what the children know from school days, I wonder weather they will ever know that they are breaking the rules or they will think that this is the way one should drive :(
I am not of the opinion that children dont have enough subjects in the school right now, but may be traffic discipline is best taught when you are learning to ride a bicycle, say in 8th to 10th standard. And off course, their parents should also be invited to attend those lectures !! Thats one more subject I think is required for at least schools in Pune :D
Originally posted on 8/9/2004

पाण्याच्या लहरी पावसाने घेतल्या आहेत !

"ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला"... असं म्हणतात खरं, पण सध्या जरा उलटंच चालू आहे. वर्षानुवर्ष ऋतुचक्राने आखुन दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चालणार्या पावसाची शिस्त आपण घ्यायच्या ऐवजी मनुष्य स्वभावातला लहरीपणा पावसाने घेतला आहे.
एकिकङे शेतकर्यांनी आत्महत्या करेपर्यंत तो य़ेत नाही.... आणि जेव्हा येतो तेव्हा आपल्या थेंबांबरोबर अनेक संसार नद्या-समुद्रांना भेट देतो. कदाचित...आता तरी निसर्गाची शिस्त पाळा हे आपल्याला सांगायची त्याची ही नवीन पद्घत असेल.
बहुतेक पुर्वी लोक ही शिस्त पाळत होते... कारण नसलेल्या पावसाला बोलवायला लोकांनी "ये रे ये रे पावसा" सारखं गाणं आणि तानसानने "मेघ मल्हार" सारख्या रागाची रचना केली होती.... पण आलेल्या पावसाला परंत पाठवण्यासाठी कोणाला गाण्याची गरज पङली नाही !!!
Originally posted on 8/6/2004

मी "त्यांतला" एक आहे !

कलाकारांच्या कलेला दाद देऊन .. त्यांच्या हुबेहूब प्रतिरुपाला काही लोक "न"-कलाकार म्हणतात
नक्कल हिच अवघङ कला मानणार्यातला मी एक आहे

विङंबनाला हसून काही लोक... विङंबनकाराला पण विसरतात
विङंबनकाराला कलेची जास्त जाण असते हे जाणणार्यातला मी एक आहे

शून्यांच्या पुढे उभं राहून...स्वतःची किंमत वाढली हे न मानता
शून्यांच्या मागे उभं राहून स्वतःची किंमत स्वतःच राखणार्यातला मी "एक" आहे

आता हेच पहा ना !!

संगणक मायाजालाच्या "रोम" मधे...."रोमन्स" सारखं न राहता
आपला पुणेरी मराठी बाणा कुठे दाखवता येईल.. हे शोधत फिरणार्यातला मी एक आहे
Originally posted on 8/5/2004

sample post

sample post